घरमुंबईमुंबई आणि ठाण्यात कुष्ठरोग वाढतोय, 30 रुग्णांमुळे धोक्याची घंटा

मुंबई आणि ठाण्यात कुष्ठरोग वाढतोय, 30 रुग्णांमुळे धोक्याची घंटा

Subscribe

मुंबई महापालिकेने (BMC) कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी राबविलेल्या विशेष मोहिमेत मुंबईमध्ये गेल्या 15 दिवसांत 88 संशयितांपैकी 12 बालकांमध्ये कुष्ठरोगाची लक्षण आढळली. तर ठाणे महापालिकेच्या वतीने राबवलेल्या आरोग्य शिबिरातही 15 जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कुष्ठरोगबाधित रुग्णांची ही संख्या आता मुंबई, ठाण्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, कुष्ठरुग्णांची गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. यावर बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे संचालक डॉ. व्ही. व्ही. पै यांनी सांगितले की, मुलांमधील आढळलेल्या सर्व कुष्ठरोगाचे विश्लेषण करणे महत्त्वाचे आहे. मुलांमध्ये कुष्ठरोग आढळणे, हे संक्रमण अद्याप सक्रिय असल्याचे दर्शविते. कुष्ठरोगाशी संबंधित विशेष मोहीम संपल्यानंतर आढळलेल्या रुग्णामधील कुष्ठरोगाची लेव्हल काय आहे? किती रुग्णांमध्ये या रोगाचा सर्वाधिक प्रभाव दिसतो? आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या कुष्ठरोगाची लागण झाली हे समजून घेण्यासाठी प्रत्येक संशयित रुग्णाचे विश्लेषण केले जाईल, डॉ. पै म्हणाले.

- Advertisement -

मल्टीड्र्ग थेरपीने हा आजार बरा होऊ शकतो. मात्र वेळीच उपचार न केल्यास हा आजार त्वचा, नसा, हातपाय आणि डोळे यापर्यंत मोठ्याप्रमाणात पसरण्याचा धोका असतो. WHOच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीमुळे 2019च्या तुलनेत 2020मध्ये कुष्ठरोगाच्या नव्या केसेस आढळण्याचे प्रमाण 37 टक्क्यांनी कमी झाले आहे.

सध्या मुंबई शहरात आढळलेल्या कुष्ठरुग्णांपैकी 57 टक्के (282 पैकी 160 प्रकरणे) प्रकरणं ही अकरा विविध वॉर्डमधील आहेत. या वॉर्डसमध्ये ई (भायखळा), एफ/एन (माटुंगा पूर्व), एफ/एस (परळ, लालबाग), जी/एन (दादर पश्चिम), जी/एस (प्रभादेवी), एच/ई (सांताक्रूझ पूर्व), एच/ प (वांद्रे पश्चिम), के/ई (अंधेरी पूर्व) आणि के/डब्यू वॉर्ड (अंधेरी पश्चिम) याचा समावेश आहे.

- Advertisement -

पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा मल्टीबॅसिलरी कुष्ठरोगाचे प्रमाण वाढले आहे. यामागे कोरोना महामारी हे कारण सांगितले जात आहे. कारण गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे कुष्ठरुग्णांसाठी राबवण्यात येणारी मोहीम थंडावली, त्यामुळे कुष्ठरुग्णांचा शोध घेणे आरोग्य यंत्रणेस शक्य झाले नाही. त्यामुळे या आजारातही आता अनेक बदल दिसून येत आहे.

मुंबई आढळलेल्या 88 संशयितांपैकी 8 टक्के रुग्णांना ग्रेड 2 कुष्ठरोगाची लागण झाल्याचे दिसत आहे. या रुग्णांमध्ये दृष्टीदोष आढळून आला आहे. त्यामुळे पालिकेकडून सुरुवातीच्या टप्प्यातील प्रकरणांचा शोध घेतला जात आहे, जेणेकरून हा आजार इतरांपर्यंत पोहचू नये.

कोरोना महामारीच्या काळात सर्व आरोग्य सेवा या कोव्हिड-19 व्यवस्थापनाकडे वळवण्यात आल्या होता. यामुळे कुष्ठरोगाच्या नव्या केसेस शोधण्यास विलंब झाला. तसेच कुष्ठरोगबाधितांना सेवा आणि वेळीच उपचार देण्यासही अडचणी आल्या. यामुळे मुंबईत कुष्ठरोगांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत आता पालिकेच्यावतीने सर्व विभागातील संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यास सुरुवात केली, अशी माहिती डॉ. पै यांनी दिली आहे. मुंबईत राबविलेल्या विशेष मोहिमेत सुमारे 10402 संशयित कुष्ठरुग्ण आढळून आल्याचे पालिकेने सांगितले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात 15 रुग्ण

ठाणे महापालिका क्षेत्रातही 13 ते 17 सप्टेंबर आणि 26 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीतील कुष्ठरुग्ण तपासणी विशेष सर्वेक्षण मोहिमेदरम्यान 15 जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणादरम्यान प्रथमदर्शनी 3 हजार 389 संशयित रुग्ण असल्याचे निदर्शनास आले, त्यापैकी 3 हजार 117 रुग्णांची तपासणी केली, ज्यात 15 जणांना कुष्ठरोगाची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेश शर्मा यांनी दिली. त्यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी आरोग्य विभागाला संपूर्ण नियोजन करून आवश्यक औषधोपचार तातडीने करावेत, यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही याबाबत विशेष दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

पालघरमध्येही रुग्ण आढळले

पालघर जिल्ह्यातही कुष्ठरुग्ण तपासणी विशेष मोहिमेत 697 संशयित कुष्ठरुग्ण आढळले. त्यांची तपासणीअंती ग्रामीण भागात 30; तर शहरी भागात दोन असे 32 कुष्ठरुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई, ठाण्यासह पालघरमध्येही कुष्ठरोग बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला आता कोरोनानंतर कुष्ठरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.


काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान दुर्घटना; कर्नाटकात 4 कार्यकर्त्यांना बसला विजेचा शॉक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -