घरदेश-विदेशबिहारमध्ये पुन्हा गठबंधन सरकार

बिहारमध्ये पुन्हा गठबंधन सरकार

Subscribe

नितीश कुमार आठव्यांदा मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव दुसर्‍यांदा उपमुख्यमंत्री, जदयूला १२, तर राजदला २१ मंत्रीपदे

बिहारमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेडचे गठबंधन सरकार सत्तेत आले आहे. नितीश कुमार यांनी बुधवारी आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल फागू चौहान यांनी दोघांनाही पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारचा सत्तेचा फॉर्म्युलादेखील ठरला आहे. ज्यांचे आमदार ज्यास्त त्यांना अधिक मंत्रीपदे देण्याचे दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यानुसार जदयूला १२, तर राजदला २१ मंत्रीपदे मिळणार आहेत. भाजपकडून जदयूत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करून नितीश कुमार यांनी भाजपशी असलेली युती तोडली होती.

राज्यात सत्तांतर होताच भाजपचे विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांच्याविरोधात महागठबंधनने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. नवीन अध्यक्षांची निवड बहुमत चाचणीच्या वेळी होईल. राजदला विधानसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता असली तरी काँग्रेसनेही अध्यक्षपदाच्या खुर्चीवर दावा केला आहे.

- Advertisement -

मंगळवारी संध्याकाळी नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांना ७ पक्षांच्या १६४ आमदारांचे समर्थन पत्र सादर केले होते. नितीश यांच्यासोबत तेजस्वी यादवही राजभवनात उपस्थित होते. नितीश आणि तेजस्वी यांनी सरकार स्थापनेचा दावा मांडल्यानंतर राजभवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली होती.

२०२४मध्ये ते राहणार नाहीत – नितीश कुमार
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनीही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या विधानाचा समाचार घेतला. काही लोकांना वाटते की विरोधी पक्ष संपुष्टात येईल, पण आता आम्हीही विरोधी पक्ष आहोत.
आम्ही राहू न राहू, पण २०२४मध्ये ते सत्तेत राहणार नाहीत, असा इशारा नितीश कुमार यांनी दिला. देशातील सर्वच प्रादेशिक पक्ष संपतील. फक्त भाजप राहील, असे विधान नड्डा यांनी केले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -