घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र: मतदारयाद्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मविप्र: मतदारयाद्यांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

Subscribe

कर्मचार्‍यांना दमबाजी करुन विरोधी गटाने मतदार याद्या पळवल्या : पवार

नाशिक : मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभासदांसाठी प्रारुप मतदारयादी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यावर बुधवारपर्यंत (दि.29) हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असतानाच विरोधी गटाने संस्थेतील कर्मचार्‍यांना दमदाटी करत ही मतदार यादीच पळवून नेल्याचा आरोप संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच, कर्मचार्‍यांना दमदाटी करणे व मतदारयादी पळवल्याच्या कारणास्तव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यादृष्टीने मतदारांची पुरवणी यादी संस्थेच्या कार्यालयात 25 जून 2022 रोजी सभासदांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही यादी आम्हाला द्यावी, अशी मागणी विरोधी गटाचे नेते तथा माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी लेखी अर्जाद्वारे केली होती. तसे आदेशही धर्मादाय आयुक्तांनी संस्थेला दिले होते. परंतु, संस्थेच्या सभासदांची यादी अंतिम न झाल्याने आम्ही धर्मादाय आयुक्तांना तसे कळवले आहे, असे पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणुकीच्या प्रक्रियेत मतदारयादीवर हरकत मागवली जाते. त्या हरकती निकाली निघाल्यानंतर अंतिम मतदारयादी धर्मादाय आयुक्तांसह सर्व सभासदांना नाममात्र दरांत उपलब्ध करुन दिली जाते. त्यामुळे विरोधकांनी फक्त यादीचा आग्रह धरुन सोमवारी (दि.27) संस्थेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. यात सभासद नसलेल्या व्यक्तींचाही समावेश होता. त्यांनी कर्मचार्‍यांना व शिक्षणाधिकार्‍यांना धमकावत ही यादीच पळवली. त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. ज्ञानमंदिरात शिक्षणाधिकार्‍यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. मविप्र संस्थेला राजकारणाचा आखाडा बनवू नये, अशी विनंती कळवणचे सभासद राजेंद्र पवार यांनी केली.

उमेदवारीची इच्छा नाही पण..

मविप्र संस्थेच्या निवडणुकीत सरचिटणीस पदासाठी सत्ताधारी गटातर्फे श्रीराम शेटे यांना संधी दिली जात असल्याचे बोलले जाते. याविषयी नीलिमा पवार यांना विचारणा केली असता त्या म्हणाल्या, वयाच्या 57 व्या वर्षी मी मविप्र संस्थेचा कारभार हाती घेतला. 12 वर्षे कारभार सांभाळल्यानंतर आता वयोमानानुसार इतका वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसर्‍या व्यक्तीला संधी द्यावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली होती. परंतु, त्यांनीच दुसरा पर्याय सुचवण्याची मागणी केली असता श्रीराम शेटे यांचे नाव आम्ही सुचवले. त्यादृष्टीने आम्ही चाचपणी करत असताना सभासदांनी त्यांच्या उमेदवारीला नव्हे पण सरचिटणीसपदाला तीव्र विरोध केला आहे. निफाड तालुक्याचाच सरचिटणीस असावा अशी सभासदांची मागणी असल्यामुळे त्याविषयी विचार करावा लागेल. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांची नावे अंतिम केली जातील, अशी माहिती नीलिमा पवार यांनी दिली.

- Advertisement -

अमृता पवार, अजिंक्य वाघ, शिला हापसे सभासद कसे?

 मविप्र संस्थेच्या मतदारयादीत अमृता पवार, अजिंक्य वाघ, शिला हाफसे हे सभासद कसे झाले?, असा सवाल संस्थेचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी उपस्थित करत, गैरमार्गाने वारसा हक्काचे सभासद यादीत घुसविले जात असल्याचा गौप्यस्फोट केला. मतदार यादी ही सभासदांना मिळाली पाहिजे, त्यासाठी पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सोमवारी (दि.27) संस्थेच्या मुख्यालयासमोर आंदोलन केल्यानंतर अ‍ॅड. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, माजी उपाध्यक्ष डॉ. सयाजी गायकवाड, अशोक पिंगळे उपस्थित होते. अ‍ॅड. ठाकरे म्हणाले की, सभासद या नात्याने नवीन वारस सभासद मतदार यादीची मागणी करत आहेत. त्यांना केवळ तालुक्याची यादी दिली जाते. यादी बघताना तिचा फोटो काढू नये म्हणून दोन व्यक्ती बाजूला उभे असतात. एवढी दहशत कशासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पारदर्शक कारभार असेल तर सर्व सभासदांसमोर मांडला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्व. बाळासाहेब वाघ यांचे निधन सहा महिन्यांपूर्वीच झालेले असताना त्यांचे चिरंजीव अजिंक्य वाघ यांना 2018 च्या यादीत सदस्यत्व कसे मिळाले. अमृता पवार यांच्या सभासदत्वाला मदन पवारांसह त्यांच्या भगिनींनी आक्षेप घेतला आहे. असे असताना त्यांचे नाव यादीत कसे आले, असा गंभीर प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अहमदनगर जिल्ह्यातील शिला ज्ञानदेव फसाळे यांच्या सभासदत्वावरूनही ठाकरे यांनी फसाळे यांच्या कुटुंबातील कोणीही सभासद नव्हते. मग यांना सभासद कसे केले, याचा खुलासा करावा, अशी मागणी केली. सभासद नेमके कोण-कोण झाले याची माहिती सभासदांना व्हावी यासाठी यादी मागितली जात आहे. यादी अंतिम झाल्यावर त्यावर हरकती घेता येऊ नये, यासाठी ही खेळी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

धर्मादाय आयुक्तांनी सांगितल्यानंतरही मतदारयादी मिळत नसल्याने सभासदांना आंदोलन करावे लागले. धर्मादाय आयुक्तलयाने 15 दिवसांची मुदत दिलेली असताना संस्थेने ही यादी दिली नाही. हा न्यायालयाचा अवमान असून, त्याविरोधात याचिका दाखल करणार आहे. संस्थेच्या कुठल्याही अधिकारी-कर्मचार्‍यास दमबाजी केलेली नाही. उलट आकसापोटी सरचिटणीसांनी चांदवड तालुक्यातील कर्मचार्‍यांच्या इतर तालुक्यात बदल्या केल्या.
– अ‍ॅड. नितीन ठाकरे, माजी सभापती, मविप्र संस्था

मतदारयादीविरोधात सभासदांचे जनआक्रोश आंदोलन

नाशिक । मविप्र संस्थेच्या सभासदांची पुरवणी यादी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (दि.27) संस्थेचे माजी पदाधिकारी व सभासदांनी जनआक्रोश आंदोलन आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावाने निवेदन दिले. मविप्र संस्थेची निवडणूक जुलै व ऑगस्ट महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर वारसा सभासदांची यादी फोन क्रमांकासह मिळावी, ऑडिट रिपोर्ट मिळावा, अशी मागणी माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी संस्थेकडे केली. मात्र, संस्थेकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली.

यात धर्मादाय आयुक्तांनी 27 मे 2022 रोजी सभासदांची यादी देण्याचे आदेश संस्थेच्या पदाधिकार्‍यांना दिले. हे आदेश प्राप्त होऊन महिना उलटला तरी यादी न मिळाल्याने ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी संस्थेच्या प्रांगणात जाऊन ठाकरे यांसह डॉ. सयाजी गायकवाड, सुरेश डोखळे, प्रवीण जाधव आदींनी सभासदांच्या उपस्थितीत आंदोलन केले. तालुकास्तरावर यादी सभासदांसाठी ठेवणे गरजेचे असताना ती संस्थेत ठेवली गेली.

प्रत्येक सभासदास येथे येणे शक्य नाही. यादीत अनेक नावे घुसविण्यात आली असल्याने यादीची मागणी करत असल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले. आंदोलनात मोहन पिंगळे, वामन निकम, सुभाष देसले, प्रभाकर ढगे, भिमाजी आहेर, संतू गायखे, शिवाजी गडाख, लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, लक्ष्मीकांत कोकाटे, प्रा. हरिष आडके, दिलीप कोकाटे, संजय पिंगळे, अरूण ठाकरे, केशव जाधव आदी सहभागी झाले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -