घरफिचर्ससारांशदिवाळी अंकांची झलक

दिवाळी अंकांची झलक

Subscribe

मराठी विज्ञान परिषद पत्रिका

विज्ञान हे केवळ ठराविक स्तरावर साचून न राहता समाजामध्ये पसरून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, जनसामान्यांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी वाहिलेल्या मराठी विज्ञान परिषद पत्रिकेच्या मासिकाचा दिवाळी अंक वैविध्यपूर्ण लेखांनी परिपूर्ण असा झालेला आहे. अंकाची सुरुवात प्रसिद्ध विज्ञान लेखक बाळ फोंडके यांच्या ‘वास्तव की भास्तव ?’ या लेखाने झालेली आहे. दिसतं तसं नसतं हे केवळ साहित्यात नसते तर विज्ञानातही आहे, याची प्रचिती आणून देणारा हा लेख वाचताना विज्ञानातही किती वेगवेगळी द्वंद्वे आहेत हे आपल्य लक्षात येते. शुक्र हा पृथ्वीपासून जवळ असताना खगोलशास्त्रज्ञ मंगळ ग्रहाविषयीच अगदी संशोधन का करत राहिलेले आहेत. मंगळावरच्या विविध मोहिमांची सखोल माहिती ‘मंगळ मोहिमा’ या लेखात प्रदीप नायक यांनी सचित्र दिली आहे. रानात मोहाची फुले वेचणारे आदिवासी आणि त्या फुलांचे विविध उपयोग याची महिती देताना ‘मोह फुलांचे दिवस’ या आपल्या लेखात किरण पुरंदरे यांनी नागझिर्‍याच्या जंगलाची आपल्याला वाचन सफर घडवली आहे. जागतिक तापमान वाढीचे परिणाम जगातील मानवाला जाणवू लागले आहेत. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. याची जाणीव करून देणारा ‘जैवइंधने : शाश्वत भविष्याची गरज’ हा रवींद्र उटगीकर यांचा लेख अनेक पैलूंनी युक्त आहे. रुग्णालयातील अग्नी सुरक्षितता, कालवे-जागतिक व्यापाराच्या रक्तवाहिन्या, पक्ष्यांच्या घरट्यांमधील वास्तुकला, असे अनेक वाचनीय लेख आणि हिमाग्नी, भीमाचे बंड अशा कथा अंकात आहेत.

-कार्यकारी संपादक -शशिकांत धारणे
-पृष्ठे – १४४, किंमत – १५० रुपये

- Advertisement -

आरोग्य ज्ञानेश्वरी

लहानपणापासून कुठल्याही व्यक्तीची आरोग्यपूर्ण वाढ झाली तर त्याच्या पुढील आयुष्यावर त्याचा चांगला परिणाम होत असते. लहानपणी मुलावर चांगले संस्कार झाले, पोषक आहार मिळाला, उत्तम व्यायाम मिळाला तर त्याचे उत्तम व्यक्तीमत्व घडत जाते, ते कसे घडवावे याचे मार्गदर्शन आरोग्य ज्ञानेश्वरी या अंकामधील विविध लेखांमधून करण्यात आले आहे. डॉ. हेमंत जोशी आणि डॉ. अर्चना जोशी यांनी हा अंक आरोग्यदायी मार्गदर्शनाने चांगलाच फुलवला आहे. जादू छान व्हायची, वाढदिवस असा साजरा करा, वाढीचे तक्ते, मुलामुलींचे वाढीचे आधार कार्ड, अलेक्झांडरकडून शिका, डॉक्टरना अभय द्या, देशाची आहार नीती, अ‍ॅलर्जी टाळायची सोपी युक्ती, चक्रव्यूहात फसू नका, नाचरी शाळा असे एकाहून एक सरस असे लेख या दोघांनी लिहिले आहेत. लस म्हणजे काय या लेखांत मुलांना वयाच्या विविध टप्प्यांमध्ये कुठल्या लसींची आवश्यकता असते, याची माहिती देण्यात आली आहे. ‘पालकत्व पहिल्या १००० दिवसांचे एक अभिनव कल्पना’ हा बालरोगतजज्ज्ञ डॉ. चित्रा दाभोलकर यांचा हा लेख मुलाचा जन्म झाल्यापासून पुढील एक हजार दिवसांच्या कालावधीत मुलाचा त्याच्या आयुष्यभराच्या आरोग्य आणि बौद्धिक विकासाचा पाया घातला जातो, त्यामुळे या काळात काय करायला हवे, याची सविस्तर माहिती दिली आहे. स्वाईन फ्लू, सर्दी, ताप, प्लू, अ‍ॅलर्जी टाळायच्या सोप्या युक्त्याही सांगणारा लेख आहे. मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करणारे लेखही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योगसाधनेबद्दल माहितीही देण्यात आली आहे.

संपादक – डॉ. रेणुका हिंगणे
पृष्ठे – १२०, मूल्य – २५० रुपये

- Advertisement -

दर्यावर्दी

समुद्र हे एक आगळे वेगळे विश्व असून विशेषत: कोळी बांधवांचा समुद्राशी जीवाभावाचा संबंध असतो. कारण त्यांचे सगळे भवितव्यच सागरावर अवलंबून असते. त्याविषयीचे अनेक अनुभव दर्यावर्दी या अंकातील अनेक लेखांमधून व्यक्त झाले आहेत. रामदाम बोट काशाच्या खडकावर आदळून बुडाली, याला अनेक वर्षे उलटून गेली तर अतिशय वेदनादायक अशी दुर्घटना आहे. पण त्याच वेळी जयंती बोट, तुकाराम या बोटींनाही जलसमाधी मिळाली, या सगळ्यांची माहिती देणारा अमोल सरतांडेल यांचा लेख लक्षणीय आहे. २०२१ हे बॅ. नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. भारतीय संसदेत असामान्य तेजाने तळपणारे कोकणचे सुपुत्र नाथ पै यांचे अमोघ वक्तृत्व ऐकणाचा योग आलेल्या सुरेश ठाकूर यांच्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकातील ‘ओजस्वी वक्तृत्व, तेजस्वी नेतृत्व’ हा लेख वाचताना नाथ पै याच्या गुणविशेषांचे आपल्या दर्शन घडते. समुद्र किनार्‍यावर एक आकर्षक धोका अनुभवायला येतो तो म्हणजे ब्ल्यू बॉटल जेलिफिश. हे दुरून दिसायला छान वाटतात, पण त्यांच्याशी संपर्क आला की, ते अतिशय त्रासदायक ठरतात, याविषयी डॉ. सूर्यकांत येरागी यांनी माहितीपूर्ण लेख लिहिला आहे. याच अंकातून कोळी बांधवानी राष्ट्रपतींना पत्र पाठवून आपली व्यथा कळवली आहे. महाराष्ट्रामध्ये कोळी बांधवांवर होणारा अन्याय दूर करावा, अशी मागणी या पत्रातून करताना त्यात अनेक मुद्दे मांडण्यात आले आहेत. अखिल कोळी समाज परिषदेचे अध्यक्ष जे.टी. पाटील यांच्या सहीने हे पत्र देण्यात आले आहे. लेख आणि कौंटुबिक विषयांवरील कथांसोबत काव्यगंधमध्ये अनेक कवींच्या कवितांचा काव्यधुंद शिडकावा करण्यात आला आहे.

-संपादक – अमोल सरतांडेल
-पृष्ठे – १२८, किंमत – १०० रुपये

मयुरवृत्त

मयुरवृत्त दिवाळी अंकाने आपली दर्जेदार लेखांची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाचा दिवाळी अंक विविध प्रकारच्या लेखांनी सजला आहे. यामध्ये कथा, कविता, ललित साहित्याचा समावेश आहे. संपादक डॉ. संगिता गवारी यांनी लिहिलेल्या संपादकीयामध्ये कोरोना काळातील आव्हाने आणि मानवी जीवनाचे वर्णन केले आहे. शिवाय कोरोनाकाळात जसा मानवी जीवनावर परिणाम झाला तसा शेतकरी जीवनावर कसा परिणाम झाला, याची डॉ. गवारी यांनी माहिती दिली आहे. डॉ. गोपाल रामा गवारी यांचा आध्यात्मिक विषयावरील मोह, मिथ्य अहंकार व असत्य म्हणजे भक्ती पराङ्मुखता आणि विनाश या लेखाने अंकाची सुरुवात केली आहे. या लेखात मोह माया, अहंकार, मानसन्मानापासून माणूस मुक्त झाला, विरक्त झाला, परमेश्वरला शरण गेला तर त्याचा आत्मोधारच होतो व निरंतर शांती लाभते, असे सांगतो. प्रशांत भरवीरकर यांनी ‘अर्धे नव्हे पूर्ण…!’ या लेखात वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे ठिकाण हे महाराष्ट्रातील एकमेव पूर्णपीठ असल्याची नवी माहिती दिली आहे. प्रा. सुनिता दोबाडे यांनी यशवंत जव्हार संस्थानाचा स्फूर्तीदायी इतिहास या लेखात डॉ. गोपाळ रामा गवारी लिखित यशवंत कादंबरीमधील सारांश मांडला आहे. राजेंद्र उगले, समाधान पाटील, बाबाराव मडावी, रवींद्र मालुंजकर, लक्ष्मण टोपले, राजेंद्र उगले, दीपाली साबळे-धांडे, डॉ. गणेश मोगल, बाबाराव मडावी, संजीवनी पाटील यांच्या कवितांनी अंक सजला आहे.

-संपादक – डॉ. संगिता गवारी
-पृष्ठे 64, किंमत-७० रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -