घरताज्या घडामोडीअवकाळी पावसामुळे पेण खारेपाटातील शेती पाण्यात 

अवकाळी पावसामुळे पेण खारेपाटातील शेती पाण्यात 

Subscribe

उघाडीचे दरवाजे तुटल्याचा परिणाम

ऐन दिवाळीमध्ये सलग दोन दिवस अवकाळी पाऊस पडल्याने तालुक्यातील खारेपाट भागातील कापणी लायक तयार झालेले भाताचे पीक मळणीद्वारे रचून ठेवण्यात आल्यामुळे भिजले असताना खाडीलगत असणार्‍या सरेभाग आणि पिटुकले उघाडीचे दरवाजे तुटल्याने खारे पाणी शेतामध्ये घुसले आहे. परिणामी शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेल्याने शेतकरी अवकाळी पाऊस आणि उधाणाच्या चक्रव्यूहात सापडला आहे. सरेभागसह वाशी, शिर्की वढाव परिसरातील अनेक गावांमध्ये पावसाने भातशेतीचे नुकसान झाले आहे.पहिल्या दिवशी पडलेल्या पावसामुळे झालेले नुकसान आणि दुसर्‍या दिवशी पावसासह उधाणामुळे उघाडीचे तुटलेले दरवाजे आणि शेतामध्ये घुसलेले खारे पाणी या दोन्ही संकटांचा ऐन दिवाळीत शेतकर्‍यांना सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे ३० सप्टेंबर रोजी याच नादुरुस्त झालेल्या दरवाजांबाबत खारभूमी विकास कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून देखील त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा दावा स्थानिक शेतकरी करीत आहेत.

रात्री उधाणाचे पाणी वाढल्यानंतर दरवाजे तुटल्याचे समजताच शेतकर्‍यांनी त्याच वेळी घटनास्थळी जाऊन दोराने दरवाजे बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे हे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यामुळे पाणी शेतामध्ये घुसून शेकडो एकर जमीन नापीक झाली, तर हजारो क्विंटल भाताचे नुकसान झाले आहे. शासनाकडून नेहमीच मिळणारी अश्वासने आणि उदासीन धोरण यामुळे शेतकरी ‘हेच काय अच्छे दिन’ असे विचारत आहेत. खारेपाटात एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावित आहे तर दुसरीकडे शेतकर्‍यांना अशा प्रकारचे नैसर्गिक आपत्तीचे फटके बसत असूनही लोकप्रतिनिधी या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने आमच्या विभागाचा फक्त राजकारणासाठीच वापर केला जाणार का, असा उद्विग्न सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

- Advertisement -

दोन वर्षांपूर्वी निकामी झालेल्या दरवाजांबाबत खारभूमी कार्यालयात पत्रव्यवहार केला होता. दोन महिन्यांपूर्वी देखील पत्रव्यवहार केला, मात्र खारभूमी विकास कार्यालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. येत्या काही दिवसात आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर या भागातील हजारो शेतकरी खारभूमी कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करतील.
-रुपेश पाटील, सदस्य, वाशी ग्रामपंचायत

या घटनेची दखल घेऊन येत्या दोन दिवसांत उघाडीची आणि तुटलेल्या दरवाजांची पाहणी करून ते दरवाजे सुस्थितीत बसविण्याला प्राधान्य देण्यात येईल.
-अर्जुन कोळी, खारलँड अधिकारी

- Advertisement -

गेले दोन दिवस सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस होत असल्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे कोणत्या स्वरूपात नुकसान झाले याची तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली माहिती घेऊन पंचनामे करण्याची प्रक्रिया केली जाईल.
-ए. आर. रोकडे, तालुका कृषी अधिकारी


हे ही वाचा – ‘आमच्यासोबत असलेल्यांना पद्मश्री देऊ, तो पाकिस्तानचा असला तरी’; अदनान सामीवरुन मलिकांचा केंद्रावर निशाणा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -