घरमुंबईबेस्ट कर्मचार्‍यांचा बोनस राम भरोसे

बेस्ट कर्मचार्‍यांचा बोनस राम भरोसे

Subscribe

कर्मचारी संघटनांकडून संपाच्या इशारा

दिवाळीनंतर देव दिवाळी संपली तरीही बेस्ट कर्मचार्‍यांच्या बोनसचा निर्णय झाला नाही. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत संपाचा इशारा दिला आहे.

बेस्ट कर्मचार्‍यांनाही बोनस देऊन त्यांनाही आनंदाने दिवाळी साजरी करता यावी, यासाठी बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी पालिका आयुक्तांकडे बोनससाठी कर्ज मागितले होते. मात्र दिवाळी त्यानंतर देव दिवाळी संपली तरी अद्याप बेस्ट कर्मचार्‍यांच्या बोनसबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

- Advertisement -

सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेत बोनस प्रस्तावाला मंजुरी दिली. आता हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या सभेत ठेवला जाणार आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस मिळणार किंवा नाही याबाबत अद्याप अखेरचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनावर दिरंगाईचा आरोप करत बेस्ट कामगार संघटनेने संपावर जाण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी संघटनेकडून नियोजन केले जात असल्याची माहिती आहे.

बेस्टच्या एकूण ४० हजार कर्मचार्‍यांना यंदाच्या दिवाळीत बोनस न देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला होता. बेस्ट समिती सदस्यांच्या मागणीनंतर महाव्यवस्थापकांनी कर्मचार्‍यांना साडेपाच हजार रुपये बोनस देण्याचे जाहीर केले होते. यासाठी बेस्ट प्रशासनाने मुंबई महानगर पालिकेकडे कर्जाच्या स्वरूपात रक्कम मागितली होती.

- Advertisement -

तसेच बेस्ट प्रशासनाकडून पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहारही करण्यात आला होता. मात्र दिवाळी संपली, त्यानंतर देव दिवाळी संपूनही अद्याप बेस्ट कर्मचार्‍यांना बोनस मिळालेला नाही. त्यामुळे महाव्यवस्थापक बोनस देण्यात अपयशी ठरले, असा आरोप कर्मचारी संघटनेकडून केला जात आहे.

सद्यस्थितीत बेस्टच्या एकूण ४० हजार कर्मचार्‍यांना दिवाळीचा बोनस देण्यासाठी आर्थिकदृष्ठ्या आधीच तोट्यात असणार्‍या बेस्टवर २२ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. कर्मचार्‍यांच्या बोनसबाबत बेस्टचे महाव्यवस्थापक आणि महापालिका आयुक्त यांच्यात चर्चा झाली होती. त्यावेळी महाव्यवस्थापकांनी बेस्टच्या कर्मचार्‍यांना दिवाळीचा ५,५०० रुपयांचा बोनस देणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात बोनस अजून मिळालेला नाही.

…तर संप करणार
बेस्ट प्रशासन आणि समितीमधील सत्ताधार्‍यांवर कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या २० डिसेंबरला बेस्टच्या प्रत्येक डेपोमध्ये दिवाळी बोनस आणि इतर मागण्यांबाबत बेस्ट कामगार संघटनांकडून सभा घेतल्या जाणार आहेत. या सभेत बेस्ट कर्मचार्‍यांसोबत चर्चा करून बेस्ट कामगार संघटना पुढील निर्णय जाहीर करणार आहे. याबाबत वेळीच निर्णय न झाल्यास ७ जानेवारीपासून बेस्ट कामगार बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती बेस्ट कामगार संघटनांचे सरचिटणीस जगनारायण कहार यांनी आपलं महानगरला दिली.

मुंबई महानगर पालिका आणि बेस्ट समितीमध्ये शिवसेनाची सत्ता असूनही आज या बेस्ट कर्मचार्‍यांना वेळेत बोनस मिळालेला नाही. याला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहेत. कारण सत्ताधारी पक्षांचे म्हणणे महापालिका आयुक्त आणि बेस्टचे महाव्यस्थापक ऐकत नाहीत. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांच्या बोनसला विलंब झाला आहे.
-रवि राजा, बेस्ट समिती सदस्य, विरोधी पक्ष नेते-मुंबई महानगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -