घरदेश-विदेशअहो, म्हणूनच... लहान मुलं झाली लठ्ठ!

अहो, म्हणूनच… लहान मुलं झाली लठ्ठ!

Subscribe

पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, वेफर्स यासारखे खाणे अधूनमधून होत असल्याने वाढतेय वजन

रत्नाकर पाटील, अलिबाग
लहान मुले सध्या मैदानी किंवा बाहेर जाऊन खेळणे विसरले असून, सतत टीव्ही आणि मोबाईलसमोर बसत आहेत. दिवसभरात पिझ्झा, बर्गर, कुरकुरे, वेफर्स यासारखे खाणे अधूनमधून होत असल्याने अनेक मुलांच्या शरीरावर त्याचा विपरित परिणाम होऊन त्यांचे वजन वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे मुलांना सकस आहार खायला द्या, कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने सुरक्षा उपयांची अंमलबजावणी करून त्यांना बाहेर खेळू द्या, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळांना कुलूप लागले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे या वर्षीही ऑनलाईन शिकवणीचे धडे मुलांना गिरवावे लागत आहेत. त्यामुळे किमान तीन ते चार तास मुलांना मोबाईल, लॅपटॉपसमोर बसावे लागत असल्याने मुले आधीच कंटाळून जातात. त्यामुळे खेळायला बाहेर पडणे ते विसरले आहेत. शरीराची हालचाल होत नाही. त्यातच पिझ्झा, बर्गर, वडापाव, कुरकुरे, वेर्फस खाण्यावर मुलांचा भर असतो. त्याचा विपरित परिणाम मुलांचे वजन वाढण्यावर होत आहे. वजन वाढल्याने मुलांच्या शारीरिक तक्रारींत वाढ झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मान, डोळे, डोके दुखणे असे प्रकार समोर येत आहेत. पालकांनी आपल्या मुलांना पोषक आहार खायला द्यावा, बाहेरचे खाद्यपदार्थ देणे बंद करावे, खेळण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

वजन वाढण्याचे कारण

ऑनलाईन शिक्षणामुळे मुले सतत टीव्ही, मोबाईलसमोर बसतात. टीव्ही बघत जेवण करतात. जेवणामध्ये सकस आहार घेत नाहीत. कोरोनामुळे घरातच असल्याने बाहेर जाऊन खेळ खेळणे ते विसरले आहेत. पिझ्झा, बर्गर, वेफर्स, कुरकुरे असे पदार्थ खाण्यावर भर देतात.

वजन कमी करण्यासाठी घ्या काळजी..

ऑनलाईन शिकवणीनंतर मुलांना कोरोनाचा नियम समजावून बाहेर खेळण्यास पालकांनी मुभा देणे गरजेचे आहे. बाहेर जाता येत नसेल तर घरातच मुलांना खेळायला सांगणे. सतत टीव्ही, मोबाईलसमोर बसून राहू नये. चटपटीत खाण्याऐवजी नेहमीच प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यासाठी द्यावेत.

ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांकडे मोबाईल द्यावा लागतो. कोरोनामुळे सर्वच बंद असल्याने मुलांना घराबाहेर खेळण्यास पाठवता येत नाही. त्यामुळे ते सातत्याने टीव्ही आणि मोबाईलसमोर अधिक वेळ असतात.  – हेमंत मोकल, पालक

कोरोनामुळे मुले घरातच असतात. त्यांना बाहेर कसे सोडायचे, अशी भीती सातत्याने मनात असते. सध्या ऑनलाईन शिकवणीमुळे मुले अधिक वेळ मोबाईल, लॅपटॉपवर असतात. नकळत ते विविध गॅझेटच्या आहारी जात आहेत.  – बिपीन ठाकू, पालक

ऑनलाईन शिक्षणामुळे जास्तीजास्त वेळ मोबाईल, टॅब, लॅपटॉपसमोर ही मुले असतात. कोरोनामुळे कोणतेच पालक आपल्या मुलांना बाहेर सोडत नसल्याने मुले टीव्हीसमोर बसतात. त्याच ठिकाणी जेवण जेवतात. शारीरिक खेळापासून लांब राहतात. तसेच त्यांना बॅलन्स डायट देणे गरजेचे आहे. जंक फूड देऊ नये. आहारात प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. – डॉ. विनायक पाटील, बालरोग तज्ज्ञ

मुलांना इंडोर गेम खेळण्यास प्रवृत्त करावे, पालकांनीही त्यांच्यासोबत मिसळावे. मुलांचे फास्ट फूड बंद करावे. शरीराला पोषक असणारे पदार्थ द्यावेत. हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, ज्युस, फळे खायला द्यावीत. मुलांसोबत पालकांनीही व्यायामात सहभाग घ्यावा. त्यामुळे त्यांना प्रेरणा मिळेल.
– डॉ. राजेंद्र चांदोरकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -