घरफिचर्ससारांशमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरतील ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना पुरून उरतील ?

Subscribe

एकनाथ शिंदे यांचा बंडखोर आक्रमक आणि कामाचा प्रचंड उरक हे गुंज लक्षात घेतले तर भलेही भाजपची राजकीय गरज म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले असेल, मात्र एकनाथ शिंदे हे या संधीचेही सोने केल्याशिवाय स्वस्थ बसणारे नेते नाहीत. अर्थात आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांची कार्यशैली ही विरोधकांबरोबर मिली जुली सरकार चालवणे या धाटणीतली होती, पण आता मात्र ते ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत ती पद्धत आणि आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शरद पवार अजित पवार ते अगदी काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत अशा सार्‍यांच्या नजरा आता एकनाथ शिंदे यांच्यावर सतत असणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण एकनाथ शिंदे या सहा अक्षरी नावाभोवती फिरत आहे. मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत आणि ठाण्यापासून ते थेट अगदी पाकिस्तानपर्यंत एकनाथ शिंदे या नावाबाबत अकस्मात नेटकर्‍यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील सर्व प्रस्थापित राजकीय समीकरणे एकनाथ शिंदे यांनी उलथवून टाकली आहेत. ‘मै समुंदर हू लौटकर फिर वापस आऊंगा’, असे सुनावणार्‍या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील बाजूला ढकलत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्याची खुर्ची कधी बळकावली हे फडणवीस यांच्यासह राज्यातील आणि केंद्रातील दिग्गज भाजप नेत्यांना देखील कळू शकले नाही. एकूणच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत घडवून आणलेले अभूतपूर्व आणि ऐतिहासिक बंड आणि त्यानंतर राज्यातील भाजपमध्ये झालेला मोठा राजकीय भूकंप लक्षात घेता रिक्षाचालक म्हणून एकनाथ शिंदे यांची अवहेलना करणार्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण सर्वांना पुरून उरू, असा निर्वाणीचा निर्णायक इशाराच त्यांच्या कृतीतून दिला आहे.

एकनाथ शिंदेंना गृहीत धरण्याची चूक..?

- Advertisement -

शिवसेनेमध्ये शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून शिवसेनेवर जेव्हा जेव्हा संकटे आली, तेव्हा तेव्हा ही संकटे अत्यंत कडवट आणि निष्ठावंत शिवसैनिकाप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या अंगावर घेतली. मग ते राज ठाकरे यांचे बंड असो की २०१४ मध्ये संपूर्ण देशात नरेंद्र मोदी नावाचे तुफान गोंगावत असताना ठाणे जिल्ह्यातून शिवसेनेचे नऊ शिलेदार विधानसभेवर निवडून देणे असो. शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर मास लीडर म्हणून ओळखले जाणारे आणि प्रत्यक्षात रस्त्यावर संघर्ष करून शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा करणारे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांमध्ये अधिक लोकप्रिय होते आणि आहेत. एकनाथ शिंदे यांना देखील हे यश काही एका दिवसात मिळालेले नाही. त्याकरिता त्यांनी त्यांच्या आयुष्याची अडीचहून अधिक दशके शिवसेनेसाठी खपवली आहेत.

ठाणे महापालिकेवर भगवा फडकवणे असो, कल्याण डोंबिवली महापालिका भाजपच्या ताब्यातून शिवसेनेकडे खेचून आणणे असो, अथवा उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणे असो, एकनाथ शिंदे यांनी एकदा खांद्यावर जबाबदारी घेतली की मातोश्री अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे निर्धास्त असायचे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध तालुक्याचे मैत्रीपूर्ण असताना देखील शिवसेनेची सत्ता महापालिकांमध्ये यावी म्हणून एकनाथ शिंदे यांनी मनसेचे नगरसेवक देखील फोडले आणि ते शिवसेनेत आणले. फोडाफोडीच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांचा हात धरू शकेल असा दुसरा नेता अद्याप तरी शिवसेनेत नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील हुकमी महापालिकांमध्ये देखील शिवसेनेला आता सत्ता राखणे अत्यंत अवघड होऊन बसणार आहे. सर्वसामान्य आणि तळागाळातील शिवसैनिकांच्या संपर्कात राहायचे, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायच्या आणि या अडीअडचणींवर त्यांना दिलासा द्यायचा, ही एकनाथ शिंदे यांची कार्यपद्धती केवळ शिवसैनिकांनाच नव्हे तर आता शिवसेनेच्या आमदार खासदार अगदी मंत्र्यांना देखील या अभूतपूर्व मंडळीत मोलाची साथ देऊन गेली याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

- Advertisement -

आत्तापर्यंत मातोश्रीने केवळ शिवसेनेकडून उमेदवारी द्यायची आणि त्या उमेदवारांनी निवडून मात्र स्वबळावर यायचे, अशी सर्वमान्य पद्धत आहे. केवळ उमेदवारी दिल्याने कोणताही कार्यकर्ता हा निवडणुकीमध्ये निवडून येत नसतो. निवडून येण्याचे फंडे आता पूर्णपणे बदलले आहेत. कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ, सढळ हस्ते खर्च करण्याची तयारी आणि त्याचबरोबर सर्वांना सांभाळून घेऊन सर्वांना बरोबरीने जो नेऊ शकतो असाच कार्यकर्ता हा नगरपालिकेपासून ते विधानसभा अगदी लोकसभेपर्यंत देखील आता निवडून येत असतो. साहजिकच निवडणूक जिंकण्यासाठी धनशक्ती आताच्या काळातील कळीचा मुद्दा आहे. मातोश्रीने एकदा उमेदवारी दिली की तो उमेदवार मतदारांमधून कसा निवडून येईल यासाठी एकनाथ शिंदे हे स्वतः तन मन धनाने पूर्णपणे त्याच्या पाठीशी राहत असत. शिवसेनेला जे यश मिळाले त्यामागे एकनाथ शिंदे यांनी केलेले पडद्याआडील अखंड परिश्रम हे प्रमुख कारण आहे.

एकनाथ शिंदे यांच्या निष्ठांंबाबत आजही शंका घेतल्या जाऊ नयेत असेच म्हणावे लागेल, कारण त्यांची जेवढी आढळ आणि शांत श्रद्धा शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आहे तेवढीच आदर्श श्रद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील होती. जोपर्यंत विधिमंडळातील शिवसेनेची धुरा एक हाती एकनाथ शिंदे यांच्या हातात होती तोपर्यंत शिंदे यांनी मातोश्रीचा कोणताही शब्द कधी खाली पडू दिला नाही. विशेषतः २०१४ ते २०१९ या काळात महाराष्ट्रामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक हाती सरकार सत्तेवर होते. शिवसेनेकडून भाजपवर तसेच भाजप नेतृत्वावर सातत्याने टीकेचे घाव केले जात असल्यामुळे भाजपचे मंत्री आणि अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील शिवसेना आमदार खासदार यांच्या कामांना दुय्यम स्थान देत असत.

इतकेच कशाला अगदी एकनाथ शिंदे यांनी शिफारस केलेल्या बदल्या नियुक्त्या यांना देखील त्यावेळी मुख्यमंत्र्यांकडून केराची टोपली दाखवली जात असे, मात्र अशा परिस्थितीत देखील एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेत शिवसेनेला अधिकाधिक यश पदरात कसे पाडून घेता येईल याचे शर्तीचे प्रयत्न केले. बर्‍याच वेळा या प्रयत्नांमध्ये त्यांना अपमानित देखील व्हावे लागले, मात्र तरी देखील सामान्य शिवसैनिकाप्रमाणे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावंत राहिले. २०१९ मध्ये शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील भाजपबरोबर युती करून लढवल्या आणि मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी पंगा घेत काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला. एकनाथ शिंदे या निर्णयात देखील उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने राहिले. इतकेच नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेला शपथविधी झाल्यानंतर अजित पवारांबरोबर गेलेले राष्ट्रवादीचे आमदार त्यांच्या ताब्यातून सोडून आणून राष्ट्रवादीकडे सोपवण्याचे काम देखील एकनाथ शिंदे यांनी त्या काळात अत्यंत निष्ठेने केले.

कोणताही कार्यकर्ता जेव्हा स्वतःच्या पक्ष नेतृत्वासाठी सर्व मर्यादा ओलांडून आणि टोकाचा संघर्ष अंगावर घेऊन काम करत असतो तेव्हा त्या कार्यकर्त्याला पक्ष नेतृत्वाकडून देखील तसेच पाठबळ मिळणे हे आवश्यक असते, मात्र दुर्दैवाने याच काळात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची एन्ट्री विधिमंडळ शिवसेना पक्षात झाली आणि तेथूनच खरे तर विधिमंडळ शिवसेना पक्षावरील एकनाथ शिंदे यांची चालणारी एकहाती हुकूमत याला ब्रेक लागला. एकनाथ शिंदे यांना राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर क्रमांक दोनचे नगरविकास खाते तसेच ठाणे आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री पद देण्यात आले खरे, मात्र नगरविकास खात्यात आदित्य ठाकरे यांच्याकडून ढवळाढवळ सुरू झाली. इतकेच नव्हे तर ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांमध्ये एकनाथ शिंदे यांनी नेमलेले पालिका आयुक्त देखील मातोश्रीवरून तडकाफडकी बदलण्यात आले.

ठाणे जिल्हा हा ज्याप्रमाणे स्वर्गीय आनंद दिघे यांनी शिवसेनेसाठी बालेकिल्ला बनवला होता तो बालेकिल्ला काँग्रेस राष्ट्रवादी आणि नरेंद्र मोदी यांच्या काळातील भाजपच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम एकनाथ शिंदे यांनी या काळात केले होते. त्यामुळे किमान ठाणे जिल्ह्यात तरी आपल्या मर्जीतील आयुक्त असावेत असे जर नगरविकास मंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना वाटत असेल तर त्यात काही गैर आहे असे समजण्याचे कारण नाही, मात्र शिंदे यांना इथे दुखावले गेले आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्यातील स्वाभिमान आणि बंडखोर जागा झाला. राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना जर ठाणे जिल्ह्यात आपला शब्द ऐकला जाणार नसेल तर ही सत्ता काय कामाची, असा प्रश्न त्यांना पडला नसता तरच नवल होते. शिवसेनेला संघर्ष करण्यासाठी, पालिकेपासून ते विधानसभा लोकसभेपर्यंत यश मिळवून देण्यासाठी एकनाथ शिंदे लागतात मात्र जेव्हा निष्ठेचे फळ द्यायची वेळ येते तेव्हा मात्र भलतेच पुढे सरसावतात याची प्रचिती एकनाथ शिंदे यांना २०१९ पासून म्हणजे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मिळू लागली होती.

त्यामुळेच उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेपासून काहीसे लांब राहू लागले किंबहुना त्यांना हेतू पुरस्पर लांब ठेवण्यात आले. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही हेच झाले आणि परिणामतः एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडील शस्त्रे परजायला सुरुवात केली. वास्तविक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विधानसभेतील एकेक आमदार अत्यंत महत्त्वाचा असतो कारण विधानसभेतील या एकेका आमदाराच्या पाठबळावरच मुख्यमंत्र्यांचे आसन अवलंबून असते. उद्धव ठाकरे यांनी मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर नेमके उलट काम केले. एकनाथ शिंदे यांचे पंख छाटण्याच्या नादात एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या ४० आणि अपक्ष असे मिळून ५२ आमदार घेऊन गुजरातमधील सुरत येथे कधी पोहोचले याचा थांगपत्ता देखील मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लागू शकला नाही. एकनाथ शिंदे यांनी बंड करून सुरत गाठल्याच्या घटनेनंतर देखील काही आमदार वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बंदोबस्तात सुरत येथे पोहोचले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे या काळात काय करत होते, असा प्रश्न जर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला तर त्यात चूक ते काय? सत्तेच्या हस्तिदंती मनोर्‍यातून बाहेर न पडता काम केले की त्याचे परिणाम असेच भोगावे लागतात.

एकनाथ शिंदे यांचा बंडखोर आक्रमक आणि कामाचा प्रचंड उरक हे गुंज लक्षात घेतले तर भलेही भाजपची राजकीय गरज म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले असेल मात्र एकनाथ शिंदे हे या संधीचेही सोने केल्याशिवाय स्वस्थ बसणारे नेते नाहीत. अर्थात आत्तापर्यंत एकनाथ शिंदे यांची कार्यशैली ही विरोधकांबरोबर मिली जुली सरकार चालवणे या धाटणीतली होती, पण आता मात्र ते ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत ती पद्धत आणि आताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे यांच्यापासून ते शरद पवार अजित पवार ते अगदी काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत अशा सार्‍यांच्या नजरा आता एकनाथ शिंदे यांच्यावर सतत असणार आहेत. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्याशी संघर्ष करायचा, दुसरीकडे राष्ट्रवादीतील दिग्गजांना झेलायचे आणि तिसरीकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या कारवायांना ब्रेक लावायचा, तर चौथीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मर्जी राखायची, अशा विविध पातळ्यांवर एकनाथ शिंदे यांना आता टकमक टोकाची लढाई लढावी लागणार आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे ५०, ५२ बंडखोर आमदार त्यांच्याबरोबर आले आहेत ते नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यायची हे प्रमुख आव्हान मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासमोर असणार आहे. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत सर्वांना पुरून उरतील का, हा आजच्या घडीचा सर्वात कळीचा प्रश्न आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -