घरसंपादकीयओपेडकाँग्रेसची अस्तित्वाची लढाई, भाजपची आत्मप्रौढीची बढाई !

काँग्रेसची अस्तित्वाची लढाई, भाजपची आत्मप्रौढीची बढाई !

Subscribe

काँग्रेसने ब्लॅक फ्रायडे असं म्हणत दिल्लीसह देशभर मोठं आंदोलन केलं. त्यात सोनिया, प्रियांका आणि राहुल सहभागी झाले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या साथीने काँग्रेसने जोरदार आवाज उठवला होता. त्याची धास्तीच जणू केंद्र सरकारने घेतल्याचं आंदोलकांवर केलेल्या पोलिसी कारवाईतून दिसून आलं आहे. दिल्लीत पोलिसांनी आंदोलन ताकद लावून चिरडून टाकण्यापर्यंत मजल मारली होती. काँग्रेसजन कोणतीही हिंसा न करता शांततेच्या मार्गानं आंदोलन करत होते. तरीही, पाण्याचे वेगवान फवारे मारून व गाड्यांमध्ये भरून त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात केंद्र सरकारने गांधी कुटुंबियांची मोठी कोंडी केली आहे. त्यामुळे अस्तित्वाची चिंता असलेले गांधी कुटुंबीय गेल्या आठवड्यात रस्त्यावर उतरले होते. त्यांना देशातील अनेक राज्यांमधील काँग्रेसजनांनी रस्त्यावर उतरून साथ दिली. ही त्यातल्या त्यात काँग्रेसच्या दृष्टीने आशादायक बाब मानावी लागेल. दुसरीकडे, आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील. फक्त भाजप हाच एकमेव पक्ष अस्तित्वात असेल. जे उरतील तेही संपून जातील, असं भाकित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. भाजपने काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली होती. त्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्या विधानाला म्हणूनच महत्व आहे.

एकेकाळी काँग्रेसची कन्याकुमारी ते कश्मिरपर्यंत मोठी ताकद होती. पण, गेल्या तीन दशकात काँग्रेसची सुरू झालेली वाताहात अजून सुरुच आहे. असं असलं तरी सध्या भारतात राष्ट्रीय पातळीवरचा एकमेव पक्ष हा काँग्रेसच उरला आहे. गांधी कुटुंबियांसोबतच काँग्रेसमधीलच दिग्गजांच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटीच काँग्रेसची आजची अवस्था बनली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शहरीकरण कमी प्रमाणात होतं. त्यामुळे काँग्रेसची ध्येयधोरणे, योजना ग्रामीण भागाशी केंद्रित होत्या. पुढे शहरीकरणाचा वेग वाढल्यानंतर काँग्रेसने स्वतःमध्ये धोरणात बदल करणं गरजेचं होतं. पण, ते केलं नाही त्याचा परिणाम शहरी भागात काँग्रेस दमदारपणे रुजू शकली नाही. तसेच ग्रामीण भागातही काँग्रेसला हळूहळू ओहोटी लागली. एकेकाळी काँग्रेस कायम दलित-अल्पसंख्यांकांना नेहमीच जवळचा पक्ष वाटत होता.

- Advertisement -

हाच काँग्रेसचा मूळ पाया होता. तोच आता उध्वस्त झाला आहे. त्यांच्याकडे झालेलं दुर्लक्ष काँग्रेसपासून हक्काचे मतदार दूर होण्यात झाला. दुसरीकडे, प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यातील जातीनिहाय राजकारण करत काँग्रेसपासून दुरावलेला वर्ग आपल्याकडे खेचण्यात यश मिळवलं. भाजपने पूर्वीपासूनच हिंदुत्वाचा विचार कायम ठेवला होता. काँग्रेस अल्पसंख्यांकांचं लांगूनचालन करतंय, हेही पटवून देण्यात भाजप यशस्वी ठरला. काँग्रेस हिंदुविरोधी पक्ष असल्याचं सर्वसामान्यांच्या मनात रुजवण्यातही भाजपला यश मिळालं. काँग्रेसवर घराणेशाहीचा डाग लावण्यातही भाजपला बर्‍यापैकी यश मिळालं. काँग्रेसच्या पिछेहाटीला हीही महत्वाची कारणं मानली जातात.

काँग्रेसच्या पिछेहाटीची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही काँग्रेसला अनेक धक्के बसले होते. पण, त्यातूनही काँग्रेस तावूनसुलाखून पुन्हा उभा राहिला होता. पण, आताची ती परिस्थिती नाही. आता काँग्रेसमधूनच गांधी कुटुंबियांवर विश्वास राहिलेला नाही. इंदिरा गांधींचं नेतृत्व ऐन बहारात होतं. त्यांचा पराभव होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं. पण, १९७७ साली इंदिरा गांधी आणि काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यावेळी काँग्रेसमधील अनेक दिग्गजांनी इंदिरा गांधींची साथ सोडली होती. त्यानंतर १९८९ मध्ये राजीव गांधी यांचा असाच पराभव काँग्रेसला मोठा हादरा देऊन गेला होता. पण, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी राज्याराज्यात फिरून जिद्दीने पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं होतं. त्यासाठी दोघांनाही मोठा संघर्ष करावा लागला होता.

- Advertisement -

त्यामुळे काँग्रेसला पुन्हा उभारी द्यायची असेल तर गांधी कुटुंबियांसोबतच देशभरातील काँग्रेसजनांना लोकांमध्ये जाण्याची गरज आहे. त्यांचा विश्वास संपादन करण्याची हीच वेळ आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्ष वाचवण्यासाठी मैदानात उतरल्याचं गेल्या आठवड्यात झालेल्या आंदोलनातून दिसून आलं आहे. विशेष म्हणजे या दोघांसोबत स्वतः सोनिया गांधीही रस्त्यावर उतरल्या होत्या. या तिघांना इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी पक्षाला नवसंजीवनी ज्याप्रकारे मिळवून दिली, त्याचप्रकारे काम करावं लागणार आहे. केंद्र सरकारच्या इंधन आणि जीवनाश्यक दरवाढीवरून सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहे. या अंसतोषाला वाट करून देण्यासाठी गांधी कुटुंबियांना काँग्रेसजनांसोबत रस्त्यावरचं आंदोलन सतत करावं लागणार आहे. एकतर, भाजपने देशभक्तीच्या नावाने बहुसंख्याकांची मने दुसरीकडे वळवली आहेत. त्यामुळे महागाईने होरपळून जात असतानाही सर्वसामान्य काही बोलायला तयार नाही. त्यांचा आवाज होण्यात काँग्रेस यशस्वी ठरली तर आणि तरच काँग्रेसला पुन्हा उभारी मिळू शकेल. अन्यथा नॅशनल हेरॉल्ड प्रकरण अंगाशी आल्यानंच गांधी परिवार आंदोलन करतोय, असा संदेश जाऊन काँग्रेसच्या अडचणीत वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

विरोधी पक्षात बसायची सवय नसलेल्या काँग्रेसचे नेते अस्वस्थ झाले आहेत. काँग्रेसला सतत सत्ता मिळत गेल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचं काम नेते करत नाहीत. हतबल झालेले नेते भाजपकडून होणार्‍या आरोपांनाही उत्तरे देण्यात कमी पडत आहेत. त्यातील काँग्रेसवर होणारा घराणेशाहीचा आरोप महत्वाचा आहे. तसं पाहिलं तर १९८९ साली राजीव गांधी यांचं सरकार गेल्यानंतर गांधी परिवारातून एकही सदस्य सरकारमध्ये सामिल झालेला नाही. सोनिया गांधींनंतर राहुल गांधींनाच अध्यक्ष करायचं, त्यांच्याकडेच पक्षाचं नेतृत्व द्यायचं यावरून पक्षात दोन मतप्रवाह आहेत. पण, राहुल गांधी पक्षाध्यक्ष स्वीकारण्यास पुन्हा-पुन्हा नकार देत आहेत. हे खरं तर भाजपकडून होणार्‍या घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर आहे. पण, काँग्रेस लोकांपर्यंत पोचवण्यास कमी पडत असल्याने गांधी घराण्याचीच काँग्रेसवर मक्तेदारी असल्याच्या आरोपाला पुष्टी मिळण्याचं काम होत आहे.

गेल्या शुक्रवारी काँग्रेसने ब्लॅक फ्रायडे असं म्हणत दिल्लीसह देशभर मोठं आंदोलन केलं. त्यात सोनिया, प्रियांका आणि राहुल सहभागी झाले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या साथीने काँग्रेसने जोरदार आवाज उठवला होता. त्याची धास्तीच जणू केंद्र सरकारने घेतल्याचं आंदोलकांवर केलेल्या पोलिसी कारवाईतून दिसून आलं आहे. दिल्लीत पोलिसांनी आंदोलन ताकद लावून चिरडून टाकण्यापर्यंत मजल मारली होती. काँग्रेसजन कोणतीही हिंसा न करता शांततेच्या मार्गानं आंदोलन करत होते. तरीही, पाण्याचे वेगवान फवारे मारून व गाड्यांमध्ये भरून त्यांना हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. या आक्रमक कारवाईमधून काँग्रेसचे खासदारही सुटले नाहीत. राजधानी दिल्लीप्रमाणे राज्यांच्या राजधान्या आणि मोठ्या शहरांमध्ये काँग्रेसने हे आंदोलन केले. बर्‍याच काळाने काँग्रेस पक्ष देशभरात असा एकजुटीने आंदोलन करताना दिसला.

गांधी कुटुंबियांवर केंद्रीय यंत्रणा कारवाई करत असताना झालेलं आंदोलन यावर टीका करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईमुळेच आंदोलन केलं जात आहे, असा आरोप भाजपकडून केला जाऊ लागला आहे. तर बाबरी मशीद पडली तोच दिवस आंदोलनासाठी निवडून, ब्लॅक फ्रायडे साजरा करणारी काँग्रेस बाबरी मशीद पाडल्याचा निषेध करू पहात आहे, असाही आरोप भाजपकडून केला गेला आहे. म्हणूनच काँग्रेसने देशभर आंदोलन सुरू ठेवलं तरच त्यांच्या भूमिकेचं स्वागत होणार आहे. दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेलं वक्तव्य तसं गंभीरच आहे. आगामी काळात देशातील सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप हाच एकमेव पक्ष शिल्लक राहील. भाजप हा विशिष्ट विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आपल्या विचारांसमोर सर्व पक्ष नष्ट होतील.

जे उरतील ते संपून जातील, असं नड्डा यांचं म्हणणं आहे. पुढील चाळीस वर्षे काँग्रेस भाजपपुढे उभा राहू शकणार नाही. काँग्रेस भाजपशी बरोबरीच करू शकत नाही. भाजप एका विशिष्ट संस्कारातून पुढे आलेला पक्ष आहे, असंही नड्डा यांचं म्हणणं आहे. हा खरं तर अतिआत्मविश्वासच म्हणावा लागेल. भारताच्या राजकारणाचा इतिहास पाहता कुठल्याही एका पक्षाला भारतीयांनी कायम सत्तेत राहू दिलेलं नाही. स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेसची ऐतिहासिक कामगिरी असतानाही पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला ४८९ पैकी ३६४ जागा जिंकता आल्या होत्या. लोहियांनी काँग्रेसत्तर पक्षांची आघाडी केल्यामुळे १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसला ५२० पैकी फक्त २८६ जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. १९७७ मध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला होता.

भाजपची राजकीय घोडदौड प्रादेशिक पक्षांच्या मदतीने झाली असल्याचा विसर नड्डा यांना पडलेला दिसतो. १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. अवघ्या तेरा दिवसातच त्यांचे सरकार कोसळलं. १९९८ मध्ये भाजपने प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडी निर्माण केली ती अद्यापही कायम आहे. नड्डा सांगतात यानुसार विशिष्ट विचारधारेमुळेच भाजप नंबर एक होईल, हेही विधान न पटण्यासारखंच आहे. भाजपची वाढ करण्यात इतर पक्षांमधून आलेल्या शेकडो नेत्यांचाही मोठा वाटा आहे. महाराष्ट्रापुरता विचार केला तर ईडीच्या भीतीने झालेल्या बंडखोरीमुळेच भाजपला सत्ता मिळवता आली हे आता लपून राहिलेलं नाही.

अनेक भ्रष्ट नेते भाजपच्या छायेत आल्यानंतर स्वच्छ बनून सत्तेत सहभागी होत आहेत, ही कुठली विचारधारा हा सर्वसामान्यांना पडलेला खरा प्रश्न आहे. आमच्याकडे तेल लावून एक से एक पहिलवान तयार आहेत. पण, समोर कुणी पहिलवानाच उरलेला नाही, असे ठामपणे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या निवडणुकीत, ‘मी पुन्हा येईन’ अशी गर्जना केली होती. लोकसभा आणि विधानसभेत विरोधी पक्ष उरणार नाही, असंही भाजपकडून सांगण्यात येत होतं. पण, निकालानंतर मतदारांनी भाजपला आपली जागा दाखवण्याचं काम केलं होतं.

केंद्रीय तपास यंत्रणा काम करत असल्याने कदाचित नड्डा यांना देशात एकही पक्ष उरणार नाही, असं वाटत असावं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. ईडीच्या कारवाईनंतर महाराष्ट्रात सत्तांतर झालं. आता केंद्रीय यंत्रणांनी पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलं आहे. आपलाही केंद्रीय यंत्रणा अधूनमधून धक्का देत असते. बिगर भाजप राज्यात केंद्रीय यंत्रणा काम करताना दिसत नाही. भाजप सत्तेत असलेल्या राज्यांमध्येही केंद्रीय यंत्रणा कार्यरत नाही. प्रादेशिक पक्षांचं समूळ उच्चाटन हा खरा तर भाजपचा मुख्य अजेंडा असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे नड्डा यांनी भाजपविरोधकांना दिलेला हा इशारा तर नव्हे ना.

काँग्रेसची अस्तित्वाची लढाई, भाजपची आत्मप्रौढीची बढाई !
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -