घरताज्या घडामोडीदसरा मेळाव्यात भाजप लक्ष्य?, शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता

दसरा मेळाव्यात भाजप लक्ष्य?, शिवसैनिकांमध्ये मुख्यमंत्री ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता

Subscribe

शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत ऐतिहासिक मानला जाणारा दसरा मेळावा शुक्रवारी माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्ष भाजपला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पुढील वर्षाच्या सुरुवातीला राज्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकेसह, अनेक नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुका शिवसेनेसाठी महत्वाच्या आहेत. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्याने आजच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवाजी पार्कच्या मैदानावर होतो. मात्र, गेल्या वर्षी कोरोना संसर्गामुळे दसरा मेळावा दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात पार पडला होता. या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले होते. यंदा कोरोनाचा विळखा सैल झाल्याने दसरा मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कोरोना नियमावलीमुळे हा मेळावा ५० टक्के उपस्थित होणार आहे. या मेळाव्याला शिवसेना नेते, उपनेते, खासदार, आमदार आणि संपर्कप्रमुख असे मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलकर्त्या शेतकऱ्यांवर भाजप मंत्र्याच्या मुलाने घातलेली गाडी, शिवसेना मंत्री, पदाधिकाऱ्यांची मागे लागलेला केंद्रीय चौकशी यंत्रणेचा ससेमिरा, भाजपच्या नेत्यांकडून आघाडीच्या नेत्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या कारभारावर सातत्याने होत असलेली टीका, शेतकऱ्यांना मदत, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांना हात घालत उद्धव ठाकरे भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कदम, गीते यांच्या उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी मंत्री रामदास कदम यांच्या दसरा मेळाव्यातील उपस्थितीविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे.


हेही वाचा : मराठीच्या नावाने शिवसेनेला टार्गेट करणाऱ्या भाजपचे ८२ पैकी ४४ नगरसेवक अमराठी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -