घरपालघररेल्वेखाली ढकलून पत्नीची हत्या करणारा अटकेत

रेल्वेखाली ढकलून पत्नीची हत्या करणारा अटकेत

Subscribe

मेहंदी हसन मुंसरिम अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. तर नूरनिसा असे मृत पत्नीचे नाव असून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची कबुली मेहंदी अन्सारीने दिली आहे.

वसई : वसई रेल्वे स्थानकात झोपलेल्या पत्नीला जागे करून भरधाव वेगात येत असलेल्या एक्सप्रेस गाडीखाली ढकलून तिची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला मुंबई रेल्वे पोलिसांनी भिवंडी येथील त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. मेहंदी हसन मुंसरिम अन्सारी असे आरोपीचे नाव आहे. तर नूरनिसा असे मृत पत्नीचे नाव असून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याची कबुली मेहंदी अन्सारीने दिली आहे.
वसई रोड रेल्वे स्टेशन फलाट क्र. ५ वर सोमवारी पहाटे ०४. १० वाजता मेंहदी त्याची पत्नी नूरनिसा दोन मुलांसह झोपले होते. नूरनिसाच्या चारित्र्यावर मेहंदी नेहमी संशय घ्यायचा. त्यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. त्यामुळे मेहंदी संतापलेला होता. त्यातून सोमवारी पहाटे मेहंदीने झोपेत असलेल्या नूरनिसाला अचानक जागे केले आणि तिला काही कळायच्या आतच भरधाव वेगात येत असलेल्या अवघ एक्सप्रेसगाडीखाली ढकलून दिले. त्यातच तिचा जागी मृत्यू झाला. त्यानंतर मेहंदी दोन्ही मुलांना घेऊन घटना स्थळावरून गायब झाला होता. याप्रकरणी वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
लोहमार्ग पश्चिम परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी सहा पथके तयार केली. त्याचबरोबर शेकडो सीसीटीव्हीचे चित्रीकरणही तपासले. मृत महिलेच्या अंगावरील कपडे, दागिने, चेहरापट्टी याची पाहणी करून याचा शोध घेतला जात होता. त्यावेळी हे जोडपे उत्तर भारतातील असल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेज, रिक्षा स्टॅन्ड असोसिएशन तसेच भिवंडी येथील गुप्त खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मेहंदीचे नाव समोर आले. मेंहदी अन्सारी पेन्टर काम करीत असून तो भिवंडी टेमघर येथे राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सापळा रचून मेहंदीला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. चारित्र्याचा संशय आणि घरगुती वादातून हत्या केल्याची कबुली मेहंदीने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -