घरपालघरशिक्षणाच्या बाजारातील दलाल लाचलुचपतच्या जाळ्यात

शिक्षणाच्या बाजारातील दलाल लाचलुचपतच्या जाळ्यात

Subscribe

याप्रकरणात पथकाने तीन लाख पंधरा हजार रोख रक्कम आणि विद्यार्थ्यांची यादी जप्त केली आहे.

भाईंदर : मीरारोड येथील बंद झालेल्या कॉलेजमधून दुसर्‍या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर संस्था आणि अभ्यासक्रम बदलासाठी लाच मागितल्याप्रकरणी ठाण्याच्या अँटीकरप्शनच्या पथकाने तांत्रिक व सह संचालक कार्यालयातील सहाय्यक संचालकासह भाईंदर येथील के. एल. तिवारी आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्या, कॉलेजचा अधिक्षक, वरिष्ठ लिपिकाला अटक केली आहे. या टोळक्याने चौदा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीस हजार रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणात पथकाने तीन लाख पंधरा हजार रोख रक्कम आणि विद्यार्थ्यांची यादी जप्त केली आहे. मीरारोड येथील अस्मिता कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ही शैक्षणिक संस्था बंद झाली आहे. त्यामुळे तेथील चौदा विद्यार्थ्यांनी भाईंदरमधील के. एल. तिवारी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. संस्था आणि अभ्यासक्रम बदलासाठी सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय वांद्रे येथील सहाय्यक संचालक जितेंद्र रामदासजी निखाडे (५४) यांच्यामार्फत के. एल. तिवारी आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्या रुपाली हितेंद्र गुप्ते (५०) यांनी तीस हजार रुपयांची लाच मागितली होती.

याप्रकरणी तक्रार आल्यानंतर ठाणे अँटीकरप्शनच्या पथकाने तपास सुरु केला होता. तपासात के. एल. तिवारी आर्किटेक्चर कॉलेजच्या प्राचार्या रुपाली हितेंद्र गुप्ते यांनी लाचेची रक्कम कॉलेजचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रंगराव हुबाले यांच्याकडे देण्याचे सांगितले. तक्रारदाराने पंधरा हजार रुपयांसह हुबाले यांच्याशी २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी त्यानुसार संपर्क साधला. तेव्हा हुबाळे यांनी सदरची रक्कम त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रेया संतोष बने यांच्याकडे देण्यास सांगितली. त्यानंतर पंधरा हजार रुपये घेताना दबा धरून बसलेल्या अँटीकरप्शनच्या पथकाने श्रेया बने यांना ताब्यात घेतले.याप्रकरणी कॉलेजच्या प्राचार्या रुपाली गुप्ते, कार्यालयीन अधिक्षक संतोष हुबाले आणि वरिष्ठ लिपीक श्रेया बने यांना कॉलेजमधूनच अटक करण्यात आली. तर सहाय्यक संचालक जितेंद्र निखाडे यांना वांद्रे येथील कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, मीरा भाईंदरमधील शिक्षण सम्राट लल्लन तिवारी यांच्याच कॉलेजमध्ये मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपशी संबंधित असलेल्या तिवारी यांच्या राहुल एज्युकेशन ग्रुपच्या मुंबई, ठाणे, नालासोपारा, पालघरसह उत्तर प्रदेशातील चांदोली येथे शाळा आणि सर्व प्रकारची कॉलेजेस आहेत.

- Advertisement -

 

लिपिकाच्या अटकेनंतर फटाक्यांची माळ लागली

- Advertisement -

श्रेया बने यांच्या अटकेनंतर मोठी साखळीच पोलिसांच्या हाती लागली. त्यात वांद्रे येथील सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयातील सहाय्यक संचालक जितेंद्र निखाडे यांचा मुख्य सहभाग असल्याचे उजेडात आले. कारवाईत चौदा विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी तीस हजार रुपयांप्रमाणे चार लाख वीस हजार रुपये मागितल्याची माहिती आरोपींनी दिली. दहा विद्यार्थांनी तीस हजार रुपयांनुसार तीन लाख रुपये आणि एका विद्यार्थ्याने पंधरा हजार रुपये मिळून आरोपींनी घेतलेली तीन लाख पंधरा हजार रुपयांची रक्कम अँटीकरप्शनच्या पथकाने जप्त केली आहे. तसेच पथकाच्या हाती विद्यार्थ्यांच्या नावाची यादीही पथकाने जप्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -