घरमहाराष्ट्रनाशिकवडील गेल्यानंतर नोकरी करत सोनालीचे बारावीत यश

वडील गेल्यानंतर नोकरी करत सोनालीचे बारावीत यश

Subscribe

भविष्यात पोलिस होण्याचे आहे स्वप्न

स्वीटी गायकवाड । नाशिक
वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर कमी वयात सोनाली गांगुर्डे हिच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. नोकरी करुन तिने घराची जबाबदारी पेलली आणि अशा आव्हानात्मक परिस्थितीतही बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश पटकावले. म्हणूनच तिचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावे, असे आहे. बारावीचा नुकताच निकाल लागला. त्यात सोनालीने ६० टक्के गुण मिळवून स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू ठेवला. त्र्यंबकरोड भागातील सोनालीने केटीएचएम महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती.

घरची परिस्थिती बेताची असतानादेखील जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर सोनालीने हे यश संपादित केले. दहावीत सोनालीने 87 टक्के मिळविले होते. या यशाबद्दल आपलं महानगरशी बोलताना सोनाली म्हणाली की, मी सातवीत असतानाच माझ्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने घरची संपूर्ण जबाबदारी माझ्या आईवर आली. त्यामुळे मला लहानपणापासून संघर्षमय जीवन जगावे लागले.

- Advertisement -

सोनालीची आई हॉटेलात लेखापाल म्हणून काम करते. सोनालीच्या परिवारात एक भाऊ व दोन बहिणी आहेत. घरची जबाबदारी आईवर आल्याने तिने काही काळ एका कंपनीत नोकरी केली. सकाळी कॉलेज, दुपारी नोकरी व सायंकाळी स्वयंपाक याप्रकारे सोनालीने आपले शिक्षण सुरू ठेवले. अशा खडतर परिस्थितीत तिने यश पटकावले. विशेष म्हणजे सोनालीने वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमातून हे यश मिळवले. तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरांतून कौतुक केले जाते आहे. बारावीनंतर आता सोनालीची पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करायची इच्छा आहे. वडिलांचेही तिच्याकडून हेच स्वप्न होते. त्यामुळे आता ती त्यासाठी सज्ज झाली आहे.

पोलीस बनून मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी मला रात्रीचा दिवस करावा लागला तरी मी ते करायला तयार आहे. शिक्षण झाल्यानंतर मला माझ्या लहान भावंडांच्याही करिअरचा विचार करुन त्यांनाही चांगले स्थिरस्थावर करायचे आहे. – सोनाली गांगुर्डे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -