घरफिचर्सजाऊ कशी तशी मी नांदायला?

जाऊ कशी तशी मी नांदायला?

Subscribe

घटस्फोटाचे वाढते प्रमाण चिंताजनक, अपत्यांचा विचार करून सकारात्मक निर्णयांची गरज

फारकत पण देणार नाही आणि नांदायला पण जाणार नाही, महिलांची ही भूमिका आयोग्यवैवाहिक समस्यांवर समुपदेशन करताना काही प्रकरणांमध्ये महिला अत्यंत चुकीची भूमिका घेतात हे प्रकर्षाने जाणवते. कोणत्याही वैवाहिक संबंधांमध्ये न सुटणारी, किचकट समस्या निर्माण झाल्यास दोनच पर्याय अपेक्षित असतात. एकतर समजून उमजून त्यातून सकारात्मक मार्ग काढून व्यवस्थित संसार पुनःश्च सुरु करणे अथवा सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून एकमेकांपासून कायमस्वरूपी फारकत घेऊन वेगळे होणे. समाजातील घटस्फोटाचे वाढते प्रमाण पाहता आपण समुपदेशनमार्फत संसार टिकवण्याचा, समेट घडवण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहोतच. अनेक ठिकाणी त्यामुळे मनपरिवर्तन होऊन पती, पत्नी दोघेही नव्या उत्साहाने आयुष्य सुरु करतात. आपल्या कुटुंबीयांचा अपत्यांचा विचार करून, सकारात्मक निर्णय घेतात.

तरीदेखील काही महिला परिस्थितीमुळे म्हणा किंवा पतीच्या सामाजिक प्रतिष्ठेला तडा जावा म्हणून, अथवा वेगवेगळ्या कलम कायद्यांचा वापर करून पतीला मानसिक त्रास देण्यासाठी, जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवण्याकरिता प्रयत्न करतांना दिसतात. एकमेकांपासून वेगळे होण्याच्या मानसिकतेमध्ये असलेल्या महिलांचे समुपदेशन करताना असे जाणवते की, त्या नवर्‍याची इस्टेट, प्रॉपर्टी किती आहे, पगार किती आहे आणि त्यानुसार जास्तीत जास्त खावटी कशी मिळू शकेल, याबद्दल विचार करताना दिसतात. अनेकदा अशा प्रकरणात महिला नांदायला देखील तयार नसतात आणि फारकत द्यायला देखील तयार नसतात. पतीला कायदेशीररित्या अडकून ठेवणे, तो रीतसर दुसरं लग्न करू नये म्हणून किंवा त्याच्या स्थावर मालमत्ता, उत्पन्नावर आपला हक्क अबाधित राहावा म्हणून, किंवा फारकत घेताना तो आपल्या मागणीनुसार भली मोठी रक्कम देत नाहीये म्हणून त्याला अडकवणे या ध्येयाने महिला वाटचाल करतात. अनेकदा लग्न झाल्यावर अतिशय कमी कालावधीमध्ये दोन्ही कुटुंबात अथवा पती, पत्नीमध्ये कोणत्याही कारणास्तव वाद झाल्यास ते समुपदेशन, मध्यस्ती, दोन्हीकडील नातेवाईकांची बैठक याने मिटू शकतात. तसे न झाल्यास थोडा कालावधी तरी पती, पत्नीने विचार करण्यासाठी, राग अथवा गैरसमज निवळण्यासाठी देणे आवश्यक असते. परंतु, अजिबात धीर न धरता महिला पतीला खोट्या पोलीस कंप्लेंट करून, कोर्टात खेचून लग्न खर्चाची जास्तीत जास्त रक्कम, भविष्यातील आर्थिक तजवीज मिळण्याकामी प्रयत्न करतात. मी दुसरं लग्न करणार नाहीये, त्याला पण करू देणार नाही, फारकत पण देणार नाही, नांदणार पण नाही अशी भूमिका घेणे अनेकदा चुकीचं ठरत. दोघेही फारकत न घेता, एकमेकांपासून विभक्त राहतात. त्यावेळी पती, पत्नीमधील अंतर अजून वाढत जाते, गैरसमज वाढत राहतात, बदनामी होत राहते, इतर हितशत्रू या परिस्थितीचा गैरवापर करतात. दुसरं लग्न ही होत नाही, पाल्य असतील तर आई बाबाच्या एकत्रित प्रेमाला मुकतात आणि आयुष्यातील वेळ वाया जाण्यापलीकडे काहीही साध्य होत नाही.

- Advertisement -

महिलांनी कोणत्याही एका निर्णयावर ठाम राहणे त्यांच्या हिताचे ठरेलं असे वाटते. पहिले तर आपला पूर्ण प्रयत्न नांदण्याचा, संसार टिकवण्याचा असावा. त्यात काही अडचणी असतील तर त्या जेष्ठ मंडळी, समुपदेशन, योग्य सल्लागार यांच्या मार्गदर्शनने सोडवाव्यात. पण जर दोन्हीकडून यातील काहीच शक्य नसेल तर रीतसर फारकत घेऊन लवकरात लवकर नवे आयुष्य सुरु करणे कधीही योग्य राहील. फारकत न घेता विभक्त राहणार्‍या पती, पत्नींना अनेकदा विविध समस्यांना सामोरं जावं लागत. अशा प्रकारे पती, पत्नींच्या मनातले नकारात्मक विचार, राग जायला थोडा फार वेळ लागला आणि त्यातून विभक्त राहण्याचा कालावधी जर कमीतकमी असला आणि त्यातून लवकर समेट घडला तर अतिउत्तम. परंतु केवळ पतीला त्रास द्यायचा म्हणून पत्नी नांदत नसेल आणि त्याच्यापासून लांब राहत असेल, कोणत्याही आणि काहीही मागण्या जर फारकत देण्यासाठी करत असेल तर दोघांना पण भविष्यात त्याचे परिणाम भोगायला लागतात. असे मध्येच अडकलेले वैवाहिक नातेसंबंध दोन्ही कुटुंबातील लोकांना पण त्रासदायक होतात. समाजातील चर्चेला आणि लोकांच्या प्रश्नांना वडीलधार्‍या मंडळींना तोंड द्यावे लागते. पती अथवा पत्नीलादेखील सातत्याने याबद्दल विचारणा होत राहाते; परंतु, कोणतही ठोस उत्तर देणे शक्य होत नाही. ती स्वतः माहेरी निघून गेली तिने स्वतः यावं, तिची चूक होती तीने माघार घ्यावी यावर पती अडून बसतो आणि माझी काही चूक नव्हती त्यांनी घ्यायला यावे, त्यांनी माफी मागावी, त्यांनी स्वतः ला बदलावं यावर पत्नी ठाम राहते. काही पती, पत्नी एकत्र येण्यासाठी दोघांपैकी कोण पुढाकार घेत याची ठराविक कालावधीपर्यंत वाट बघून स्वतःच्या वेगळ्या मार्गाला लागून जातात, मार्गस्थ होतात. असे पती पत्नी एकमेकांना कायदेशीर नोटीस पाठवून मोकळे होतात. जे होईल ते कोर्टात बघू अशी भूमिका यावेळी घेतली जाते. पण यामुळे दोघांच्या हट्टी पणा मुळे जो कालावधी गेलेला असतो त्यात तरी त्यांना संसाराचे महत्व पटणे, घरच्यांनी ते पटवून देणे महत्वाचे असते. आता अशा प्रसंगात जर पतीने फारकतसाठी पाऊल टाकलं तर महिला परत नांदायला जायचा विचार सोडून देते, तिचा अहंकार याठिकाणी तिला नमतं घेऊ देत नाही.

महिला पतीला कायद्यानेच कसे उत्तर द्यायचे हे ठरवते आणि स्वतः ची विचारशक्ती न वापरता, इतरांचे सल्ले घेत सुटते. या सगळ्या उठाठेवीमध्ये दोन्हीकडील काही जखमेवर मीठ चोळणारे नातेवाईक, मित्र, सहकारी इकडच्या बातम्या तिकडे करणे, कोणत्याही घटना तिखट मीठ लावून सांगणे यामध्ये पटाईत असतात. पती, पत्नींना एकमेकांबद्दल भडकवण, तो कसा मजेत जगतोय त्याला काही फरक नाही. बायको आयुष्यात नसल्याने किंवा ती दुसर्‍याबरोबर फिरते ती काय नांदायला येणार आहे, ती माहेरी मजेत राहते, तीच स्वातंत्र्य एन्जॉय करीत आहे, आईबापाच्या पैशावर उड्या मारत आहे. ती थोडीच संसार करणार आहे आदी वावड्या उठवल्या जातात. एकमेकांच्या मनात सहानुभूती, काळजी, प्रेम, लग्नाचे महत्व निर्माण करण्याऐवजी नवरा बायकोचे आप्त त्यांची मन अजून कलुषित करताना दिसतात. आपल्या संसाराची काळजी आपण स्वतः करून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे, याची जाणीव दोघांनी ठेवणे आवश्यक आहे.

- Advertisement -

वास्तविक, लांब राहत असताना पती, पत्नी दोघेही कायद्याने, धर्माने बांधलेले असतात. दोन्ही परिवारदेखील नात्यात गुंतलेलेच असतात. पण फारकत न घेता विभक्त राहणार्‍या पती, पत्नीवर, त्यांच्या चारित्र्यवर, त्यांच्या एकाकी सुरु असलेल्या जीवनशैलीवर उलटसुलट चर्चा करून त्यांना अधिक गोंधळात टाकले जाते. तसेच पती अथवा पत्नी परस्परांचा सहवास न मिळाल्यामुळे या कालावधीत मानसिक व शारीरिक अपेक्षा पूर्तीसाठी चुकीच्या मार्गाला देखील जाऊ शकतात. अपत्य असल्यास ते दोघांपैकी कोणाकडे ही असल्यास, त्याला भेटू देण्यासंदर्भात देखील वादविवाद होताना दिसतात.
मुलांची भावनिक कोंडी होते. त्यामुळे वैवाहिक जीवन अजून दुभंगले जाते. गंभीर समस्या असल्यास, सहनशक्तीच्या पलीकडे त्रास, अत्याचार, मारहाण किंवा तत्सम काही न स्वीकारण्यासारखी परिस्थिती सासरी असल्यास महिलांनी स्वतः चा संसार टिकवण्यासाठी, वाचवण्यासाठी आवश्यकता असेल तर कायद्याची मदत जरूर घ्यावी. पण केवळ पतीला फारकत न देता त्याच्यांपासून लांब राहणे म्हणजे सूडबुद्धीने घेतलेला निर्णय असू शकतो. पतीने आईवडिलांपासून वेगळे होऊन वेगळा संसार थाटावा किंवा आपल्या इच्छेनुसार आपण म्हणू त्या शहरात स्थायिक व्हावे, पतीची आर्थिक परिस्थिती जेमतेम असेल तरी त्याने आपले हट्ट पूर्ण करावेत अथवा लग्नानंतर स्वतःच्या करियरबद्दल कल्पना मनात धरून तसं न झाल्यास, मनासारखे होईपर्यंत हटवादीपणे न नांदणे अशा स्वरूपाची कारणे महिला पतीवर मानसिक अत्याचार करून आपले इप्सित साध्य करण्यासाठी प्रयत्न करतात. अशा कालावधीमध्ये जर पतीने विवाहबाह्य संबंध प्रस्थापित केले तर त्याला आपणच जबाबदार असल्यासारखे होईल.

जर आपल्याला वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणायचेच असेल तर तसा निर्णय विचार करून घ्यावा. योग्य वयात, योग्य वेळी फारकत न घेता केवळ नवर्‍याला लटकावून ठेवणार्‍या महिलांना पुढील भविष्यात ना नांदायला जायची परिस्थिती राहतात. तसेच विभक्त राहणारी महिलादेखील अशा परिस्थितीमध्ये भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे पाऊल उचलू शकते. त्यातून जर मुले घेऊन ती एकाकी जीवन जगत असेल तर तिला मुलांचे संगोपन एकट्याने करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. माहेरून जरी मानसिक, भावनिक, आर्थिक आधार असला तरी त्यातही अनंत आव्हाने सामोर असतात. जर पतीच्या घरी जावेसे वाटले, परत पती सोबत सासरी नांदावेसे वाटले तरी त्या घरातील आपले अस्तित्व नाहीसे झालेले असते, कुटुंबियांच्या मनात आपल्याबद्दल पहिल्यासारखा आदर राहिलेला नसतो आणि मुलेदेखील त्यांच्या या बदलणार्‍या आयुष्यात कितपत रुळतील हा पण प्रश्न असतो. त्यातून इतका मोठा कालावधी पत्नीपासून पतीला लांब राहावे लागल्यामुळे त्याच्या आयुष्यात आपली जागा कदाचित कोणीतरी घेतलेली असू शकते.

पतीच्या मनातील आपली जागा, आपल्यावरील प्रेम, आपुलकी देखील लयाला गेलेली असते. केवळ त्याची कायदेशीर पत्नी, त्याच्या मुलांची आई आहे म्हणून त्या महिलेला परत घरात घेतलेही गेले तरी नात्यातला तो ओलावा, माधुर्य राहत नाही. मधील कालावधीमध्ये दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांवर विचित्र आरोप, प्रत्यारोप, बदनामी केलेली असल्यामुळे त्यांचे देखील हितसंबंध बिघडलेले असतात. पतीपत्नीच्या या लटकलेल्या नातेसंबंधाचा अनेक नातेवाईकांनी, ओळखीच्यांनी, मित्र मंडळींनी स्वतः च्या स्वार्थासाठी वापर केलेला असतो. फारकत न घेता पतीपासून वेगळं राहण्याच्या मोठया कालावधी नंतर पतीच्या घरी पुन्हा जाणं, किंवा मुलं बर्‍यापैकी कळती झाल्यावर फारकत घेणं हे दोन्ही पर्याय त्रासदायक ठरतात. तोपर्यंत जीवनातील अनेक महत्वाची वर्ष कोर्टात तारीख पे तारीख मध्ये निघून गेलेली असतात. मोठया कालावधी नंतर आपण फारकत घेऊन पुनर्विवाह चा विचार केला तरी त्यात बर्‍याच अटी शर्तीना सामोरं जावं लागत. परत पतीकडे जायचा विचार केला तरी आपली त्या कुटुंबात आता काय प्रतिमा असेल, त्याच्या घरातील सर्व सदस्य आपला स्वीकार करतील का हे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत. महिला नक्कीच काहीतरी प्लॅन करून आता नांदायला आली, प्रॉपर्टीसाठीच परत आली, आपला हक्क दाखवायला आली, इतके दिवस नांदली नाही, आता पैशाच्या लोभाने आली असले आरोप देखील महिलेला सहन करावे लागू शकतात. एकत्रित कुटुंबात आधीच आर्थिक वादविवाद, स्थावर मालमत्ता, हक्क, वाटण्या या संदर्भात आपापसात हेवे दावे असतात. अशा कुटुंबातील महिला जर पतीसोबत असलेल्या कोणत्याही वैयक्तिक मतभेदामुळे त्याच्यापासून लांब झाली असेल, परंतु ते कायद्याने पतीपत्नीच असतील, तरी सासरच्या एकत्रित कुटुंबात तिची प्रत्येक वर्तवणूक संशयास्पद ठरते. त्यामुळे अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या महिलांनी जास्त सजग राहणे आवश्यक आहे.

महिलांच्या अशा न नांदता, वेगळे राहून सगळ्यांनाच अडचणीत आणण्याच्या भूमिकेमुळे, पतीला, त्याच्या कुटुंबाला पण मानहानीला सामोरे जावे लागते. पत्नीने विनाकारण खोट्या तक्रारी करून, वादाच्या छोटया कारणांवरून पतीला कायदेशीर प्रक्रियेत त्रास देऊन स्वतः चा अट्टाहास पूर्ण करून, मग फारकत दिली तरी अशावेळी त्या पुरुष आणि महिलेचा पुनर्विवाह होणे अवघड होते. कारण आपल्याच हाताने आपण आपला त्रासदायक भूतकाळ लिहून ठेवलेला असतो. आपणच आपली बदनामी करून ठेवलेली असते तर समाजाला काय दोष देणार? त्यामुळे या लेखातून एकच सांगावेसे वाटते की वैवाहिक आयुष्यातील कोणतेही निर्णय योग्य वेळी, योग्य पद्धतीने घेणे दोघांच्या फायद्याचे असते.

आयुष्याची नवीन सुरुवात आपण कोणत्याही वळणावर नक्कीच करू शकतो, आपल्याला तशा संधी अनेकदा चालून आलेल्या असतात. केवळ आपल्या अहंकारामुळे, किंवा कुटुंबाने योग्य वेळीच योग्य सल्ले न दिल्यामुळे फारकत न घेता एकाकी जीवन जगत लांब राहणार्‍या पतीपत्नींना कोणत्याही वेळी एकत्र येण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे आपण झाले गेले विसरून, मोठया मनाने जर एकमेकांना स्वीकारायचे ठरवले तर निश्चितच आपलं, आपल्या आपत्यांचं पुढील भवितव्य सुरक्षित होऊ शकेल. ज्या विषयांवरून वाद होते, किंवा आहेत त्यावर दोघांच्या संगनमताने मधला मार्ग काढून, आयुष्यात थोडाफार बदल करून, पतीपत्नीमधील वादाच्या विषयाबाबतीत वादाला कारणीभूत होत असलेल्या व्यक्तीने वेळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन आपला संसार पुनर्जीवित करण्याची दोघांनी मानसिक तयारी ठेवणे आवश्यक आहे. जरी पती अथवा पत्नी विभक्त झाल्यावर फरकतीसाठी न्यायालयात गेलेले असतील, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप झालेले असल्यामुळे ते एकत्र राहत नसतील, तरी पती पत्नी च्या पुनःश्च एकत्र येण्यासाठी समाजाने, मित्रमैत्रिणींनी, नातेवाईकांनी, त्यांच्या मुलांनी त्यांना नव्याने सुरुवात करणेकामी मार्गदर्शन आणि सहकार्य करणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस कमकुवत होत चाललेल्या विवाह संस्थेला पुन्हा बळकट करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यांचे आयुष्य आहे, आपल्याला काय करायचे, कशाला दुसर्‍याच्यामध्ये पडायचं अशी भूमिका घेण्यापेक्षा उद्या असं माझ्या घरात पण घडू शकते, माझ्या बाबतीत घडू शकत यांचे सामाजिक भान आपण सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे आणि अशा दाम्पत्यांना योग्य दिशा दाखवणे आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -