घरफिचर्सनिसर्गरम्य मुक्तागिरी...

निसर्गरम्य मुक्तागिरी…

Subscribe

अतिशय ऐतिहासिक अशा या जैन धर्मियांच्या तिर्थस्थळांबद्दल अशी आख्यायिका आहे की येथे साडे तीन करोड जैन मुनींना मुक्ती मिळाली होती. याचा उल्लेख जैन बांधवांच्या पौराणीक ग्रंथामध्ये केलेला आहे.यावरूनच या स्थळाचे नाव मुक्तागिरी पडले असल्याचे बोलले जाते. ही सर्व मंदिरे सोळाव्या शतकातील असल्याचे बोलले जाते. या सर्व मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी एकूण २५० (अडिचशे) पायर्‍या चढून जावे लागते.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या बॉर्डरवर असलेल्या बैतुल येथील मुक्तागिरी हे जैन धर्मियांचे पावन तिर्थस्थळ मानले जाते. मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर जरी हे स्थळ असले तरी, विदर्भातील अमरावती जिल्ह्यापासून हे स्थळ अवघ्या दीड – दोन तासांच्या अंतरावर आहे. सातपुडा पर्वतांच्या सानिध्यात वसलेले हे तिर्थस्थळ अतिशय नयनरम्य आहे. ४०० फुट उंच पर्वतावर वसलेली येथील मंदीरे आणि धबधबे तुमच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फेडतात. शेकडो वर्षे पुर्वीच्या इतिहासाची पार्श्वभूमी असलेली ही सर्व मंदिरे पांढर्‍या शुभ्र रंगाची असून हिरव्यागार पर्वतांवर खूपच उठून दिसतात. दुरून बघितले तर हिरव्यागार पर्वतांवर पांढर्‍या शुभ्र खडूने रेखाटल्यासाऱखा भास होतो.

मुक्तागिरीला ‘जैन धर्मीयांची काशी’ असेही म्हणतात. सातपुडा पर्वतरांगांमध्ये असलेल्या मुक्तागिरीला जैन धर्मियांची पुरातन ५२ मंदिरे आहेत. देश-विदेशातून येथे मोठ्या प्रमाणात जैन बांधव वर्षभर दर्शनासाठी येतात. मुक्तागिरी हे जैन धर्मियांचे सिद्धक्षेत्र जरी असले तरी तेथील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी विविध धर्मांतील पर्यटक गर्दी करतात. येथे प्रत्येक आठवड्यातील रविवार वगळता प्रवेश सुरू राहतो.

- Advertisement -

येथील सर्व मंदिर वेगवेगळ्या शतकांतील असून, काही पंधराव्या तर काही सोळाव्या शतकातील अतिप्राचीन मंदिरे ४०० फूट उंच पर्वतावर आहेत. एक हजार वर्षांपूर्वीची भगवान पार्श्वनाथाची मूर्ती या ठिकाणी आहे. शिल्पकलेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुक्तागिरीचा उल्लेख होतो.

केशर आणि चंदनमिश्रीत पाण्याची वृष्टी होण्यामागे देखील एक कहानी आहे. असे म्हटले जाते की इथे एक मुनी ध्यान करत असताना त्यांच्यापुढे एक मेंढी (शेळी) मृत पावली. तेव्हा त्या मुनींनी त्या मेंढीच्या कानात नमोकार मंत्र म्हटला, त्यामुळे ती मेंढी जिवंत झाली आणि एक देवता बनली. तेव्हापासून या स्थानाला मेंढागिरी सुध्दा म्हटले जाते. त्या दिवसाला येथील लोक निर्वाण दिवस असे सुद्धा म्हणतात. ज्या दिवशी ही घडना घडली तेव्हा देवी-देवतांनी येथे केशर आणि चंदन मिश्रित पाऊस पाडला होता.

- Advertisement -

तेव्हापासून आजतागत येथे प्रत्येक अष्टमी, पौर्णिमा आणि चौदसला केशर, चंदनाचा वर्षाव होतो. दिवाळीनंतर येणार्‍या पहिल्या पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. असे म्हणतात की जर कुणी भक्त पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान करून या ठिकाणी गेले तर परत येताना त्यांच्या वस्त्रांचा रंग पिवळा झालेला दिसतो.
कसे जायचे ?

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरापासून अवघ्या १५ किमी अंतरावरील मुक्तागिरी सिद्धक्षेत्र मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यांतर्गत भैसदेही तालुक्यात येते. अमरावतीवरून डायरेक्ट प्रायव्हेट गाडी करून गेले असता अवघ्या दीड- २ तासात पोहचता येते. तसेच एसटी महामंडळाच्या बस सेवेचा देखील लाभ घेता येतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -