घरमहाराष्ट्रराष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच, शिवसेनेने जावेद अख्तरांना फटकारले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी करणे अयोग्यच, शिवसेनेने जावेद अख्तरांना फटकारले

Subscribe

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे. या वादात शिवसेनेने उडी घेत जावेद अख्तर यांना फटकारलं आहे. ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? असा प्रश्न उपस्थित करतानाच मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही, असं म्हणत अख्तर यांनी तालिबानशी केलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही चुकीचं असल्याचं मत ‘सामना’च्या अग्रलेखामधून व्यक्त करण्यात आले आहे.

“जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. देशात जेव्हा जेव्हा धर्मांध, राष्ट्रद्रोही विकृती उसळून आल्या त्या प्रत्येक वेळी जावेद अख्तर यांनी त्या धर्मांधांचे मुखवटे फाडले आहेत. धर्मांधांची पर्वा न करता त्यांनी ‘वंदे मातरम्’चे गान केले आहे. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

- Advertisement -

“संघाची भूमिका व त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल? अफगाणिस्तानात निर्घृण तालिबान्यांनी जो रक्तपात, हिंसाचार घडविला आहे व मनुष्यजातीचे पतन चालविले आहे, ते काळजाचा थरकाप उडविणारे आहे. तालिबान्यांच्या भीतीने लाखो लोकांनी देश सोडला आहे, महिलांवर अत्याचार सुरू आहेत. अफगाणिस्तानचा नरक बनला आहे. तालिबान्यांना तेथे फक्त धर्माचे म्हणजे शरीयतचेच राज्य आणायचे आहे. आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे,” असं सामनामध्ये शिवसेनेने म्हटलं आहे.

तर ते तालिबानी कसे?

“अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे हिजडेगिरी करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे? कश्मीरातून 370 कलम हटविले. त्यामुळे कश्मीरचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. हा श्वास पुन्हा बंद करा, अशी मागणी करणारे लोकच तालिबानी आहेत. कश्मिरी पंडितांची घरवापसी होणे गरजेचे आहे. त्यावर कोणाचेही मतभेद असता कामा नयेत. मागच्या काळात ‘बीफ’ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली कोणताही उन्माद येथे मान्य नाही. इराणमध्ये खोमेनीचे राज्य होते व आता अफगाणिस्तानात तालिबान्यांचे राज्य आले. या दोन्ही राजवटींशी हिंदुत्वाचा संबंध जोडणे हा हिंदू संस्कृतीचा अपमान ठरतो,” असं मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -