घरसंपादकीयअग्रलेखकुंकवाचा अनाठायी अतिरेक!

कुंकवाचा अनाठायी अतिरेक!

Subscribe

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे नेते मनोहर उर्फ संभाजी भिडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संभाजी भिडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. यावेळी खासगी वाहिनीच्या महिला पत्रकाराने भिडे यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबवले असता भिडेंनी नेहमीप्रमाणे वादग्रस्त वक्तव्य करत उत्तर देणे टाळले. ‘आमची अशी भावना आहे की प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही. कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो’, असे वक्तव्य करुन भिडे गुरुजींनी पुन्हा नवा वाद निर्माण केला आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने संभाजी भिडे यांना आपल्या भूमिकेचा तात्काळ खुलासा करण्यास सांगितले आहे. स्त्रीचा दर्जा तिच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहोचवणारे आहे, असे आयोगाने म्हटले आहे.

खरे तर भिडेंचे हे वक्तव्य मनुवादी मनोवृत्तीचा परिपाक म्हणावा लागेल. मनू हा जगातील पहिला कायदे पंडित, बाबासाहेबांनी मनुस्मृतीचा अभ्यास करुन संविधान लिहिले, बाबासाहेबांनी मनुचे कौतुक केले, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची भेट, मनुचा पुतळा राजस्थान विधान भवनाबाहेर आहे अशा स्वरुपाची संदर्भहीन वायफळ वक्तव्ये त्यांनी एका वृत्त वाहिनीवर केली होती. त्यावरुनच त्यांच्यातील मनुवादी वृत्ती स्पष्ट होते. सतत काही तरी वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचे प्रयत्न भिडे करीत आले आहेत. महिलांनी कुंकू किंवा टिकली लावावी की लावू नये हे सांगण्याचा अधिकार भिडेंना कुणी दिला? खरे तर कुंकू लावून ये मग प्रतिक्रिया देतो, असे विधान करुन भिडेंनी महिलांच्या आत्मसन्मानालाच तडा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून त्यांची कुंंकूवा इतकी संकुचित वृत्तीच अधोरेखित होते. केवळ कुंकू लावल्याने कर्तृत्व सिद्ध झाले असते तर कुंकू न लावणार्‍या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, इंदिरा गांधी, किरण बेदी, मेरी कोम, साक्षी मलीक यांना आपले कर्तृत्वच सिद्ध करता आले नसते.

- Advertisement -

लोकहितवादींनी आपल्या ‘शतपत्रात’ लिहिले आहे की, ‘ज्या देशात स्त्रियांचे अधिकार लोक मानत नाहीत, त्या देशात लोकांची स्थिती वाईट असते.’ देशातील स्त्रियांना प्रथा, परंपरांमध्ये जखडून ठेऊ पाहणार्‍या भिडेंसारख्या बुरसटलेल्या मनोवृत्तीच्या माणसांमुळे देशाच्या प्रगतीलाही बाधा पोहचत आहे. ‘भारत माता विधवा नाही’ असे सांगून भिडेंनी तमाम विधवा महिलांचाही अपमान केला आहे. एखादी बाई विधवा होते, त्यात तिचा दोष काय? ती त्यासाठी जबाबदारही नसते किंवा विधवापण टाळणे तिच्या हाती नसते. तरीही तिने बांगड्या घालू नये, मंगळसूत्र घालू नये, कुंकू लावू नये, रंगीत साडी परिधान करु नये अशी बंधने लादली जातात. खरे तर अशा कुप्रथा स्त्रियांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहचवणार्‍या असतात. त्यातून स्त्रीला एकटी पाडण्याचा अंतस्थ हेतू लपून राहत नाही. त्यामुळेच विधवांशी संबंधित कुप्रथांचा कायमस्वरुपी बिमोड करण्यासाठी सामाजिक चळवळींनी काही काळापासून जोर धरला आहे. त्यात थोर समाजसुधारकांची मोलाची कामगिरी आहे.

वेळोवेळी संत, महात्मे, शाहीर, लोककलावंत, साहित्यिक, समाजसुधारकांनी अनिष्ट प्रथा नष्ट होण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. तरी काही प्रथा या सुरुच आहेत. त्यातील विधवा प्रथा बंद होण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. अनेक समाजधुरिणांनी महिलांवरील अन्यायाच्या विरुद्ध अनेकदा क्रांतिकारी लिखाण आणि विचार मांडून समाजासमोर त्यांना विरोध करुन त्या बंद पाडल्या आहेत. देश विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही एकविसाव्या शतकात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात महिलांना त्यांच्या पतीच्या निधनानंतर अजूनही अनिष्ट प्रथा, चालीरितींना सामोरे जावे लागत आहे.

- Advertisement -

विधवा प्रथा बंद करण्यासंदर्भात हेरवाड ग्रामपंचायतीने ५ मे २०२२ ला ठराव केला. हा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने घेण्याच्या दृष्टीने शासनानेही परिपत्रक जारी करुन विधवा प्रथा बंद करण्याचे आवाहन केले. एकूणच विधवा प्रथांचा बिमोड करण्यासाठी शासन आणि सामाजिक स्तरावर मोठे प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वीही भिडेंनी महिलांसदंर्भात वादग्रस्त व्यक्तव्य केली होती. २०१९ मध्ये सांगलीत बोलताना भिडे म्हणाले होते की, ‘जसं नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होतं, तसंच वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असतं. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसंच हिंदूंचं झालं आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी झाले आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ आहे.’

नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत बोलताना भिडे म्हणाले होते की, ‘माझ्या शेतातील आंब्याच्या झाडाचा आंबा खाल्ला तर जोडप्यांना पूत्रप्राप्ती होते.’ भिडेंचा हा दावा म्हणजे गर्भनिदान कायद्याचे सरळसरळ उल्लंघन होते. त्यामुळेच त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल झाला. परंतु तरीही भिडेंचा तोंडपट्टा काही थांबताना दिसत नाही. आश्चर्य म्हणजे भिडेंना बरेच लोक परमपूज्य, पूजनीय, राष्ट्रभक्त अशा उपाध्या देतात. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे भिडेंची जीभ घसरल्यानंतर काही नेटकरी त्यांचे वेगवेगळ्या अंगाने समर्थनही करताना दिसतात हे विशेष. भाजपची अनेक नेतेमंडळी भिडेंवर टीका करायला कचरतात. अनेक वेळा तर हिंदुत्वाचा धागा पकडत ते भिडेंचे समर्थनही करतात. अशा बिनबुडाच्या राजकीय वृत्तीमुळेच भिडेंसारख्या माणसांचे फावते. भिडे हे वयोमानामुळे भ्रमिष्टासारखे बरळतही असतील. परंतु त्यामुळे भाजप नेत्यांच्या कुटुंबियांचे संदर्भहिन फोटो आणि मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणे हेदेखील चुकीचेच आहे.

किंबहुना अशी कृती करणे म्हणजे भिडेंच्या वाचाळ वक्तव्याचे समर्थनच करणे म्हणावे. काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीसांबरोबर अमृता फडणवीस यांचे टिकली नसलेले फोटो पोस्ट करुन आधी यांना टिकली लावायला सांगा, असा सल्ला दिला जात आहे. असे सल्ले देऊन केवळ अमृता फडणवीस यांचाच नव्हे तर आपल्या कर्तृत्वाने पुढे जाऊ पाहणार्‍या प्रत्येक महिलेचा अपमान केला जात आहे, हे आपल्याला कधी समजणार? आपणही भिडेंच्या चालीने चालायला लागतो, तर त्यांच्या आणि आपल्या मनोवृत्तीत काय फरक राहणार? मुळात कोणताही कट्टरतावाद हा समाजासाठी घातकच असतो. भिडेंनी जो कट्टरतावाद अवलंबला आहे, त्यातून देशाचे भले होईल याची सुताराम शक्यता नाही. जी वाताहत त्यांच्या ब्रिगेडची झाली तशीच केविलवाणी अवस्था भिडेंचीही झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -