घरताज्या घडामोडीजागा वाटपात सन्मान मिळाला नसल्याने राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार - प्रफुल पटेल

जागा वाटपात सन्मान मिळाला नसल्याने राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढणार – प्रफुल पटेल

Subscribe

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाबाबतचा निर्णय येत्या दोन तीन दिवसांत जाहीर करू, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली.

गोव्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग करण्याचा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा प्रयत्न होता. परंतु गोव्यातील स्थानिक काँग्रेस नेतृत्वाला स्वबळावर लढायचे असल्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकला नाही. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी सांगितले आहे. काँग्रेसकडून जागा वाटपात सन्मान मिळायला हवा होता परंतु तो मिळाला नाही. गोव्यात सरकार स्थापन करणे अतिशय सोपे होते परंतु तसे झाले नाही असे प्रफुल पटेल म्हणाले आहेत.

गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी दिली आहे. गोव्यात पत्रकार परिषद घेत प्रफुल पटेल यांनी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना कार्यरत आहे. आमचे पहिले प्रदेशाध्यक्ष हे डॉ. विल्फ्रेड डिसुझा होते. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यातील प्रत्येक विधानसभा निवडणूक लढवली असल्याचे प्रफुल पटेल म्हणाले.

- Advertisement -

विधानसभेसाठी याआधी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली होती. मात्र २०१७ सालापासून काँग्रेससोबत आमची आघाडी नाही. गोवा विधानसभेत २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व राहिले आहे. तसेच राष्ट्रवादीने अनेकदा मंत्रिपदही भूषविले आहे. राष्ट्रवादीने नेहमीच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना एकत्र करुन निवडणूक लढवली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादीने १५ वर्ष कारभार चालवला आहे.

- Advertisement -

२०१७ च्या निकालानंतर गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष होता

तर मागील अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचा प्रयोग करत शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी घडवून आणली आहे. केंद्रातही युपीएच्या माध्यमातून दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये राष्ट्रवादीने आपले योगदान दिले असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी पक्षांना एकत्र आणण्याचा राष्ट्रवादीने नेहमीच प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने गोव्यात २०१७ साली काँग्रेसने आघाडीसाठी पुढाकार घेतला नाही. २०१७ च्या निकालानंतर गोव्यात काँग्रेस १७ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता असे यावेळी प्रफुल पटेल यांनी नमूद केलं आहे.

दोन दिवसांत जागा वाटपाबाबत निर्णय जाहीर करणार

दरम्यान राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. तसेच गोवा फॉरवर्ड पार्टीच्या आमदारांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन करणे अतिशय सोपे होते. मात्र तसे झाले नाही, असे प्रफुल पटेल म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढविण्यासंबंधी काँग्रेससोबत चर्चा करत होतो. मात्र काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आम्हाला प्राप्त झाले नाही, जागावाटपात आम्हाला जो सन्मान मिळायला हवा, तो मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाबाबतचा निर्णय येत्या दोन तीन दिवसांत जाहीर करू, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली.


हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाकडूनच १२ आमदारांवरील अन्याय दूर होईल, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -