घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रसंस्कृतीची जोपासना करणारी "डिंगर आळी"

संस्कृतीची जोपासना करणारी “डिंगर आळी”

Subscribe

नाशिकचा गौरवशाली इतिहास या मालिकेत आज जाणून घेऊया डिंगर आळी बद्दल

नाशिक ज्या नऊ शिखरांवर मुख्यत्वे वसले आहे त्यातील डिंगर टेक (डिंगर आळी) हे एक महत्त्वाचे शिखर आहे. साळी, मराठा, कोष्टी, कल्हईकर, सोनार या बहुजन समाजाच्या वस्तीचा हा प्रमुख भाग. तथापि, शहराचे भूषण असलेल्या मुख्यत्वे दीक्षित, चंद्रात्रे, देव, गायधनी, वारे, चांदोरकर, राममास्तर कुलकर्णी, एकनाथ शास्त्री शुक्ल, जगन्नाथ देव, केशवराव शिंदेकर, राजाभाऊ शुक्ल, मुरलीधर देव, गंगाधरशास्त्री शुक्ल, नाईक गुरुजी आदी मान्यवरांच्या वास्तव्याने वेढलेला अलंकृत असा हा भाग आहे.

गणेश टेकाच्या प्रसिद्ध ५० दगडी पायर्‍यांनी पायउतार झाले की, समोरील डिंगर टेकास सुरुवात होते. घराच्या प्रवेशद्वारी ज्याप्रमाणे आपण विघ्नहर्त्याची प्रतिमा लावतो त्याप्रमाणे डिंगर टेकाच्या पायथ्यालगत मधली होळीच्या पश्चिमेस सुमारे ३०० वर्षांपासून अधिक काळ आजही वास्तव्य असलेला दीक्षितांचा वाडा आणि इतर वाडे प्रसिद्ध आहेत. अनेक वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या दीक्षित घराण्यात अनेक कर्तबगार व धर्मशास्त्राच्या अधिकारी व्यक्तीने आपल्या विद्वत्तेद्वारे नाशिकच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात अधिराज्य गाजविले आहे.

- Advertisement -

जुने जाणते वैदिकशास्त्री पंडिताचे घराणे बापू रामचंद्र दीक्षित आहेत. जुन्या काळातील विद्वान ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, कंठस्थ, अनेक पोथ्यापुराणांचे हस्तलिखित हे त्यांचे वैशिष्ट्य. नुकतेच दिवंगत झालेले महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातकीर्त धर्मभूषण लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या वास्तव्याने डिंगर टेक पुनीत झाले आहे. चारही पीठांच्या शंकराचार्यांकडून त्यांचा सत्कार झाला. दीक्षित वाड्यात शंकराचार्यांची पाद्यपूजेचा यथासांग दुर्लभ सोहळा फक्त येथेच झाला. संपूर्ण भारतात विविध धार्मिक संघटनांनी कालिदास पुरस्कार, वेदवेदांग पुरस्कार अनेक पदवीदानाद्वारे त्यांना सन्मानित केले. जगाच्या पाठीवरील एकमेव अशा नेपाळ राज्याचे हिंदू नरेशाच्या राज्याभिषेकाचे त्यांनी पौरोहित्य केले. त्यांचे बंधू नारायणराव बापूराव दीक्षित धर्म वेदशास्त्राचे गाढे विद्वान. मॅट्रिकनंतर सिडनहेम कॉलेजात (मुंबई) त्यांनी प्रवेश घेतला. तथापि, कुर्तकोटी शंकराचार्यांनी कॉमर्स शाखेत प्रवेशापासून त्यांना परावृत्त केले. स्वत: कुर्तकोटि संस्कृताचे गाढे व्यासंगी असल्याने त्यांनी मार्गदर्शन केले. न. चिं. केळकर यांचे व दत्तो वामन पोतदार, श्री. म. माटे यांच्या उपस्थितीत पुण्याच्या स. प. कॉलेजमध्ये झालेल्या अखिल भारतीय विद्वत परिषदेत हरिराम शुक्ल व रामचंद्रशास्त्री यांच्या वादविवादाने ते प्रभावित झाले. आपल्या गुरुलाही पराजित करणारा तो प्रसंग पाहून ते बनारसला गेले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक शहरातील नामवंत विधिज्ञ, साहित्यिक, कुशल संघटक अशा चतुरस्त्र गुणांचा आविष्कार असलेले व्यक्तिमत्त्व वयाच्या ८२ व्या वर्षीही सेवारत आहे.

बनारस हिंदू विद्यापीठात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे ते विद्यार्थी होते. या विद्यापीठात ते एम.ए. झाले. राधाकृष्ण व शिवशंकर दीक्षित यांनीही विद्वत परंपरा जोपासली. विविध वैदिक संमेलनात दीक्षित परिवाराने प्रतिनिधित्व केले. धर्मशास्त्राबरोबरच त्यांनी बालसंवर्धनासाठी घराशेजारी तालमी बांधल्या, बलोपासना केली. त्यांच्या परिवारापैकी गायधनी हे शरीरयष्टी असलेले बलोपासक म्हणून आदराने ओळखले जातात.

- Advertisement -

गावाचा मध्यभाग असल्याने मधली होळी येथे शेकडो वर्षांपासून होलिकोत्सवाची परंपरा आहे. त्यांच्या पूजेचा अग्रमान दीक्षित घराण्याकडे आहे. या घरातील रंगपंचमीची रहाड हे आगळे वैशिष्ट्य होते. सर्वात मोठी व जुन्या असलेल्या या रहाडीत प्रथम उडी मारण्याचा मान दीक्षित परिवाराकडे होता. १९३० मध्ये दादासाहेब पोतनीस स्वातंत्र्य चळवळ काळातील बातमीपत्रे दीक्षित यांच्या वाड्यातून छापून घेत असत.

वर्तमान काळात भिक्षुकीचा हा व्यवसाय करणे आजच्या समाजात सन्मानाचे व चरितार्थाचे एकमेव साधन मानले जात नाही. विद्वजनांनी वकिली, डॉक्टर, इंजिनिअरिंग उद्योग क्षेत्रात काळाची गरज म्हणून प्रवेश केला. दीक्षितांच्या नव्या पिढीने येथेही सुयश प्राप्त केले. मधुकर दीक्षित यांचे रेणुका फर्निचर ४० वर्षांपासून या व्यवसायात आहे. उदयन व जयंत दीक्षित वास्तु सजावट, बँकिंग व फर्निचर क्षेत्रात नामवंत आहेत. तसेच, प्रमोदन दीक्षित हे मंगल कार्यालयातील प्रसिध्द अशा ‘शुभंकरोति’ या संस्थेचे चालक आहेत. विजय दीक्षित वास्तुविशारद कलाक्षेत्र या अभिनव संस्थेचे संस्थापक आहेत. येथील पायर्‍यांलगत सुप्रसिध्द चित्रपट कलावंत अनंत उर्फ बंडोपंत धुमाळ यांचे वास्तव्य होते. त्यांचे भाचे धोंडोशास्त्री प्रभू हे अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते.

दीक्षित वाड्यालगत ख्यातकीर्त सराफ कृष्णाजी बाळाजीशेठ शिऊरकर यांची निवासस्थाने आहेत. नाशिक महापालिकेचे निवृत्त अधिकारी मधुकर शिऊरकर यांचे नाव नाशिकच्या प्रत्येक घरमालकास ठाऊक आहे. सावकारीचा कुठलाही व्यवसाय न करणार्‍या या व्यक्तिमत्त्वाला सावकार या उपाधीने नाशिककरांनी सन्मानित केले. निष्णात रत्नपारखी म्हणून प्रभाकरराव योगासनाचे तज्ज्ञ शिक्षक आहेत.

ख्यातकीर्त वास्तुविशारद सुधाकरराव आणि उत्कृष्ट कबड्डीपटू व पुण्याचे पोलीस आयुक्तपद भूषविलेले चंद्रशेखर शिऊरकर यांचे घराणेही डिंगरआळीचे आणखी एक नावाजलेले घराणे आहे. डिंगरआळी टेकावर वसलेल्या इतर मंडळींत शहराच्या जनसामान्यात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे नाझर कदम, नगरपालिकेचे अन्न निरीक्षक बगोबा साळी, सदाशिवराव उपाख्य सद्भाऊ सोमवंशी, प्रभाकरराव धेड (साळी), बाळकृष्ण व दत्तोबा बोरसे, नगरदेवळ्याहून स्थायिक झालेले रघुनाथशेठ बोरसे, त्यांचे चिरंजीव किशोर बोरसे, दीपक बोरसे हे धार्मिक व सांस्कृतिक, ग्रंथालय क्षेत्रातील बोरसे बंधू, शंकरराव जंत्रे आणि अमृततुल्य चहा या विशेषणाने नाशिकच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध भोसले टी हाऊसचे संचालक नीळकंठ जगन्नाथराव भोसले यांचे वास्तव्य याच डिंगर टेकावर आहे. स्वागत हॉटेलचे संचालक, कुस्तीगीरांचे आधारस्तंभ भगवानराव नगरपालिकेचे उपाध्यक्ष भिका पाटील, दाते बंधू, छायाचित्रकार बाबूराव घुले आणि गाजरे बंधूही शहरात प्रसिद्ध असलेली मंडळीदेखील येथील रहिवासी आहेत.

(संदर्भ : सावानाचे माजी अध्यक्ष मधुकर झेंडे लिखित चौकांचा इतिहास पुस्तकातील लेख)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -