घरठाणेकल्याणच्या काळा तलावातील जेट्टीच्या कामाला आक्षेप

कल्याणच्या काळा तलावातील जेट्टीच्या कामाला आक्षेप

Subscribe

ठाण्याचे जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांना पत्र

ऐतिहासिक महत्व लाभलेल्या कल्याण शहरातील प्रसिद्ध काळा तलावाच्या सुशोभिकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरु आहे. कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशनकडून सुशोभिकरणाच्या नावाखाली तलावात बांधण्यात येत असलेल्या ऑक्टोगोनल जेट्टीच्या कामामुळे तलावाच्या मूळ संरचनेत बदल होणार असल्याने ऐतिहासिक स्थळात अशाप्रकारे जाणीवपूर्वक बदल करण्याचा प्रकार गंभीर आहे. काळा तलाव हेरीटेज असल्याने त्याच्या संरचनेत बदल होईल असे काम करणे अयोग्य असल्याचा दावा करीत सामाजिक कार्यकर्ते दुर्वास जगन्नाथ चव्हाण यांनी हे काम थांबविण्यात यावे व जेट्टीचे काम निष्कासित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

चव्हाण यांनी यासंदर्भात ठाण्याचे जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांना पत्र देत ऐतिहासिक काळा तलावाच्या मूळ संरचनेत बदल करण्याच्या गंभीर प्रकाराला हरकत घेतली आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांनी काळा तलाव सुशोभीकरणाचा टप्पा क्र. १ हाती घेतला आहे. या कामाचा भाग म्हणून ऐतिहासिक काळा तलावात काही मीटर आत काँक्रिटचे पिलर उभारून या ठिकाणी ऑक्टोगोनल जेट्टी उभारण्याचे काम सुरु केले आहे. या कामामुळे तलावाच्या मूळ संरचनेला धक्का लागत आहे. ऐतिहासिक स्थळात जाणीवपूर्वक बदल करण्याचा प्रकार गंभीर असल्याने सदरचे काम थांबवून ऑक्टोगोनल जेट्टीचे काम निष्कासित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. काळा तलाव हेरीटेज असल्याचे मत त्यासाठी पुढे केले जात आहे.

- Advertisement -

कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन शासनाच्या निर्देशाप्रमाणे शहरातील हेरीटेज वास्तूंच्या यादीला नगरविकास विभागाची मान्यता घेण्यात अपयशी ठरल्याने शहरातील हेरीटेज वास्तू-इमारतींचा मुद्दा काळा तलावाच्या सुशिभिकारणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे तरुण जुनेजा यांना संपर्क साधला असता त्यांनी काळा तलाव हेरीटेज नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, चव्हाण यांनी पुरातत्व विभागाचेही काळा तलावातील कामाकडे लक्ष वेधल्याचे समजते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -