घरफिचर्सआठवण बाबांची.. साठवण वात्सल्याची..

आठवण बाबांची.. साठवण वात्सल्याची..

Subscribe

शिमग्याच्या दिवसात मुंबईच्या घरी एखादा गोमूचा नाच आला तर त्यातील मंडळी बाबांना एखादे तरी गाणे म्हणण्याचा आग्रह करीत आणि बाबाही आढेवेढे न घेता आनंदाने गाणे म्हणत असत. गोष्टसुद्धा बाबा छान रंगवून सांगत असत. पुढील शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे महत्त्वाचे कार्य अगदी सहजपणे त्यांनी केले. हल्ली अगदी बालवयातच मुलांना नर्सरीत पाठवून ती जबाबदारी दुसरीकडे ढकलली जाते असे चित्र दिसते.

सुख हे मानण्यावर असते असे संतांनी सांगून ठेवले आहे. त्याप्रमाणे आचरण केले तर सुखी माणसाचा सदरा शोधायला लांब जायला नको. तुमच्या अंगात तो आपोआपच येतो. परंतु संतांची ही विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर आपल्या जीवनावर दोन वंदनीय संतांचा फार मोठा प्रभाव पडतो. या संतांच्या मार्गदर्शनाखालीच आपल्या आयुष्याची जडणघडण होत असते. आई आणि बाबा हे दोन थोर संत. आम्हा पाच भावंडांनाही याच संतांकडून सुखी कुटुंबाची सूत्रे प्रत्यक्ष आचरणातून मिळाली आणि ती संस्कारशिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरणारी आहे. यातील आमचे बाबा म्हणजे कै. काशीराम सदाशिव गुंडये.

आमच्या बाबांचे बालपण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नडगिवे या गावी गेले. चौथीपर्यंत शिक्षण. नोकरीनिमित्त कोकणातून मुंबईत आले आणि ताडदेवच्या नवी जायफळवाडी येथे घर बांधून स्थायिक झाले. गावी त्यांना सर्वजण आबा म्हणत. हीच ओळख मुंबईतही कायम राहिली आणि इकडेही त्यांना आबा म्हणूनच संबोधले गेले. कथा-कादंबर्‍यात निर्व्यसनी माणसाचे वर्णन करताना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसणारा असे केले जाते. आमचे बाबाही असेच, पूर्णपणे निर्व्यसनी. स्वत:चे शिक्षण चौथीपर्यंत झाले असले तरी आम्हा भावंडांच्या शिक्षणाची आबाळ होऊ दिली नाही. अक्षरांची ओळख सुरुवातीला त्यांनीच करुन दिली. ‘छान किती दिसते फुलपाखरु’ ही कविता तर ते आम्हाला चालीत म्हणून दाखवायचे. त्यामुळे ती कविता अजूनही लक्षात आहे. कोकणात शिमग्यातील गोमूचा नाच प्रसिद्ध आहे. त्यातील बरीच गाणी त्यांना येत होती. ती ते आम्हाला म्हणून दाखवत असत.

- Advertisement -

शिमग्याच्या दिवसात मुंबईच्या घरी एखादा गोमूचा नाच आला तर त्यातील मंडळी बाबांना एखादे तरी गाणे म्हणण्याचा आग्रह करीत आणि बाबाही आढेवेढे न घेता आनंदाने गाणे म्हणत असत. गोष्टसुद्धा बाबा छान रंगवून सांगत असत. पुढील शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे महत्त्वाचे कार्य अगदी सहजपणे त्यांनी केले. हल्ली अगदी बालवयातच मुलांना नर्सरीत पाठवून ती जबाबदारी दुसरीकडे ढकलली जाते असे चित्र दिसते. प्रसंगी ते काम करत असलेल्या गिरणीच्या सोसायटीतून कर्ज काढून आमचे शिक्षण पूर्ण केले. या कर्जाची परतफेडही वेळेवर केली. त्यामुळेच सर्वांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊन पुढच्या आयुष्याला यशाची झालर लागलेली आहे.

मुंबईत आल्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर फक्त स्वत:चा विचार न करता गावातील कोणी नातेवाईक मुंबईत आला तर त्याच्या उमेदीच्या काळात जेवणाची, राहण्याची सोय आमच्याच घरात त्यांनी केली. त्यामुळे घरात सतत नातेवाइकांचा राबता असे. राहणी अगदी साधी. त्यामुळे गिरणीत नोकरी करेपर्यंत त्यांचा पोशाख आखूड बाह्यांचा शर्ट आणि खाकी हाफ पँट असाच राहिला. गिरणी कामगार असल्यामुळे गिरणीत काम करताना तोच पोशाख सोयीस्कर होता. पूर्ण बाह्यांचा शर्ट व पूर्ण विजार फारच क्वचित घातली गेली. गरजवंतांना आर्थिक मदत करण्यात तर ते नेहमीच पुढे असत. त्या केलेल्या आर्थिक मदतीचा लेखाजोखा मात्र कधीच ठेवला नाही. एका हाताने केलेले दान दुसर्‍या हाताला कळता कामा नये असे म्हटले जाते. इथे आमच्यासमोर त्याचे प्रत्यक्ष उदाहरण होते.

- Advertisement -

सगळीकडे आबा म्हणून ओळखले जाणारे बाबा तसे सगळ्यांना कडक शिस्तीचे वाटत. तसे ते होतेही. परंतु तितकेच ते सरळ स्वभावाचे होते. आत एक आणि बाहेर एक असे त्यांचे काहीही नव्हते. आणि त्यामुळेच ते अजातशत्रू होते. आई गेल्यानंतर मात्र ते खचले. संसाररथ दोन चाकावर धावत असतो. त्यातील एक चाक निखळून पडल्यानंतर रथाचे धावणे बंद होते. अगदी तसेच बाबांचे झाले. नातवंडात ते मन रमवू लागले तरी आतून मात्र त्यांना आईची उणीव प्रकर्षाने जाणवत असावी. त्यातच संपूर्ण आयुष्यात कधीही डॉक्टरची पायरी न चढलेल्या बाबांना उतारवयात मात्र दवाखाना पाहावा लागला आणि आईसारखाच त्यांनीही इहलोकाचा निरोप हॉस्पिटलमध्येच ३ ऑगस्ट २०१३ रोजी घेतला.आईपाठोपाठ बाबाही निघून गेल्यामुळे आमचा आधारस्तंभच निखळून पडला. काळ पुढे सरकल्यानंतर आम्ही भावंडे सावरलो. बाबा स्मृतीरुपाने अजूनही आम्हा भावंडांसोबत आहेत हे मात्र नक्की.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -