घरमनोरंजन‘माइंडहंटर’ : भेद्य नायकाच्या मानसिकतेचा मागोवा

‘माइंडहंटर’ : भेद्य नायकाच्या मानसिकतेचा मागोवा

Subscribe

मुख्य व्यक्तिरेखेत असलेल्या अभिनेत्याच्या ऑन आणि ऑफ स्क्रीन प्रतिमेचे भान राखत, त्याच्या पात्राला थेट कृष्ण किंवा धवल दाखवत आणि नायक विरुद्ध खलनायक असा लढा उभा करत मानवी स्वभावाचे अतिसुलभीकरण करण्याचा प्रयत्न जवळपास सर्वच चित्रपटांमध्ये दिसून येतो. अगदी पाश्चिमात्य चित्रपटही त्याला अपवाद नाहीत. त्यामुळे केवळ कृष्ण किंवा धवल नसलेली पात्रं तशी अपवादात्मक परिस्थितीत आढळतात. या पार्श्वभूमीवर डेव्हिड फिंचर या दिग्दर्शकाच्या चित्रपटांतील पात्रं नेहमी उजवी ठरतात.

‘माइंडहंटर’ ही नेटफ्लिक्सवरील मालिकाही तशीच. अर्थात ती सर्वस्वी फिंचरची नाही. कारण जो पेनहॉलने क्रिएट केलेली; असिफ कपाडिया, अँड्र्यू डग्लस, टॉबियास लिंडहॉम आणि डेव्हिड फिंचर यांनी आलटून पालटून दिग्दर्शित केलेले एपिसोड्स अशी तिची रचना असली तरीही तिच्यावर फिंचरच्या दिग्दर्शकीय शैलीचा न पुसता येणारा प्रभाव आहे.

दशक आहे 1970 चे. स्थळ आहे एफबीआयची एक इमारत. एक तरुण एफबीआय अधिकारी नव्याने रुजू झालेल्या अधिकार्‍यांना ‘फिल्ड वर्क’साठीची तयारी म्हणून गुन्हेगारांना मानसिक पातळीवर शांत करून कसे हाताळावे हे शिकवत आहे. आपल्याच वयाचा एक माणूस आपल्याला शिकवतो आहे या भावनेने कुणीही त्या व्यक्तीकडे फारसे लक्ष देत नाही. लेक्चर संपल्याची बेल वाजल्यानंतर सगळे लोक अस्ताव्यस्तपणे बाहेर पडतात. तो तरुण अस्वस्थपणे बाहेर येतो. समोरच्या रूममध्ये एक वयस्कर व्यक्ती शिकवत असते आणि वेळ उलटून गेल्यानंतरही सर्व लोक तिथे थांबलेले असतात हे तो पाहतो. एकाच दृश्यात त्या तरुणाची महत्त्वाकांक्षी प्रवृत्ती आपल्या लक्षात येते.

- Advertisement -

‘एफबीआय’ कँटीनमध्ये बसलेला असताना एक वयस्कर एजंट त्याच्याजवळ येतो. एजंट बिल टेंच (हॉल्ट मॅक’कॅलनी) म्हणून स्वतःची ओळख करून देतो. तो तरुणही एजंट होल्डन फोर्ड (जोनाथन ग्रॉफ) म्हणून स्वतःची ओळख सांगतो. टेंच प्रशिक्षणाव्यतिरिक्त स्थानिक पोलीस अधिकार्‍यांना गुन्हेगारांच्या हाताळणीबाबत अधिक जागरूक करण्याचे काम करत असतो. ज्याचे स्वरूप रोड शोसारखे आहे. फोर्डची नुकतीच प्रशिक्षण विभागात बदली झालेली असते. ज्याला कारण यापूर्वीच्या दृश्यातील एक क्राइम सीन आहे. याखेरीज आधी उल्लेख केल्याप्रमाणे त्याची महत्त्वाकांक्षा त्याला अधिक वेगळे काहीतरी करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. नाईलाजामुळे फिल्ड वर्कवरून प्रशिक्षण विभागात झालेल्या बदलीनंतर टेंचच्या या प्रस्तावामुळे फोर्डला जणू आशेचा एक नवीन किरण गवसतो आणि एफबीआयच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाच्या (सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन काहीशा नाट्यपूर्ण केलेल्या) प्रकरणाला सुरुवात होते.

एजंट फोर्डच्या मानसिकतेचे विभाजन करण्यापूर्वी ‘माइंडहंटर’ची आणि तीत दाखवलेल्या कालखंडाची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे. तर 1970 चा काळ म्हणजे संगणक आणि इतर यंत्रांच्या बर्‍याच पूर्वीचा काळ. या दशकादरम्यान अमेरिका एक राष्ट्र म्हणून सामाजिक तसेच सांस्कृतिक पातळींवर बर्‍याच उतार चढावांतून जात होती. ज्याचे दर्शन अमेरिकेतील वाढत्या गुन्हेगारीच्या रूपात दिसून येत होते. ‘एफबीआय’सारखी संस्था प्रबळ आणि सामर्थ्यशाली असल्या तरी या काळात गुन्हेगारांच्या मानसिकतेच्या अभ्यासाची यंत्रणा प्रबळ तर नव्हतीच. त्याकडे गांभीर्याने पाहिलेही जात नव्हते. त्यामुळे गुन्हेगारी विश्वाकडे पाहण्याचा पारंपरिक रूपातील दृष्टीकोन अजूनही दिसून येत होता.

- Advertisement -

याच काळात चार्ल्स मॅन्सनसारखे गुन्हेगार उदयास होते. त्यांचा उल्लेख करताना आता म्हटली जाते ती संज्ञा, ‘सीरियल किलर’देखील अजून अस्तित्त्वात आलेली नव्हती. (जी पुढे जाऊन सर्वप्रथम एजंट टेंचच्या माध्यमातून अस्तित्त्वात येते.) ‘माइंडहंटर’ याच काळातील एफबीआय आणि खासकरून त्यातील दोन एजंट्सनी एफबीआयच्या ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’ विभागात आणलेल्या बदलांची कथा समोर घेऊन येते. जी ‘माइंडहंटर : इनसाइड एफबीआय’ज एलाइट सीरियल क्राईम युनिट’ या जॉन डग्लस आणि मायकल ओलशेकर या दोन माजी एफबीआय एजंट्सनी त्यांनी डेव्हलप केलेल्या ‘क्रिमिनल सायकॉलॉजी’ आणि ‘बीहेवोरियल सायन्स युनिट’बाबतच्या सत्य घटनांवर आधारित पुस्तकावर बेतलेली आहे.

फोर्ड आणि टेंच वर उल्लेख केलेल्या दोन खर्‍याखुर्‍या एजंट्सवर आधारित असलेल्या व्यक्तिरेखा आहेत. फोर्डबाबत बोलायचे झाल्यास टेंचच्या प्रस्तावाला होकार देऊन तो रोड शोवर निघतो. या दरम्यान एका कामगिरीनिमित्त हे दोघे ‘एड केम्पर’ (कॅमेरॉन ब्रिटर) या गाजलेल्या आणि सदर मालिकेतील पहिल्या आणि महत्त्वाच्या ‘सीरियल किलर’ला जेथे कैद केलेले आहे त्या भागात आलेले असतात. जिथे फोर्डच्या मनात केम्परची मुलाखतवजा भेट घेण्याची कल्पना येते आणि तो तसे करतो. यामुळे होते असे की फोर्डच्या जिज्ञासू वृत्तीला केम्परकडे असलेल्या माहितीच्या खजिन्याची कल्पना येते. ज्यातून आपण इतरही गुन्हेगारांच्या मानसिकतेचा आढावा घेऊ शकतो, असा त्याला विश्वास असतो. काही वेळा नकार दिल्यानंतर टेंचदेखील त्याला सामील होतो.

फोर्ड आणि टेंचच्या या उपक्रमात केम्पर तसेच इतर गुन्हेगारांच्या मुलाखतींसोबतच स्थानिक पोलीस यंत्रणेला मानसिकरित्या विकृत गुन्हेगारांना शोधून काढण्यात मदत करण्याचाही समावेश आहे. त्यामुळे यातील मूळ कथानकाला त्यांचे वैयक्तिक आयुष्य, गुन्ह्यांची उकल अशा उपकथानकांचीही जोड आहे. यातील एका गुन्ह्याच्या उकलीनंतर जेव्हा फोर्डची स्तुती आधुनिक ‘शेरलॉक’ अशा प्रकारे केली जाते तेव्हा त्याच्या डोळ्यात दिसणारी विलक्षण चमक; पुढे आणखी एका स्टेशनमधील एका अधिकार्‍यासोबत बारमध्ये बसलेले असताना फोर्डने बांधलेले आत्मस्तुतीचे मजले पाहून सुरुवातीच्या काळातील बुजरा होल्डन ते आता तयार झालेला, मुरलेला एजंट फोर्ड असा प्रवास म्हणजे एखाद्या पात्राचा एक व्यक्तिमत्त्व म्हणून झालेला प्रवास अचंबित करणारा आहे. ज्यानंतर फोर्डच्या पात्राला काहीशी ग्रे शेड बहाल करून काहीशा क्लिफहँगर स्वरूपात मालिकेचा पहिला सीझन संपतो. एकूणच बहुतांशी लोकांना पहायला त्रासदायक वाटणारी ‘माइंडहंटर’ ही मालिका तिच्या एकूणच पात्रांच्या, त्यातही नायकाच्या मानसिक प्रवासासाठी पहावी अशी आहे.

– अक्षय शेलार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -