घरताज्या घडामोडीमहाड आगाराच्या मनमानीचा पोलादपूरला त्रास!

महाड आगाराच्या मनमानीचा पोलादपूरला त्रास!

Subscribe

उत्पन्ना अभावी फेर्‍या बंद ठेवाव्या लागत असल्याचे आगाराकडून ऐकविण्यात येत असते.

पोलादपूर  येथील एसटी बस स्थानकाचे व्यवस्थापन महाड आगाराकडे असून, सर्वत्र गाड्या सुरू करण्यात आल्या असताना आगार व्यवस्थापनाने या तालुक्यात केवळ तीन वस्तीच्या गाड्या सुरू करून प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसण्याचे चोख कामगिरी बजावल्याची तिरकस प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम, अतिदुर्गम भागातील गावांपर्यंत एसटीच्या सेवेचे जाळे विणलेले आहे. हात दाखवू तेथे उभी राहाणारी, वृद्धांना अर्ध्या तिकीटात नियोजित स्थळी पोहचवणारी, प्रसुतीसाठी निघालेल्या एखाद्या महिलेला सुखरूप नेणारी किंवा प्रसंगावधान राखून आडरानात बसमध्येच त्या महिलेच्या प्रसृतीची व्यवस्था करून बाळ-बाळंतीणीला सुखरूप रुग्णालयात दाखल करणारी असादाखल करणारी असा एसटीचा नावलौकीक आहे किंबहुना म्हणूनच ग्रामीण प्रवशांसाठी एसटी आपली वाटत असते.

मागील वर्ष सव्वा वर्षांत कोरोना महामारीच्या संकटामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना खासगी वाहन किंवा रिक्षाचा आधार घेत तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र ठिकाणी जायचे झाले तर त्याकरिता भरमसाठ भाडे देऊन सुरक्षिततेची हमी न देणारा प्रवास करावा लागत असे. त्यामुळे हे प्रवासी एसटी बस सुरू होण्याची चातकाप्रमाणे वाट होती. परंतु महाड आगाराने पोलादपूर ते कोतवाल, पोलादपूर ते कुडपण आणी पोलादपूर ते ओंबळी या केवळ तीन वस्तीच्या गाड्या सुरू केल्या आहेत. स्वाभाविक ६ वस्ती गाड्यांच्या मार्गावरील, तसेच जवळपास असणार्‍या गावातील प्रवाशांवर अन्याय करण्यात आला आहे.

- Advertisement -

त्यामुळे संतापलेल्या ग्रामीण भागातील प्रवाशांकडून ‘आम्ही कोणाचं घोडं मारलं म्हणून गोरगरीबांना परवडणार्‍या एसटी सेवेपासून महाड आगार व्यवस्थापनाने आम्हाला वंचित ठेवले’, असा जाहीर जाब विचारला जात आहे. याबाबत प्रवासी सांगतात की उत्पन्ना अभावी फेर्‍या बंद ठेवाव्या लागत असल्याचे आगाराकडून ऐकविण्यात येत असते. मुळातच बस वेळेवर येत नसतील तर उत्पन्न कसे मिळणार, असा सवाल प्रवासी विचारत आहेत. दरम्यान, बंद असलेल्या फेर्‍या टप्प्याटप्प्याने सुरू करणार असल्याचे महाड आगार प्रमुख शिवाजी जाधव यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – बीडीडी रहिवाशांना स्टॉम्प ड्यूटी फक्त १ हजार रुपये, कॅबिनेटचा निर्णय

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -