घरफिचर्ससाहेब काय शॉलेट बोल्ले राव!

साहेब काय शॉलेट बोल्ले राव!

Subscribe

स्थळ : मुंबईची भयाण गर्दीची लोकल. वेळ : विचारांचं सोनं लुटून परतण्याची. दोन सैनिक समोरासमोरच्या दोन बाकांवर चेपून बसलेले आहेत. मध्ये उभ्या असलेल्या माणसांमधल्या गॅपमधून एकमेकांशी गप्पा मारतायत.)

पहिला सैनिक : काही म्हण राव, साहेब काय शॉलेट बोल्ले राव, कसला आवाज टाकला मंदिर आम्हीच बांधू म्हणून.

दुसरा सैनिक : हां. म्हणजे ते ठीक आहे. पण, मी काय म्हणतो. मोठे साहेब एकदम डायरेक बोलायचे आनि ते बोलले की डायरेक दिल्ली हलायची. तसा काय नाय राहिला आता.

- Advertisement -

प. सै. : अरे मोठे साहेब ते मोठे साहेब! ते सम्राट होते, हे राजे आहेत. एवडा तर फरक असनारच ना! पन, काही बोल, साहेब धाकटे असले तरी स्पॉटनानाला पण सोडत नाहीत, त्रिखंडनायकांना पण घेतात आणि अध्यक्षमहोदयांची पण करतात… कसले शॉलेट बोलतात राव…

दु. सै. : अरे पण, हे सगळं बोलणंच ना! लोक हसतात आता. यांना इतक्या शिव्या देताय तर यांच्याबरोबर राहता कशाला म्हणून.

- Advertisement -

प. सै. : अरे पण साहेब तर खुल्ला बोलतात ना, आम्हाला काय विचारता, त्यांना विचारा. त्यांची तरी तोडायची हिंमत हाये का? बोल…

दु. सै. : अरे ते सुमडीमध्ये कोंबडी खातायत… ते कशाला तोडतील? ते आपल्या सायबांना उत्तर पन देत नायत. किंमतच देत नायत.

प. सै. : काय बोल्तो राव तू. सायबांनी आवाज टाकला की स्पॉटनाना डायरेक धावत येतो दिल्लीवरनं… साहेब बोलतातच तसे शॉलेट.

दु. सै. : अरे पण दरवेळेला कोण ना कोणतरी येतो आणि आपली हवा सुटते, असं का होतं? पंक्चर हाय तरी कुटे? त्याला काय पॅचबिच मारला पायजे ना? एकतर आपन स्टेपनी…

प. सै. : असा बोलू नको राव. आपल्याबिगर कमळाबाईला कुंकू लावील कोन? मोठ्या साहेबांच्या आशीर्वादाने फुडच्या विलेक्शनला आपले साहेबच मुख्यमंत्री होतात का नाय बघ…

दु. सै. : कुठले? उत्तर प्रदेशाचे? ते सगळ्यांना सांगतायत चलो अयोध्या, चलो वाराणशी… मग हितली विलेक्शन कोण लढवणार.

प. सै. : अरे, सायबांची आयड्या तुझ्या लक्षात नाय आली भावड्या. फुल गेम करतायत ते. हे लोक तुला माहितीयेत ना कशेयेत ते. नुसती हूल देतात, अ‍ॅक्चुअल अ‍ॅक्शन काय करत नायत. डरपोकैत. आपले सैनिक कशे वाघैत. साहेब बोलले, तर अ‍ॅक्शन घेतील लगेच… शॉलेट बोलतात साहेब…

दु. सै. : हा साहेबांचा गेम आहे? अरे हा तर आपलाच गेम आहे. ते नुसतं बोलबच्चन करणार आणि आपण अ‍ॅक्शन करणार. मग तेच क्रेडिट घेणार. भावड्या, तिकडे ढाँचा पाडला तेव्हा काय झालं ते विसरलास काय? हे लोकं चाव्या मारण्यात एक्स्पर्ट आहेत. चावी मारतात आणि मागे हटतात. आपले लोक जोशमध्ये पुढे जाऊन केसेस अंगावर घेतात, मग कोणताच साहेब विचारायला येत नाही. ते शाणे कानावर हात ठेवतात, मॉब कैसे बेकाबू हुआ हमको पता नहीं…

प. सै. : अरे बाबा, पण, आपल्याला मंदिर पायजे तर अ‍ॅक्शन आपण केली पायजे ना… अरे मंदिर झालं तर साहेबांना केवढं क्रेडिट मिळेल विचार कर… सगळ्या देशात मोठ्या साहेबांसारखंच धाकट्या साहेबांचंही नाव चमकेल… शॉलेट बोललेत ते…

दु. सै. : मी काय म्हणतो भावा, साहेब कधी आपल्याला का नाय रे विचारत, तुम्हाला लोकलची गर्दी झेपत नाही का, मी घालतो त्याच्यात लक्ष. तुम्हाला पाणी तासभरच मिळतं का, मी ते दोन तास मिळवून देण्याची व्यवस्था करतो. तुम्हाला सव्वादोनशे फुटांचंच घर मिळालंय का? आपण तुम्हाला पाचशे फुटाचं घर देऊ. तुमच्या नोकर्‍या पर्मनंट नाहीत का, मी त्या पर्मनंट करून देतो. तुमच्या मुंबईचा नरक झालाय का, मी तिचा पुन्हा स्वर्ग बनवतो. साहेबांच्या हातात हे सगळं काही करायची पॉवर आहे आणि आपली ताकदपण त्यांच्यामागे आहे. पण, ते आपल्याला कधी विचारतच नाहीत?

प. सै. : अरे आपण छोटी माणसं… त्यांचं पॉलिटिक्स मोठं असतं…

दु. सै. : अरे आपण छोटी माणसं आहोत हे कबूल. पण आपण हाडामांसाची माणसं आहोत ना रे. आपण निवडून देतो त्यांना. आपण धावत येतो त्यांच्या हाकेला. आपण घसा सुकवतो बोंबलून बोंबलून. आपल्यासमोर भुर्जीवाल्यांची फाइवस्टार हॉटेलं झाली आणि दोन वेळच्या खाण्याचे वांधे होते ते फॉर्च्युनरमधनं फिरायला लागले. पण आपल्याला काय मिळालं? साहेब मंदिराची वार्ता तरी कधी करतात? सत्तेत गेल्यावर चार वर्षं गप्प बसतात आणि इलेक्शन जवळ आली, राममंदिराचा निकाल जवळ आला की डरकाळ्या फोडतात, तुम्हाला जमत नसेल, तर आम्ही बांधतो मंदिर…

प. सै. : हे बघ भावड्या, एवढा डीपमध्ये आपण विचार नाय करत. साहेबांनी आदेश द्यायचा, आपण तो पाळायचा, एवढंच आपल्याला समजतं. तू बोल्ला, ते समजतंय मला. पण, आपल्याला एकच कळलं, साहेब शॉलेट बोलतात, साहेब शॉलेट बोल्ले, साहेब बोलतात तेव्हा आपण ऐकायचं आणि जीव खाऊन ओरडायचं, अरे आवाजडडड कुणाचाडडडड
(पुढे खड्खड् खड्खड् खड्खड्… हा लोकलचा आवाज येत राहतो…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -