घरमुंबईताडदेव इमारत आग : ६ जण मृत्यू

ताडदेव इमारत आग : ६ जण मृत्यू

Subscribe

कमला इमारतीच्या १८ व्या मजल्यावर भीषण आग ,२३ जण जखमी , ३ गंभीर

ताडदेव, नाना चौक, गोवालिया टँक येथील कमला या 20 मजली इमारतीच्या 18 व्या मजल्यावर शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत 6 जणांचा होरपळून व आगीचा धूर नाकातोंडात गेल्याने गुदमरून मृत्यू झाला, तर २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 3 जण गंभीर आहेत. त्यांच्यावर नायर, कस्तुरबा, भाटिया व मसीना या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नाना चौक, गोवालिया टँक येथे कमला ही २० मजली रहिवासी इमारत आहे. सकाळी रहिवासी झोपेत असताना या इमारतीच्या 18 व्या मजल्यावर अचानक आग लागली. काही अवधीतच ही आग भडकली. एका घरातील एसीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संकट काळात इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित न झाल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात अडचण आली. परिणामी आग आणखीनच भडकली. या आगीची माहिती मिळताच इमारतीतील रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

- Advertisement -

काही रहिवाशांनी भीतीमुळे आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचविण्यासाठी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. तर काही स्थानिक नागरिक, शिवसैनिक आदींनी इमारतीमध्ये अडकलेल्यांना सुखरूपपणे बाहेर काढले. तोपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू केले होते. दरम्यान, एका तासातच आग अधिकच भडकली. त्यामुळे अग्निशमन दलाने सकाळी 7.42 वाजता आग स्तर -3 ची म्हणजे भीषण स्वरूपाची असल्याचे जाहीर केले.

अग्निशमन दलाने आगीची भीषणता लक्षात घेत आग विझविण्यासाठी आणखी कुमक मागवली. तब्बल 13 फायर इंजिन, 7 जम्बो वॉटर टँकर, 1 बीए व्हॅन, 1 रुग्णवाहिका अशी यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक प्रयत्न करून सकाळी 10.05 वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. सकाळी 12.00 वाजता आग पूर्णपणे विझविण्यात आली. यानंतर अग्निशमन दलाने कुलिंग ऑपरेशनचे काम हाती घेतले. दरम्यान, आगीने भीषण रूप धारण करण्यापूर्वीच अनेक रहिवाशांना बाहेर काढण्यात आले होते. मात्र, काही जण इमारतीमध्ये अडकले होते. 29 जणांना जीवघेण्या आगीतून बाहेर काढून जखमी अवस्थेत रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

- Advertisement -

नायर रुग्णालयात 7 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तर कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल 3 जखमींपैकी 1 जण मृत पावला. तसेच, भाटिया रुग्णालयात दाखल 17 जणांपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून 5 जणांना उपचारानंतर बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. तर 12 जण उपचार घेत आहेत. मसीना रुग्णालयात एकजण उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ही आग का व कशी काय लागली, इमारतीमधील अग्निरोधक यंत्रणा वेळीच कार्यान्वित का झाली नाही, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दल यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे.

मृतांची माहिती
या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी एका महिलेचा मृतदेह कस्तुरबा रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. तर नायर रुग्णालयात ५ मृत व्यक्ती असून त्यापैकी २ जणांची ओळख पटलेली नाही. यात एका महिलेचा समावेश आहे. यामुळे एकूण ३ मृतांची नावे समजू शकलेली नाहीत. उर्वरित ३ मृत व्यक्ती नायरमध्ये आहेत. हितेश मिस्त्री , मंजुबेन कंथोरिया व पुरुषोत्तम चोपदार अशी ३ मृत व्यक्तींची नावे आहेत.

आगीच्या ठिकाणी महापौरांची धाव
या आगीची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. इमारतीमधील एका घरात जेव्हा आग लागली त्यावेळी इमारतीबाहेरून जाणार्‍या स्थानिकांनी व शिवसैनिकांनी तात्काळ इमारतीमध्ये धाव घेत इमारतीच्या लिफ्ट बंद करून रहिवाशांना बाहेर काढले. काही लोकांना इमारतीच्या जिन्यावरून खाली आणण्यात आले, तर काही ज्येष्ठ नागरिकांना पाठीवर घेऊन बाहेर काढण्यात आले, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. यावेळी, त्यांच्यासोबत माजी नगरसेवक अरुण दुधवडकर हे उपस्थित होते.

आगीतील घटनेतील जखमींना नायर, कस्तुरबा, भाटिया या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महापौरांनी या रुग्णालयांना भेटी देऊन जखमींची विचारपूस केली. इमारतीमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणा होती. मात्र ती वेळीच कार्यान्वित झाली नसल्याचे समजते. मात्र, सदर अग्निप्रतिबंधक यंत्रणा कशी कार्यान्वित करावी, वापरावी आणि आगीवर नियंत्रण कसे मिळवावे, याबाबतचे प्रशिक्षण नागरिकांना, इमारतीमधील रहिवाशी, सुरक्षारक्षक आदींना देणे गरजेचे असल्याचे महापौरांनी सांगितले.

त्या तीन रुग्णालयांची चौकशी
मुंबईत आज लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नाना चौक गोवालिया टँक येथील भाटिया रुग्णालयाजवळील कमला इमारतीला ही आग लागली होती. या आगीत होरपळलेल्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तीन रुग्णालयांनी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मसिना, व्होकहार्ड, रिलायन्स या रुग्णालयांनी उपचार नाकारले अशी नावेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितली आहेत. या रुग्णालयांनी अशा आणीबाणीच्या वेळेला उपचार का नाकारले? याबाबत चौकशीचे आदेश मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही महापौर म्हणाल्या आहेत.

आपद्ग्रस्तांना राज्याचे ५ तर केंद्राचे २ लाख
ताडदेव येथील कमला इमारतीतील आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारच्या वतीने ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यावर ही घोषणा केली. तर केंद्र सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत मृतांप्रति सहानुभूती व्यक्त करत दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. याशिवाय जखमींना ५० हजार रुपयांच्या मदतीचीही घोषणा त्यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -