घरमहाराष्ट्रनाशिक२ वर्षांनंतरही सुंदर नारायणाला प्रतीक्षा मंदिराची...

२ वर्षांनंतरही सुंदर नारायणाला प्रतीक्षा मंदिराची…

Subscribe

कामाला गती मिळत नसल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त

नाशिक शहरासह जिल्ह्यात विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे आहेत. यामध्ये श्री सुंदर नारायण मंदिराचाही प्रामुख्याने समावेश होतो. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने केंद्र सरकारच्या साडेबारा कोटी रुपये निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. या कामाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उद्घाटन करुन तब्बल दोन ते अडीच अडीच वर्षे होऊनही कामाला गती मिळत नसल्याने सुंदर नारायणाला नूतन मंदिराची प्रतीक्षा कायम आहे.

पंचवटीतील गोदावरीच्या तीरावर श्री सुंदर नारायण मंदिर सन १७५६ च्या सुमारास बांधले गेले. सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी हे मंदिर त्या काळात जवळपास १० लाखांत बांधले आहे. उत्तम बांधणी आणि विविध शिल्पकृतीमुळे हे मंदिर वेगळेपण टिकवून आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिरासाठी दगड, चुना, शिसव, नवसागर आदी साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिराचाही अतिप्राचिन मंदिरांमध्ये प्रामुख्याने समावेश होतो. मात्र, कालौघात मंदिराची झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला गेला. यासाठी मुबलक निधीही दिला गेला, मात्र दोन वर्ष उलटूनही मंदिराच्या कामाला गती मिळत नसल्याने भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

पेशवेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमूना असलेल्या श्री सुंदरनारायण मंदिराला राज्य पुरातत्व विभागाने ‘संरक्षित वास्तू’चा दर्जा दिला. मंदिरात प्रत्येक वर्षी मार्च महिन्यात २० आणि २१ तारखेला म्हणजे उत्तरायण काळात सूर्याचे पहिले किरण गर्भगृहातील मूर्तीच्या पायाजवळ पडते. अशा वैशिष्ट्यपूर्ण मंदिराच्या कामाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -