घरसंपादकीयअग्रलेखफडणवीस नीती..!

फडणवीस नीती..!

Subscribe

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिंदे सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरे तर राजकीय वर्तुळात चाणक्य म्हणूनच ओळखले जातात. ज्याप्रमाणे २०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपा यांची युती असताना देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सध्या ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांमधून त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन परस्पर विरोधी विचारसरणी असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आले होते आणि शरद पवार यांच्या आग्रहामुळे या अनैसर्गिक विचारांच्या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

मुळात उद्धव ठाकरे यांना शिवसेना कशी हाताळावी याचा अनुभव होता, मात्र राज्य सरकार चालवण्याच्या बाबतीत ते पूर्णपणे अनभिज्ञ होते. त्यात दीड वर्ष कोरोना आणि टाळेबंदी यामध्ये गेली तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या प्रकृती अस्वास्थाचा त्रास सुरू झाला आणि त्यामुळे एकूणच मुख्यमंत्री म्हणून जे नियंत्रण उद्धव ठाकरे यांचे राज्यातील प्रशासनावर, राज्यातील घडामोडींवर तसेच अगदी स्वतःच्या पक्षातील नेत्यांवर असायला हवे होते ते प्रचंड ढिले झाले. मुख्यमंत्रीपद हे जरी सोनेरी मुकुटाप्रमाणे असले तरी प्रत्यक्षात ते काट्यांनी वेढलेले असते. मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने वेळीच जर हे काटे त्याच्या मार्गातून दूर केले नाहीत तर हे काटे खुर्चीवरील मुख्यमंत्र्यालाच कसे टोचतात आणि नाईलाजाने या काट्यांपासून सुटका करून घेण्यासाठी मुख्यमंत्रीपदावरून कसे पायउतार व्हावे लागते याचा अत्यंत कटू अनुभव दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनीच या काळात घेतलेला आहे.

- Advertisement -

वास्तविक उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची २०१९ पूर्वी वैयक्तिक पातळीवर आणि राजकीय पातळीवरदेखील उत्तम मैत्री होती. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याच्या ओघात उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री व्हावे लागले आणि त्यानंतरची अडीच वर्षे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वत्र वावरले. सहाजिकच याची फार मोठी किंमत उद्धव ठाकरे यांना मोजावी लागली आहे. वास्तविक २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची युती होती आणि दोन्ही पक्ष युती करून लोकांना सामोरे गेले. त्यामुळे सहाजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेचा जसा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाला तसाच फायदा शिवसेनेच्या उमेदवारांना झाला हे नाकारण्यात काही अर्थ नव्हता. शिवसेनेमुळेदेखील भाजपला लाभ झाला हे कटू सत्य आहे.

मात्र तरीदेखील उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण केले आणि भाजपच्या मतदारांनी शिवसेनेला केलेल्या मतदानाच्या जोरावर ते महाराष्ट्रात अडीच वर्षे मुख्यमंत्री बनले. हा दगा फटका भाजपच्या राज्यातील नेतृत्वाला पचनी पडणे शक्यच नव्हते तसेच तो केंद्रीय नेतृत्वालादेखील पचनी पडलेला नव्हता. मुळात २०१९ साली विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता गेली होती. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार होते, त्यांनी जर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी अट्टाहास केला नसता, तर देवेंद्र फडणवीस त्याच वेळी मुख्यमंत्री झाले असते. त्यामुळे काहीही करून राज्यात नव्याने स्थापन झालेले ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार गेले पाहिजे, त्यासाठी केंद्र आणि राज्यातून प्रयत्नांची पराकाष्टा सुरू झाली. त्यात केंद्रीय तपास संस्था ईडीची भूमिका फारच परिणामकारक ठरली.

- Advertisement -

मुख्यमंत्री म्हणून अथवा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना मिळालेले ५६ शिवसेनेच्या आमदारांचे पाठबळ हेच त्यांना खरे तर मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेले होते. त्यामुळे भाजपने तसेच भाजपचे महाराष्ट्रातील चाणक्य देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री बनण्या मागचे हे यशाचे गमक नेमके हेरले. तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील कोल्ड वॉर हे देवेंद्र फडणवीस यांच्या पथ्यावर पडले आणि मग फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातूनच राज्यातील ठाकरे सरकारला सुरुंग लावला. तथापि हे करत असताना फडणवीसांच्या या सुरुंगाचे स्फोट एवढे भीषण होते की त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे केवळ मुख्यमंत्री पदच गेले नाही तर शिवसेना पक्षप्रमुख या त्यांच्या पदावरही भले मोठे प्रश्नचिन्ह उभे करण्यात फडणवीस यशस्वी ठरले.

२०१९ ते २०२२ पर्यंत अडीच वर्षे उद्धव ठाकरे यांनी या आनंदात महाराष्ट्राची सत्ता उपभोगली त्याच्या दुप्पट तिप्पट आनंदात आज देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपद उपभोगत आहेत. अर्थात, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार घालवताना जी किंमत देवेंद्र फडणवीस यांना मोजावी लागली आहे ती देखील राजकारणातली एक फार मोठी रिस्क आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या चाणाक्ष नीतीमुळे मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना अवमानास्पदरित्या पायउतार व्हावे लाागले आहे. तथापि हे शिवधनुष्य पेलताना फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या रूपाने बंडखोर शिवसेना नेता मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावा लागला. आजच्या घडीचे राजकीय चित्र जर लक्षात घेतले तर उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, राहुल गांधी यांना महाराष्ट्रातील सत्तेपासून दूर केल्याचे समाधान देवेंद्र फडणवीस यांना निश्चितच असेल.

मात्र त्याचबरोबर महाराष्ट्रासारख्या संपन्न राज्याचे मुख्यमंत्रीपद मुकल्याची खंत उराशी बाळगत देवेंद्र फडणवीस यांना पुढचा काही काळ तरी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर व्यतीत करायचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जसे शिवसेनेसाठी राजकीय कोंडी ठरले आहेत तसेच ते अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासाठीही मोठी राजकीय कोंडी ठरले आहेत. त्यामुळे नजीकच्या भविष्यकाळात देवेंद्र फडणवीस हे कोंडी कशी फोडतात यावरच त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. अर्थात त्याचबरोबर आता भाजपामध्येदेखील प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आव्हाने उभी करण्याचे मनसुबे दिल्लीतील केंद्रीय भाजपा नेतृत्वाकडून आखण्यास सुरुवात झाली आहे. नागपूरकर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड हा त्याच रणनीतीचा एक भाग आहे असे म्हटल्यास कोणाला नवल वाटू नये. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरील राजकीय कोंडीत आता एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दुसरी मोठी कोंडी ठरले आहेत. याचाही आता देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांना विचार करावा लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -