घरताज्या घडामोडीअखेर फडणवीस महाराष्ट्राच्या चारही नव्या मंत्र्यांच्या भेटीला

अखेर फडणवीस महाराष्ट्राच्या चारही नव्या मंत्र्यांच्या भेटीला

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील चारही नवनियुक्त मंत्र्यांची भेट घेतली. या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांनी पहिल्यांदाच दिल्लीला जाऊन या चारही जणांची भेट घेतली. नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड या चारही मंत्र्यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी मंत्र्यांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. याआधीही देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यासाठी गेले होते. त्यानंतर काहीच दिवसात महाराष्ट्रातून चार मंत्रीपदांची घोषणा झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीतच या चारही खासदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यानंतरच मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील चार चेहऱ्यांना ही जबाबदारी देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून या मंत्रीपदाच्या वादामुळे मुंडे भगीनींनी नाराजी बोलून दाखवली आहे. त्यावर महाराष्ट्र भाजपकडून खुलासे होत असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यात चारही नव्या मंत्र्यांची भेट घेतली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल डॉ. भागवत कराड यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेऊन अभिनंदन केले आणि आज…

Posted by Devendra Fadnavis on Friday, July 16, 2021

- Advertisement -

 

नव्या नेमणुकींमध्ये डॉ भारती पवार यांना केंद्रीय आरोग्य खात्यामध्ये राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर फडणवीस यांच्या विश्वासू टीमपैकी एक असलेले डॉ भागवत कराड यांना अर्थमंत्रालयाची राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळालेली आहे. कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीमंडळात पंचायत राज्य विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी मिळालेली आहे. तर नारायण राणे यांना MSME मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी डॉ भागवत कराड यांना मंत्रीपदाच्या जबाबदारीसोबतच वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्या. याबाबतचे ट्विट हे डॉ भागवत कराड यांनी आपल्या अकाऊंटवरून केले आहे. रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांचेही अभिनंदन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

- Advertisement -

भाजपमधील ओबीसी चेहरा आणि वंजारी समाजाचा नेता म्हणून महाराष्ट्र भाजपनेही भागवत कराड यांना मंत्रीपद देण्याच टायमिंग साधले. महापैर पदावरून थेट राज्यसभेच्या खासदार पदावर वर्णी लागलेल्या डॉ भागवत कराड यांना महाराष्ट्रातून यंदाच्या नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात जागा मिळाली. देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून भागवत कराड यांची ओळख आहे. तर दुसरीकडे मुंडे भगिणींना शह देण्यासाठीही डॉ भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची राज्यभर चर्चा आहे.

नारायण राणे यांच्या निमित्ताने शिवसेनेला शह देण्यासाठीची खेळी म्हणून कॅबिनेट मंत्रीपदाची माळ राणे यांच्या गळ्यात पडली. भाजपकडून राणे यांचे बळ वाढवण्यासाठीचा हा प्रयत्न एक प्रकारे त्यांना राजकारणात पुन्हा एकदा अधिक सक्षम करण्याचाच प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील नेतृत्वामुळेच नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्रीपद दिले गेल्याची चर्चा आहे.

कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास म्हणजे भिवंडी तालुक्यातील दिवे अंजुर गावचे सरपंच पदापासून सुरूवात केली. २०१४ च्या तोंडावर कपिल पाटील यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतर लागोपाठ भिवंडी लोकलसभा मतदार संघातून २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -