घरसंपादकीयअग्रलेखअमृता वहिनींच्या वेशांतराच्या गप्पा !

अमृता वहिनींच्या वेशांतराच्या गप्पा !

Subscribe

गेल्या २० ते २५ दिवसांपासून प्रचंड घडामोडींनी सुरू असलेले राजकारण आता स्थिरावताना दिसतेय. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वातावरण आता पूर्ववत होत आहे. अर्थात ही बंडखोरी उद्धव ठाकरे यांना जिव्हारी लागल्याने ते शिंदे गटावर टीका करण्याची एकही संधी गमावत नाहीत. दुसरीकडे बंडखोर आमदारांनीही सत्तांतराच्या सुरस कथा जनतेला सांगणे सुरू केले आहे. याची सुरुवात केली दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी. बहुमत मिळवल्यानंतर सभागृहात केलेल्या भाषणात त्यांनी या संपूर्ण घडामोडींचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना दिले. आमदार झोपल्यावर आपण रात्रीच्या वेळी फडणवीस यांना भेटायला जात होतो असे सांगून टाकले. यावर फार भाष्य करु नये अशी फडणवीस यांचीच इच्छा असली तरी आता त्यांच्या पत्नीनेच एका मुलाखतीत गौप्यस्फोट केला आहे. मध्यरात्रीनंतर फडणवीस वेश बदलून घराबाहेर पडत, असे सांगितल्यानंतर सोशल मीडियावर हे वक्तव्य ट्रोल झाले नसेल तर नवलच! फडणवीस कधीकधी चष्मा व हुडी घालून बाहेर पडायचे. त्यामुळे ते मलाही ओळखू यायचे नाही, असेही अमृता यांनी म्हटले आहे.

खरंतर सोशल मीडियाच्या हिट पर्सनॅलिटीमध्ये अमृता यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. देवेंद्र आणि अमृता या दोघांच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक असल्याने अमृता काहीही बोलल्या तरी त्या ट्रोल होतात. देवेंद्र फडणवीस यांच्या वेशांतराबद्दल बोलल्यानंतरही त्या कमालीच्या ट्रोल झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वीही अमृता फडणवीस यांनी एका वाहिनीला मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस हे एकावेळी ३५ पुरणपोळ्या पातेलेभर तुपासोबत खायचे अशी माहिती दिली होती. फडणवीसांच्या खादाडपणावर त्यांच्याच घरातून माहिती देण्यात आल्याने सोशल मीडियावर फडणवीस आणि पुरणपोळ्या याविषयी हातघाई सुरू झाली. गंमत म्हणजे, फडणवीस यांना त्यानंतर ज्या महिला कार्यकर्त्या भेटायला यायच्या त्या डब्यांमध्ये पुरणपोळ्या आणू लागल्या. शिवाय टीकाकारांना आयते कोलित मिळाले. अखेर आपल्याला पुरणपोळ्या अजिबातच आवडत नाहीत, असे फडणवीस यांनीच एका मुलाखतीत स्पष्ट केले. यापूर्वी मला कधीही पुरणपोळ्या आवडत नव्हत्या. अमृताला ही चुकीची माहिती कुणी दिली माहीत नाही, अशा शब्दात त्यांनी या ‘पुरणपोळीपुराणा’ला पूर्णविराम दिला. त्यानंतर आता वेशांतराच्या वक्तव्याला फोडणी दिली जात आहे.

- Advertisement -

वेशांतर केले आणि त्यांना कुणी ओळखणार नाही असे फडणवीसांचे व्यक्तीमत्व नाही. त्यामुळे अमृता फडणवीस या अतिरंजीत कहाण्या बनवताहेत हे स्पष्ट होत आहे. त्यातही महाराष्ट्रातच नव्हे तर मुंबईतही अशा असंख्य जागा आहेत, जेथे फडणवीस आणि शिंदे यांची एकांतात भेट होऊ शकली असती. त्यासाठी वेशांतर करण्याची गरज भासली नसती. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या समवेत पहाटेच्या समयी घेतलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेची कुणकुणही कुणाला लागली नाही. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुजरातला पोहोचले ही बाब ते तेथे पोहोचल्यावर बाहेर आली.

राजकीय क्षेत्रात गोपनीयता कमालीची पाळता येते याचे हे मासलेवाईक उदाहरण म्हणता येईल. अशा पार्श्वभूमीवर वेश बदलून कुणाची भेट घेणे ही बाब रुचणारी नाही. वेशांतर करुन फडणवीस यांनी अन्य पक्षांना हुलकावणी दिली यात तथ्य असले तरीही अमृता फडणवीस यांच्यावर विश्वास तरी कोण ठेवणार. कानफट्या म्हणून जर एखाद्याची ओळख झाली तर ही ओळख पुसणे मोठे मुश्किल जाते. त्यामुळे अमृता यांनी टाकलेली प्रत्येक पोस्ट थट्टेचा विषय होते. मात्र यात देवेंद्र यांच्याही स्थितप्रज्ञ आणि समजूतदार भूमिकेला सलाम करायला हवा. स्त्री स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्यांनीही अमृता यांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला नाही ही बाब कौतुकास्पदच म्हणावी लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात खबरी वेश बदलून शत्रूच्या कंपूत शिरायचे अशा नोंदी आहेत. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचासुद्धा अत्यंत मौलिक सहभाग होता. परंतु सांप्रत काळात तशी परिस्थिती नाही. त्यामुळे वेश बदलून ओळख लपवण्याची गरजच निर्माण होत नाही. अर्थात वेशांतराची चर्चा केवळ अमृता फडणवीस यांनीच घडवून आणली असे नाही.

- Advertisement -

विधानसभेतील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील छगन भुजबळांच्या वेशांतराचा विषय छेडला होता. ३५ वर्षांपूर्वी म्हणजे ४ जून १९८६ ला कानडी सक्तीच्या विरोधात आणि बेळगाव-कारवार सीमाप्रश्नी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने वेशभूषा करून भुजबळांनी बेळगावात आंदोलन केले होते. महाराष्ट्रातून येण्याचे मार्ग बंद केल्यानंतर भुजबळ हे वेश बदलून गोवा मार्गे बेळगावात दाखल झाले. दुबईचे व्यापारी इक्बाल शेख यांची वेशभूषा त्यांनी केली होती. यानंतर त्यांना अटक करण्यात होती. या आंदोलनात अटक झाल्यानंतर तुरुंगात आपल्याला कसे फटके बसत होते, याचे वर्णनही एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केले. वेशांतराचा आणखी एक किस्सा गाजला तो बच्चू कडू यांचा. धान्य वितरणातील काळा बाजार रोखण्यासाठी गेल्या वर्षी त्यांनी युसूफखा पठाण हे बनावट नाव धारण केले. त्याप्रकारचा मुस्लीम धर्मियांसारखा पेहरावही केला. तशा अवस्थेत त्यांनी अकोला महापालिकेचा फेरफटका मारला. या स्टिंग ऑपरेशनमधून त्यांना रेशनचा काळाबाजार उघडकीस आणता आला नाही. मात्र गुटख्याचा साठा जप्त करता आला.

अर्थात त्यावेळी बच्चू कडू यांनी केलेली वेशभूषा बघता त्यात बच्चू कडू आहेत हे सहजपणे लक्षात येत होते. त्यामुळे त्यांना अपेक्षीत असलेले स्टिंग ऑपरेशन यशस्वी होऊ शकले नाही. जी व्यक्ती सातत्याने माध्यमांमध्ये झळकत राहते त्या व्यक्तीने वेशांतर केले तर कुणी ओळखणारच नाही हा दावा येथे पुसला जातो. त्याच धर्तीवर फडणवीसांच्या कथित वेशांतराकडे पाहिले जात आहे. ज्या घटनांचे कुणी साक्षीदार नाहीत, त्याविषयी काहीही बोलले तरी ते खपतेे अशी मानसिकता अमृता यांची झालेली दिसते. उद्या फडणवीस हेच एकनाथ शिंदेंसारखा वेश परिधान करुन राज्यकारभार हाकीत आहेत असा दावा अमृता यांनी केला तरी नवल वाटू नये! कारण काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याविषयी वक्तव्ये करून वाद निर्माण करण्याच्या अमृता यांच्या भूमिकेविषयी बोलताना फडणवीसांनी स्वत:च अमृता यांची अप्रत्यक्षपणे कानउघाडणी केली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता देवेंद्र फडणवीस सत्तेत आलेले आहेेत, त्यामुळे अमृतांची गाडीही सुसाट असणार यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -