घरताज्या घडामोडीचीनमध्ये वटवाघुळात सापडला कोरोनासारखाच 'नोवेल व्हायरस'

चीनमध्ये वटवाघुळात सापडला कोरोनासारखाच ‘नोवेल व्हायरस’

Subscribe

कोरोनाच्या उत्पत्तीवर जगभरात वादाचा धुरळा उडालेला असतानाच आता चीनमध्ये एका नव्या संशोधनाचा दावा केला जात आहे. जगभरात थैमान घातलेल्या covid-19 विषाणूसारखा जेनेटिकली मिळता जुळताच असा हा विषाणू असल्याचा दावा चीनी संशोधकांनी केला आहे. वटवाघुळात हा नव्या स्वरूपाचा व्हायरस सापडल्याचे संशोधन या संशोधकांनी मांडले आहे. शॅनडॉंग विद्यापिठाने केलेले संशोधन जरनल सेलमध्ये प्रकाशित झाले आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या उत्पत्तीसाठी चीनच्या वुहान लॅबमध्ये तज्ज्ञ मंडळींच्या अभ्यासासाठी परवानगी मिळावी. तसेच वुहान लॅबमधील संपुर्ण माहिती ही पारदर्शक पद्धतीने मांडली जावी यासाठी जगभरातून सध्या चीनवर दबाव आहे. दरम्यान चीनमध्ये झालेल्या या संशोधनातून आणखी एक नोवेल व्हायरस वटवाघुळातून समोर आल्याचे समोर आले आहे.

संशोधकांच्या दाव्यानुसार वेगवेगळ्या वटवाघुळाच्या प्रजातींमधून जवळपास २४ प्रकारचे जेनोम्स चीनच्या संशोधकांनी शोधले आहेत. चीनच्या अनेक वनक्षेत्राच्या भागातून हे सगळे नमुने शोधण्यात आले आहेत. मे २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत हे नमुने गोळा करण्यात आले. संशोधकांनी या नमुन्यांमध्ये वटवाघुळाचे युरिन, फेसेस आणि स्वॅब गोळा केले आहेत. जगभरात कोरोनाच्या उत्पत्तीच्या निमित्ताने चीनच्या वुहान लॅबवर टीकेची झोड उडालेली असतानाच हे संशोधन अतिशय नेमक्या वेळीच समोर आले आहे. जगभरातून कोरोना व्हायरसच्या उत्पत्तीचे मूळ पारदर्शक पद्धतीने शोधण्यासाठी मागणी होत असतानाच हे संशोधन पुढे आले आहे. बरोबर दीड वर्षांपूर्वी वुहान शहरातून कोरोनाच्या पहिला रूग्णांची माहिती समोर आली होती. त्यानंतरच कोरोनाचा जगभरातील संसर्ग पाहता चीनच्या वुहान इन्स्टिस्ट्यूट ऑफ वायरॉलॉजी येथून व्हायरस लीक झाल्याची चर्चा सुरू झाली. पण चीनच्या दुतावातामार्फत अशा कोणत्याही पद्धतीच्या लीकबाबतच्या माहितीचा दावा फेटाळला आहे.

- Advertisement -

अमेरिकेकडूनही चीनसोबत नुकत्याच झालेल्या संवादामध्ये व्हायरसच्या उत्पत्तीच्या संशोधनात चीनने सहकार्य करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संपुर्ण माहिती पारदर्शक पद्धतीने समोर यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सचिवालयातील एंटनी ब्लिंकन यांनी चीनच्या यॅंग जिएची यांच्यासोबतच्या टेलिफोनिक संवादादरम्यान या संपुर्ण संशोधनाच्या कामात सहकार्याची मागणी केली आहे. तसेच WHO च्या चीनमधील दुसऱ्या टप्प्यातील तज्ञांच्या अभ्यासालाही सहकार्य करण्याची मागणी केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -