घरमुंबईमालकिणीच्या आर्थिक विवंचनेत संधी साधली

मालकिणीच्या आर्थिक विवंचनेत संधी साधली

Subscribe

महिला व्यावसायिकाची फसवणूक करणार्‍या नोकरासहीत दोघांना अटक

मुंबई:-मालकीण आर्थिक विवंचनेत फसलेली…नोकरानेच मदतीचा हात पुढे केला…मालकिणीला मदत करण्याचे नाटकही केले..परंतु,आवळा देऊन कोहळा काढून घेण्याची योजना मदतीने त्याने आखली…आणि काही अंशी तो सफलही झाला..शेवटी योजना पुर्नत्वास नेताना शेवटी तो पोलिसांच्या सापळ्यात सापडलेच. तक्रारदार महिलेचा अगरबत्ती मॅन्युफॅक्चरचा व्यवसाय आहे. नालासोपारा येथील पानबोई नगर परिसरात त्यांच्या मालकीचा वागड गृहउद्योग एल. एल. पी. नावाचा एक कारखाना आहे, तर मालाडच्या दप्तरी रोडवरील आनंदकुंज इमारतीमध्ये एक कार्यालय आहे.

त्यांच्या कंपनीत 56 प्रकारच्या सुवासाच्या सुगंधित अगरबत्ती आणि पाच प्रकारचे धुपस्टिक बनविण्याचे काम चालते. त्यांच्याकडे शैलेश पोळ हा कामाला होता. त्याच्याकडे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर शहरात अगरबत्तीचे मार्केटिंग करण्याचे काम होते. सप्टेंबर महिन्यात त्याने त्यांच्याकडे पगार मागितला होता, मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांनी त्याला दोन दिवस थांबण्यास सांगितले. यावेळी त्याने त्यांना पैशांची गरज असल्यास आपण पैसे देऊ शकतो असे सांगून त्यांच्या बँक खात्यात 1 लाख 35 हजार रुपये जमा केले होते. त्यानंतर त्याने त्यांना व्यवसाय वाढीसाठी दीड ते दोन कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून त्यांनी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने त्यांना सांगलीच्या मिरज परिसरात आणले.

- Advertisement -

असा रचला कट

यावेळी शैलेशसोबत राजा आणि काका नावाचे दोनजण होते. यावेळी राजाने त्यांना दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवून प्रोसेसिंग फी म्हणून आधी दहा लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांनी तयारी दर्शविल्यानंतर त्यांच्याच कार्यालयात त्यांनी या तिघांनाही दोन लाख रुपये टोकन म्हणून दिले. ऑक्टोबर महिन्यात राजाचा त्यांना फोन आला, दहा कोटी रुपये तयार आहेत. उर्वरित दहा लाख रुपये घेऊन सातारा येथे या असे सांगितले. 4 ऑक्टोबरला त्या त्यांची मुलीसोबत सातारा येथे दहा लाख रुपये घेऊन गेले. ही रक्कम घेतल्यानंतर या तिघांनी त्यांच्या कार्यालयात प्रिंट केलेले दहा कोटी रुपये मिळतील. त्यासाठी त्यांच्या कार्यालयात प्रिंट मशिन घेऊन यावे लागेल असे सांगितले. याच दरम्यान तिथे काही तरुण आले. आपण गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून त्यांनी दोघांना कॅशसहीत ताब्यात घेतले. यावेळी तक्रारदारांना मुंबईत जाण्याचा या तोतया पोलिसांनी सल्ला दिला होता.

शेवटी जाळ्यात सापडले

मुंबईत येताच त्यांनी घडलेला प्रकार दिडोंशी पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सापळा रचून बारा लाख रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा दिडोंशी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करीत होते. हा तपास सुरू असतानाच यातील आरोपी आणखीन काही रक्कम घेताना मालाड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने दप्तरी रोडवरील ईस्टर्न प्लाझा मॉलसमोर साध्या वेशात पाळत ठेवून तिथे असलेल्या थॉमस, दिलीप आणि शैलेश या तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीत त्यांनी या व्यावसायिक महिलेची फसवणूक तसेच तिने दिलेल्या पैशांचा अपहार केल्याची कबुली दिली. त्यानंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. यातील थॉमस हा पुणे, दौंडच्या मिरा सोसायटीजवळील देवदत्त अपार्टमेंट, शैलेश हा सातारा येथील करंजे, स्वाती हाईट्ससमोरील बाबर कॉलनी तर दिलीप हा सांगलीच्या सावंत प्लॉट, गल्ली क्रमांक दोन, पारिजातक कॉलनीचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांकडून पोलिसांनी चार मोबाईल, आठ हजार रुपयांची कॅश, तीन आधारकार्ड, आठ विदेशी चलनी नोटा, दोन पॅनकार्ड, फेडरल, अ‍ॅक्सिस, सिंडीकेट आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे सहा डेबीट कार्ड, निवडणूक ओळखपत्रे असा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या तिघांनाही बुधवारी येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -