घरमहाराष्ट्रसावरकरांवरील टीकेवरून फडणवीसांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर, वृत्तपत्रांची जुनी कात्रणे केली ट्वीट

सावरकरांवरील टीकेवरून फडणवीसांचे राहुल गांधींना प्रत्युत्तर, वृत्तपत्रांची जुनी कात्रणे केली ट्वीट

Subscribe

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका सभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात एक पत्र वाचून दाखवित ते माफीवीर असल्याचा आरोप केला होता. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी इंदिरा गांधी यांचे पत्र, वृत्तपत्रांची जुनी कात्रणे ट्वीट करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी जे वाक्य वाचून दाखवले, त्याच वाक्यरचनेचे महात्मा गांधी यांचे पत्र ट्विट करीत फडणवीस यांनी राहुल गांधींना प्रश्न विचारले आहेत.

वीर सावरकर यांच्या पत्रातील ‘आय बेग टू रिमेन युवर रॉयल हायनेस ओबिडियन्ट सर्व्हंट’ या वाक्यावरून राहुल गांधी यांनी टीका केली होती. तेच वाक्य असलेले महात्मा गांधी यांचे पत्र आज फडणवीस यांनी ट्वीट केले. सोबतच राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी सावरकरांबाबत लिहिलेले पत्र, ज्यात सावरकरांना स्वातंत्र्य आंदोलनातील एक भक्कम आधारस्तंभ आणि भारताचे एक संस्मरणीय पुत्र म्हणून उल्लेख केला आहे, तेही पत्र फडणवीस यांनी ट्वीट केले.

- Advertisement -

माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचे वीर सावरकरांबाबत भाषण आणि त्यांच्याविषयी लिहिलेले पत्र, ज्यात दोन जन्मठेपेंचा उल्लेख आहे, तेही पत्र देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. वीर सावरकर यांची सामाजिक सुधारणांसाठी असलेली प्रतिबद्धता, युवा पिढीला प्रेरणा आदींबाबत माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दिलेला संदेश सुद्धा फडणवीस यांनी ट्वीट केला आहे.

- Advertisement -

फडणवीस यांनी काही वृत्तपत्रांची जुनी कात्रणे सुद्धा ट्वीट केली असून, ज्यात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना प्रखर देशभक्त, असीम त्यागाचे प्रतीक आणि प्रत्येकाच्या हृदयात सन्मानाशिवाय दुसरी कोणती भावनाच असू शकत नाही, असे संबोधले आहे. एवढेच नाही तर, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सावरकरांनी घेतलेला पुढाकार आणि त्यांच्या विचारांवरच चालण्याची आवश्यकता याचीही गरज देसाई यांनी व्यक्त केली आहे.

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, इंडियन नॅशनल चर्चचे फादर विल्यम्स, इंदिरा गांधी, तत्कालिन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सावरकरांबद्दल व्यक्त केलेल्या भावनांच्या संदर्भातील ही वृत्तपत्रांची कात्रणे आहेत. राहुल गांधी हे वारंवार अशी विधाने करून आपली व्होट बँक वाचवित असतील. पण, असेच सिलेक्टिव्ह वाचत राहिले, तर येणार्‍या अनेक पिढ्या त्यांना म्हणतील, ‘अरे भाई कहना क्या चाहते हो’, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -