घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा राजीनामा

Subscribe

३१ महिन्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले

मागील १० दिवसांपासून राज्यात सुरू असणार्‍या सत्तासंघर्षाच्या नाट्याचा बुधवारी शेवट झाला. शिवसेनेने दाखल केलेल्या बहुमत चाचणीविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा बुधवारी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिला. सोबत विधान परिषदेचे सदस्यत्वदेखील सोडत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर बहुमत चाचणीच्या नामुष्कीला सामोरे जाण्याआधीच २८ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन परस्परविरोधी विचारधारेचे महाविकास आघाडी सरकार अवघ्या ३१ महिन्यात कोसळले. राजीनाम्याच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीवरून राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राजीनामा सुपुर्द केला. ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने जल्लोषाला सुरुवात केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ५० बंडखोर आमदार मुंबईत आल्यानंतर गुरुवारीच भाजप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तत्काळ फेसबुक लाईव्हद्वारे जनतेला संबोधित केले. मला मुख्यमंत्रीपद सोडण्याची खंत अजिबात नाही. गुळाच्या ढेपेला जसा मुंगळा चिकटून बसतो, त्याप्रकारे कुठल्याही पदाला चिकटून बसणार्‍यांपैकी मी नाही. जनता आजपर्यंत कुठलेही सत्तापद न उपभोगणार्‍या ठाकरे कुटुंबाला चांगलेच ओळखते. त्यामुळे मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करत आहे. सोबतच विधान परिषदेचे सदस्यत्वदेखील सोडत आहे.

- Advertisement -

मी घाबरणारा नाही, पण कारण नसताना उद्या बंदोबस्तात शिवसैनिकांचे रक्त सांडेल. त्या पापाचे धनी ज्यांना व्हायचंय, त्यांना होऊ द्या. मी नाही होणार. मी शिवसैनिकांनाही सांगेन की उद्या अजिबात त्यांच्या मध्ये येऊ नका. त्यांचा आनंद त्यांना लुटू द्या. ज्यांनी त्यांना मोठं केलं त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरवलं, त्याचे पेढे त्यांना खाऊ द्या. ज्यांना वाटायचे त्यांना वाटू द्या. तो गोडवा त्यांना लखलाभ. मला तुमच्या प्रेमाचा, आशीर्वादाचा गोडवा पाहिजे. हा कुणी हिरावून घेऊ शकत नाही.

मी फक्त पद सोडतोय. सगळं अनपेक्षित घडतंय. मी आलोच होतो अनपेक्षितपणे, जातोही अनपेक्षितपणे, पण मी कुठेही जात नाही, पण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी इथेच राहणार आहे. यापुढे मी पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसायला सुरुवात करणार आहे. पुन्हा शिवसैनिकांना भेटायला सुरुवात करणार आहे. पुन्हा तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेची नवीन वाटचाल करणार आहे. शिवसेना तीच आहे. शिवसेना आपल्यापासून कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी खिंडार पडलेल्या शिवसेनेला नव्या उमेदीने उभे करण्याची भाषा केली.

- Advertisement -

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांचेही आवर्जून आभार मानले. शिवसेनाप्रमुखांनी औरंगाबादला संभाजीनगर नाव ठेवलं होतं, ते नाव आपण आज दिलं आहे. उस्मानाबादला धाराशीव हे नाव दिलं आहे. हे निर्णय घेताना आयुष्य सार्थकी लागल्याचं मला वाटलं. वांद्रे वसाहतीतच सरकारी कर्मचार्‍यांना हक्काचं घर मिळावं म्हणून भूखंड मंजूर केला आहे. सरकार म्हणून आपण काय केलं, तर सुरुवातीलाच छत्रपतींच्या रायगडाला निधी देऊन कामाला सुरुवात केली. शेतकर्‍यांना कर्जमुक्त केलं. पीकविमा योजनेचं बीड पॅटर्न करून घेतलं. आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिया गांधी आणि सहकार्‍यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेताना फक्त ४ शिवसेनेचे मंत्री होते. बाकीचे तुम्ही जाणताच. या निर्णयाला एका अक्षरानेही कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला, तर ज्यांनी करायचं होतं ते नामानिराळे राहिले, असं म्हणत सहकारी पक्षांचे आभार मानले.

मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, आपल्या लोकांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला आक्षेप असेल तर आम्ही बाहेर पडतो. बाहेरून पाठिंबा देतो, पण त्यांना सांगा तुम्ही या. कालही मी आवाहन केलं होतं

राज्यपालांना टोला
तातडीने बहुमत चाचणी करण्याचा राज्यपालांनी आदेश दिला आहे. त्या आदेशाचं पालन करण्याचा निर्णय न्यायालयानं दिला होता. त्यावर न्यायदेवतेनं निकाल दिला आहे. तो मान्य असायलाच पाहिजे. राज्यपालांनाही धन्यवाद द्यायचं आहे की आपण लोकशाहीचा मान राखला. काहींनी तुमच्याकडे पत्र दिल्यानंतर २४ तासांच्या आत बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले, पण दीड वर्षापासून विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी तुमच्याकडे प्रलंबित आहे. तीही तातडीने अजूनही मंजूर केलीत, तर आपल्याबद्दलचा आदर द्विगुणित होईल, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला.

ज्यांनी मोठं केलं त्यांनाच विसरली
लहानणापासूनच मी शिवसेना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेनाप्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झालो म्हणायला लागली. मातोश्रीला सातत्याने लोक येत आहेत. साधी माणसं येत आहेत. काळजी करू नका म्हणत आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं ते हिमतीनं सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी. याच नात्याच्या जोरावर शिवसेना आजपर्यंत मजबूत उभी राहिली आहे.

मी मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे. विधान परिषद सदस्यत्वही सोडत आहे. आता फक्त शिवसेनेचीच धुरा सांभाळणार.-–उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -