घरताज्या घडामोडीबळीराजाच्या प्रश्नासाठी प्रसंगी राजीनामा देईन

बळीराजाच्या प्रश्नासाठी प्रसंगी राजीनामा देईन

Subscribe

राज्यमंत्री बच्चु कडुंचा प्रहार, कृषी कायद्यांना विरोध

कृषी कायद्यांना संपूर्ण देशातून विरोध होत आहे. देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरीदेखील केंद्र सरकार शेतकर्‍यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही. शेतकर्‍यांच्या या आंदोलनाला सरकार कमी लेखत आहे. त्यांना वाटत आहे की, हे आंदोलन फक्त पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी करत आहेत. खरं तर या आंदोलनात संपूर्ण देशभरातील शेतकरी सहभागी आहे. परंतु वेळ पडली तर आपणही रस्त्यावर उतरू इतकंच नाही तर शेतकरी हिताला प्राधान्य देत प्रसंगी राजीनामा राजीनामाही देईल असे प्रतिपादन प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष तथा राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडु यांनी केले.

नाशिक येथे आयोजित प्रहार जनशक्तीच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत केंद्र सरकारवर प्रहार केला. केंद्राने हे कायदे शेतकर्‍यांवर जबरदस्तीने लादले आहे मात्र शेतकरी बांधव मागे हटणार नाही. आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावर मार्गदर्शन केले. शेतकर्‍याचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज आहे. याबाबत भविष्यात एक चिंतन शिबीर आपण घेणार आहोत. या शिबीरातून येणार्‍या सुचना सरकारकडे मांडू असे ते म्हणाले. केंद्राने कृषी कायदे मंजूर केले असले तरी, आमचा लढा हा सुरूच राहणार आहे. वेळ पडली तर रस्त्यावरही उतरू असा इशारा देतांना बळीराजासाठी प्रसंगी राजीनामा देण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष शरद शिंदे, दत्तू बोडके, संतोष गायधनी, कमलाकर शेलार, गणेश निबांळकर, हरीभाऊ महाजन, अमजद पठाण, दिलीप दिघे, संध्या जाधव, प्रमोद सोनकांबळे, गोकुळ कासार, संतोष माळोदे आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.

- Advertisement -

कितीही गुन्हे दाखल होऊ द्या, मागे हटणार नाही
नाशिक महापालिकेच्या आयुक्तांवर धावून गेल्याप्रकरणी बच्चु कडु यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हाच धागा पकडत ते म्हणाले की, काही अधिकार्‍यांना वाटत असेल बच्चु कडुंवर गुन्हा दाखल झाला म्हणजे कार्यकर्ता थांबला. पण असा गैरसमज होऊ देऊ नका. समुद्राच्या लाटेला दाबायला गेले तर ती लाट तुम्हाला दाबुन टाकेल. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा मी आमदार होतो आज मी राज्यमंत्री आहे. आजपर्यंत माझ्यावर ३५० गुन्हे दाखल झाले २५ ते ३० ३५३ चे गुन्हे दाखल झाले. मी याची पर्वा करत नाही शेतकरी आणि अपंग बांधवांच्या न्याय हक्कासाठी मी लढतच राहणार. पुढील ३० तारखेला पुन्हा नाशिकमध्ये येऊन आढावा घेणार असल्याची तंबीच यावेळी त्यांनी अधिकार्‍यांना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -