पत्रास कारण की…

Subscribe

माननीय नामदार, नारायण राणे साहेब,

स.न. वि.वि.

- Advertisement -

पत्रास कारण की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विस्तारित करण्यात आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात आपली अत्यंत सन्मानानं वर्णी लागली आणि आपल्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला. याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन…

तीन वर्षांपूर्वी आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यापासूनच अगदी अल्पावधीतच आपल्याला केंद्रात कोणतं मंत्रीपद मिळणार किंवा नव्या पक्षात आपली काय ‘व्यवस्था’ होणार याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. त्यामध्ये तुमच्या समर्थकांचा जितका वाटा होता, किंबहुना तितकाच तुमच्या टीकाकारांचाही होता. तुमच्या नव्या इनिंगबद्दल उत्कंठा होती याची अनेक कारणं आहेत. पण एक कोकणी माणूस आणि सिंधुदुर्ग जिल्हावासीय म्हणून तुमचं राजकारण, समाजकारण, यशापयश याबाबत एक विशेष आकर्षण आहे. याचं कारण तुमचा शून्य ते शतकापर्यंतचा विलक्षण प्रवास…या अचंबित करून टाकणार्‍या प्रवासामुळेच तुमच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी तुम्हाला साहेब या उपाधी पेक्षा ‘दादा’ म्हणण्यातच आनंद मानतात. आणि त्यामुळेच तुमची जनमानसाबरोबरची नाळ घट्ट होत असल्याचं गेल्या अनेक वर्षात पाहायला मिळालं. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेल्यावर तिथं तुम्ही 10 वर्षं काढलीत तरी समाधानानं रुळला नाहीत. तुमची अस्वस्थता सतत जाणवत होती, अगदी मंत्रीपदी असतानाही… काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या पक्षनिर्मितीचा प्रयोगही आपण केलात.

- Advertisement -

पण त्या अपयशी प्रयोगानंतर तुमच्या राजकारणाचा सूर्यास्त झाला अशा स्वरूपाच्या चर्चा माध्यमांमधल्या ‘प्राईम टाईम’मध्ये आणि कोकणामधल्या ‘गजालीं’ मध्ये रंगू लागल्या होत्या. खरं तर सिंधुदुर्ग हा राज्यातला सगळ्यात छोटा जिल्हा. 288 आमदारांपैकी विधानसभेत इथून फक्त तीनच आमदार निवडून जातात. पण राज्याच्या राजकारणाचा विचार करताना सिंधुदुर्ग बाजूला ठेवून विचार किंवा चर्चा करताच येत नाही. आणि याचं प्रामुख्यानं श्रेय तुम्हांला जातं. या चर्चांच्या केंद्रस्थानी तुम्हांला ठेवण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जसा तुमच्या कष्टांचा आहे तसाच तो तुमच्या वेळोवेळच्या पक्षनेतृत्वाचाही आहे. तिथे कधी स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील कधी सोनिया गांधी… तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी. ती मंडळी तुम्हाला जे काही विशेष महत्व देतात त्याचं एक वेगळं कारण तुमचा एक निरीक्षक म्हणून जे मला जाणवलं ते म्हणजे तुमच्यामधली विलक्षण ‘फायर’… कोकणी माणूस हा मूलत: आक्रमक स्वभावासाठी आणि फटकळपणासाठी ओळखला जातो या दोन्ही गुणांचा मिलाफ तुमच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळतो. याच गुणांनी भरभरून यश तुमच्या पदरी टाकलं आणि तुम्हाला रात्रीच्या रात्री जागत ठेवणारं अपयशही दिलं.

या अपयशाच्या दिवसांत अनेक जवळच्या सहकार्‍यांनी तुमच्याकडे पाठही फिरवली. काही तुमच्यावरच्या प्रेमानं सोबत राहिले तर काही राजकीय नाईलाजानं. आता पुन्हा एकदा तुम्हांला कोकणातल्याच देवादिकांनीच राजकीय ‘सेकंड इनिंग’ची संधी दिलीय. दादा, अर्थात तुमच्या वाणीचा तिखटपणा देवांना तरी कुठे सुटला…तुम्ही त्यांनाही तुमच्या समोर निवडणुका लढवण्याचं आव्हान दिलं होतंत नाही का? पण त्याच लाल मातीत तुमच्या तुलनेत खूपच सामान्य असणार्‍या वैभव नाईकांनीच तुमचा पराभव केला. हा सगळा तुमच्या आणि तुमच्यावर प्रेम करणार्‍या अनेकांच्या वेदनांचा भूतकाळ झाला, पण आता खर्‍या अर्थाने तुमची नवी इनिंग सुरू झाली आहे. आणि त्यामुळेच संपूर्ण कोकणच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र आणि देशही तुमच्याकडे एका नव्या अपेक्षेने पाहतोय. याचं कारण तुमच्याकडे आलेलं मंत्रालय. नितीन गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्याकडे असलेलं सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे मंत्रालय हे तुमच्याकडे आलं तेव्हा अनेकांना या मंत्रालयाचं काम नेमकं काय आहे हेच माहीत नव्हतं. कोविड काळात डबघाईला आलेले अनेक मोठे उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी छोट्या उद्योगांच्या मार्फतच जोर लावावा लागेल. त्यासाठी तुमचं मंत्रालय महत्वाची भूमिका बजावणार आहे.

कोकणातून राष्ट्रीय राजकारणावर आपला ठसा उमटवणारी दोन नररत्न बॅरिस्टर नाथ पै आणि मधु दंडवते यांचा आजही आदराने आवर्जून उल्लेख केला जातो. कोकण रेल्वेच्या स्थानकांवर उतरल्यावर मधु दंडवतेंच्या तसबिरीसमोर अनेकजण आजही नतमस्तक होतात. ते सगळेच जण काही दंडवतेंच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ही तर दंडवतेंनी समस्त कोकणावर आपल्या दूरदृष्टीने आणि कामाच्या आवाक्याने जे उपकार केले आहेत त्याविषयीची कृतज्ञता आहे. दंडवते आणि पै यांच्या खालोखाल सुरेश प्रभू यांना कोकणाने प्रेम दिलं. प्रभूंची राहणी, कोकणी माणसाला अभिप्रेत अशी साधीसुधी आहे. उच्चशिक्षित प्रभूंचं ज्ञान हे कौतुकास्पद आहे पण तरीही ते कोकणी माणसाशी ‘कनेक्ट’ होऊ शकले नाहीत. इथल्या माणसांशी, मातीशी कनेक्ट होणं तुम्हाला मात्र लीलया जमलं आहे. मी लीलया इतक्यासाठीच म्हणतोय की लोकांना आपलंस करण्यासाठी त्यांची भाषा बोलायला यायला हवी असं म्हणतात. तुम्हाला सफाईदार मालवणी बोलताना बघण्याचा योग आला नाही. पण याच मालवणी माणसाच्या वेदनेवर तुम्ही अनेक वर्षं ज्या आपुलकीनं फुंकर घालताय ते पाहता तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांचं राजकारण तर कठीण केलंच, पण तुमच्या दोन्ही मुलांसाठीही राजकारणाचा पेपर कठीण करुन टाकलाय. कारण कोकणातील विकास आणि इथलं राजकारण-समाजकारण यासाठी पराभवानंतर तुमचेच दाखले दिले जातात. आता तुमचे विरोधक काहीही म्हणोत, पण तुम्हांला इतिहास रचण्याची संधी विधात्यानं दिलीय.

दादा, गेली पाच दशकं कोकणातून मोठ्या प्रमाणात कोकणी माणूस मुंबईला येऊन नोकरीधंदा करत होता. ऐशीच्या दशकात कापड गिरण्या बंद पडल्यानंतर इतर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगात कोकणी माणसानं स्वतःला सामावून घेतलं, पण आता कोविडनंतर या सगळ्या उद्योगांची जी दाणादाण उडाली आहे ती पाहता शहरी भागात महागाईमुळे जगणं अनेकांना मुश्किल झालंय. साहजिकच पुन्हा एकदा गावची मीठ-भाकरी आणि तांदळाच्या पेजेबरोबर वालीची किंवा फणसाची भाजी बरी म्हणत अनेकांनी कोकण गाठलंय. मीठभाकर खाऊ पण आपल्या मातीत सुरक्षित राहू असं म्हणत मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबई, ठाणे आणि पुणे सोडून कोकणाकडे धाव घेऊ लागलेत. वर्षानुवर्षे इथली घरं-दार, शेती, बागायत बघणार्‍या कोकणातील स्थानिकांना मुंबई पुण्यातून आलेले आपले भाऊबंद नकोसे झालेत. जी गोष्ट कोकणाची तीच राज्यातील अनेक ठिकाणी दिसू लागलीय. कारण अचानक मालमत्तेचे वाटेकरी वाढलेत असं वाटतंय. सहाजिकच या भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि सामाजिक प्रश्न निर्माण झालेत.

आणि इथेच खरी तुमच्या निर्णयक्षमतेची कसोटी आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये कोविडनंतर अनेक कुशल-अकुशल कामगार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील आपल्या मूळ गावी निघून गेले. कोविडनंतर शहरात जगण्याचा संघर्ष हा पराकोटीचा झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये छोटासा उद्योगधंदा, व्यवसाय उभा करून त्यातून आपल्या कुटुंबाचे आणि आपली उपजीविका करावी इतकीच सीमित धडपड आता अनेकांनी सुरू केलेली आहे. त्यामुळेच कोकणातील सागरी पर्यटन, देवस्थानं, शेती, फलोद्यान, आरोग्य त्याचप्रमाणे कुशल आणि अकुशल कारागिरी ज्यामध्ये मूर्ती कामापासून ते लाकडाच्या कोरीव कामापर्यंत आणि वेगवेगळी वनसंपदा वेचण्यापासून ते छोट्या-मोठ्या व्यवसायापर्यंत अनेक गोष्टी कोकणी भागात करताना अनेक मंडळी दिसतात. यातल्या कित्येकांना सरकारी आर्थिक पाठिंब्यासाठी तुमच्या कार्यालयाचा दरवाजा ठोठावा लागू शकतो. अशा वेळी पक्षीय झेंडे बाजूला सारून छोट्या व्यावसायिकांना जर मदत केलीत, तर मात्र कोकणाचं रूप पालटू शकता. सिंधुदुर्गातील ओस पडलेली एमआयडीसी उद्योगधंद्याने फुलू शकली तर कोकणी माणूस तुम्हाला कधीही विसरणार नाही.

दादा, हे सगळं तुम्हाला सांगायचं कारण इतकंच की तुम्हाला विकासाचं ट्वेंटी-ट्वेंटी खेळायला मैदानावर उतरायची संधी मिळाली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार-खासदार किंवा मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करण्यात तुम्ही वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नये, असं वाटणारा एक मोठा वर्ग राज्यात आणि कोकणात आहे. वादळाच्या आधी देवबाग, तारकर्लीचं कव्हरेज करण्यासाठी मालवणला गेलो होतो. कॅमेरा, बूम बाजूला ठेवून लोकांशी अनौपचारिकपणे बोलायचा प्रयत्न केला तेव्हा अनेकांनी तुम्ही राज्यात पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाल्यावर घेतलेल्या निर्णयांची जंत्री सांगितली. तिथूनच देवबाग-तारकर्ली पर्यटनाच्या नकाशावर झळकल्याचं आजही लोकं भावूक होऊन सांगतात. कोकणात तुमच्या शैलीने तुम्ही अनेकांना श्रीमंत केलंत. कित्येकांना टेंडरामध्ये तर अनेकांना दुसर्‍यांच्या जमिनीकडे बोटं दाखवून पैसे कमावता आले. त्यामुळे झटपट श्रीमंत होण्याकडेच अनेकांचा कल आहे. अशा तरुणांना तुम्हीच खर्‍याखुर्‍या उद्योग-व्यवसायाकडे वळवू शकता. कारण मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर कोकणच्या मातीनं तुमच्यावर भरभरून प्रेम केलंय… त्याची परतफेड करण्याची हीच वेळ आहे… शाखाप्रमुख-नगरसेवक ते मुख्यमंत्री असताना वार्ड किंवा राज्य हा तुमचा कॅनव्हास होता. आज पंतप्रधान मोदींनी अख्या देशाच्या लघुउद्योगाचा कॅनव्हास तुमच्याकडे सोपवलाय…त्यात दूरदृष्टीने विकासाचे रंग भरा…हीच रामेश्वर चरणी प्रार्थना!

कोकणावर आणि कोकणी माणसावर लोभ असावा.

कळावे,
आपला,
राजेश.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -