घरताज्या घडामोडीमुंबईत पावसाची दमदार हजेरी, पश्चिम उपनगरात २५.२६ मिमी पावसाची नोंद

मुंबईत पावसाची दमदार हजेरी, पश्चिम उपनगरात २५.२६ मिमी पावसाची नोंद

Subscribe

मुंबईत गेली चार महिने बरसणाऱ्या पावसाचा परतीचा प्रवास लांबला आहे. त्यामुळेच शुक्रवारी ढगांच्या गडगडाटासह दिवसभर पावसाची संततधार मुंबईकरांनी अनुभवली. चाकरमान्यांना घरातून बाहेर पडताना सोबत छत्री न्यायला या पावसाने भाग पाडले. मध्यंतरी पावसाने जरा उसंत घेतली होती. त्यामुळे मात्र मुंबईकरांना काहीसा उकाडा सहन करावा लागला. मात्र शुक्रवारी दिवसभर पाऊस बरसल्याने वातावरणात गारवा पसरला होता.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलमापक यंत्रावर सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात ३७.५१ मिमी, पूर्व उपनगरात – ३६.३८ मिमी तर पश्चिम उपनगरात – २५.२६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक जास्त पाऊस ‘ डी’ प्रभागात ७६.४७ मिमी, त्या पाठोपाठ सीएसएमटी विभागात ७५.४५ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर कांदिवली, बोरिवली, मालाड आदी काही भागात सर्वात कमी पावसाची नोंद झाली.

- Advertisement -

हवामान खात्याने आगामी २४ तासात शहर व उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहील व गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवली आहे. मुंबईत सकाळपासून चाकरमान्यांची कामावर जायची गडबड सुरू असताना परतीला निघालेल्या पावसाने एकच बरसात सुरू केली. त्यामुळे मुंबईकरांना घराबाहेर पडून कामावर जाताना हातात छत्री घेऊनच निघावे लागले. पावसाने दुपारी १२.३० ते २.०० या कालावधीत पूर्व उपनगरात काहीसा जोर कमी केला होता. मात्र नंतर काही अवधीतच पुन्हा एकदा पावसाची संततधार सुरू झाली. त्यामुळे संध्याकाळी शाळेतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता काहीशी वाढली होती.

सायंकाळी ६.४५ नंतरही पावसाची संततधार सुरूच होती. तर दुसरीकडे सीएसएमटी व चर्चगेट आणि दादर रेल्वे स्थानक परिसरात भर पावसात प्रवाशांची घरी जाण्याची धावपळ झाली. मुंबईत व परिसरात जून महिन्यात कमी पाऊस पडला होता. मात्र नंतर जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी, विहार, तानसा, मोडक सागर हे चार तलाव भरून वाहू लागले होते. तर भातसा तलावही १०० टक्के भरला होता.

- Advertisement -

मात्र अप्पर वैतरणा तलाव हा ९९ टक्के भरला तरी १०० टक्के पातळी गाठण्यात थोडक्यात हुकला. तसेच, मध्य वैतरणा धरणही जवळजवळ ९७ – ९८ टक्के भरले होते. त्यामुळे असे पाहता आजच्या तारखेला मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत या मुसळधार पावसामुळे पुढील वर्षभर पुरेल इतका म्हणजे १४ लाख १० हजार ६२६ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झालेला आहे. ही मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बाब आहे.

दिवसभरात पडझडीच्या घटना ; जखमी नाही

दरम्यान, मुंबईत पावसाची संततधार सुरू असताना शहर भागात शॉर्ट सर्किटच्या ४ घटना घडल्या. तर एका ठिकाणी झाड/ फांदी कोसळण्याची घटना घडली. तसेच, एका ठिकाणी घराचा भाग पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाले नाही.

मुंबईत शहर भागात जास्त पाऊस

मुंबईत सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात सर्वाधिक म्हणजे ३९.०१ मिमी इतका पाऊस पडला. त्या खालोखाल पूर्व उपनगरात – ३६.३८ मिमी इतका आणि सर्वात कमी म्हणजे पश्चिम उपनगरात – २५.२६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.

शहर भाग –
‘डी’ वार्ड -७६.४७ मिमी, सीएसएमटी विभागात ७५.४५ मिमी, ग्रँट रोड – ६८.८२ मिमी, मलबार हिल – ६५.७८ मिमी,नरिमन पॉईंट – ६०.९७ मिमी, कुलाबा – ४२.६८ मिमी.

पूर्व उपनगर –

विक्रोळी – ६२.४९ मिमी, भांडुप – ४९.७९ मिमी, घाटकोपर – ४९.२५ मिमी, मुलुंड – ४८.४९ मिमी, कुर्ला – ३०.७४ मिमी.

पश्चिम उपनगर –

वर्सोवा – ६०.२१ मिमी, मरोळ – ५६.३८ मिमी, जोगेश्वरी – ३९.८८ मिमी, अंधेरी (पूर्व) – ४६.९९ मिमी, कांदिवली – ०७.८६ मिमी.


हेही वाचा : ठाण्यात मुसळधार पाऊस, नागरिकांची उडाली तारांबळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -