घरताज्या घडामोडीमुंबईत २,२०३ गायीचे लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण

मुंबईत २,२०३ गायीचे लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण

Subscribe

मुंबईतील गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने 'लम्पी' विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील २,२०३ गायींना लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लस दिली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय, तर २४,३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत.

मुंबई : मुंबईतील गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने ‘लम्पी’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईतील २,२०३ गायींना लम्पी विषाणू प्रतिबंधात्मक लस दिली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय, तर २४,३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. उर्वरित गोजातीय जनावरांचे लसीकरण पुढील आठवड्यात होईल, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख तथा देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे. (2203 cow lumpy virus preventive vaccination in Mumbai)

मुंबई महापालिका आयुक्त डॉ.इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या सुचनांनुसार लम्पी’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

- Advertisement -

सन २०१९ च्या पशुगणनेनुसार मुंबईत ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. निर्धारित प्राधान्यक्रमानुसार यापैकी गोजातीय जनावरांचे लम्पी प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येत आहे. यानुसार आतापर्यंत २ हजार २०३ गोजातीय जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांचे सर्वेक्षण यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे, असा दावा पालिकेने केला आहे. त्याचबरोबर महापालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, असा दावाही डॉ. कलीमपाशा पठाण यांनी केला आहे.

- Advertisement -

ज्यांच्या गोजातीय जनावरांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याकडे ०२२-२५५६-३२८४ आणि ०२२-२५५६-३२८५ या क्रमांकावर संपर्क साधून लसीकरणाबाबत विनंती नोंदवावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

लम्पी विषाणूबाबत पालिकेच्या उपाययोजना

  • महापालिकेच्या आरोग्य खात्याने १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार, पशुवैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा समावेश असलेला चमू गठीत केला आहे. या चमुद्वारे मुंबईतील तबेले व गोशाळा यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. तसेच महापालिकेच्या कीटकनाशक विभागास गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात धुम्रफवारणी आणि कीटक नियंत्रण करण्याबाबत उपाययोजना करण्यास सांगण्यात आलेले आहे.
  • सन २०१९ च्या पशुगणनेनुसार महापालिका क्षेत्रात ३,२२६ गोजातीय जनावरे व २४,३८८ म्हैसवर्गीय जनावरे असून, प्राधान्याने ३,२२६ गोजातीय जनावरांचे लसीकरण या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
  • तबेले / गोशाळा मालक – चालक यांनी, प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४ (१) अनुसार पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित संबंधित पालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्यास कळविणे बंधनकारक केले आहे.
  • गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जीवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींची कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवा-यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्यांचे शव, कातडी किंवा अन्य कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांचे उत्पादन किंवा असे प्राणी, नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीस मनाई करण्यात आली आहे.
  • बाह्य कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी. निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे. गायी व म्हशींना एकत्रित ठेवण्यात येवू नये. बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.
  • गोठ्यात त्रयस्थांच्या भेटी टाळाव्यात. बाधित परिसरात स्वच्छता ठेवावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी. फवारणीसाठी १ टक्के फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराईट, फिनॉल २ टक्के यांचा वापर करावा.

हेही वाचा – रक्षाबंधनसारख्या पवित्र नात्याचे कुणीही राजकारण करू नये; भावना गवळींचा उद्धव ठाकरेंना टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -