घरठाणेमहेश आहेरांच्या निलंबनासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक, महिलांची ठामपा मुख्यालयावर धडक

महेश आहेरांच्या निलंबनासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक, महिलांची ठामपा मुख्यालयावर धडक

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची सुपारी देणारे ठाणे महापालिकेचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांना निलंबित करावे; त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, या मागणीसाठी सोमवारी ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिलांनी ठामपा मुख्यालयावर धडक दिली. शेकडो महिलांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा नेत, “ महेश आहेर यांस निलंबित करा; महेश आहेर चोर है; मुर्दाबाद मुर्दाबाद महेश आहेर मुर्दाबाद” अशा घोषणा यावेळी मोर्चेकर्‍यांनी दिल्या.

मागील आठवड्यात महेश आहेर यांची एक ऑडिओ क्लीप वायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये महेश आहेर हे डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी आपण शूटर तैनात केले असल्याचे सांगत आहेत. ही ऑडिओ क्लीप वायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या बाहेरच मारहाण केली. या प्रकरणी चार जण अटकेत आहेत. एकीकडे चोप देणार्‍या कार्यकर्त्यांना अटक केली जात असतानाच डॉ.आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची सुपारी देणार्‍यांवर गुन्हा दाखल केला जात नसल्याच्या निषेधार्थ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज मोर्चा काढला.

- Advertisement -

काँग्रेस कार्यालयापासून काँग्रेसच्या तर राष्ट्रवादी कार्यालयातून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करुन या मोर्चात सहभाग घेतला होता. या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या ठाणे-पालघर विभागीय अध्यक्षा ॠता आव्हाड म्हणाल्या की, महेश आहेर यांच्या विरोधात अनेक पुरावे आहेत. त्यांच्या केबीनमध्ये पैशांच्या राशी असतात. त्यांचा एक शिपाई पैसे मोजतानाचा व्हिडिओदेखील वायरल झाला आहे. तरीही कारवाई केली जात नाही. ठामपातील काही अधिकारी बिल्डरांकडून खंडणी वसूल करीत आहेत. महेश आहेर यांनी बीएसयुपीमध्ये मोठा घोटाळा केला आहे. रविवारी सुट्टी असतानाही महेश आहेर हे कार्यालयात आले होते. हे नक्कीच योग्य नाही. त्यांच्या मागे कोण आहे, हे आम्हांस माहित नाही. मुख्यमंत्र्यांनी आपण महेश आहेर यांना भेटायला गेलो नाही, असे जाहीर केले आहे. म्हणजेच मुख्यमंत्री आपण महेश आहेरच्या पाठीशी नाही, असा संदेश देत असतील तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? यावेळी जर महेश आहेर यांना माफ केले तर लोक तुम्हाला माफ करणार नाही. असे त्या म्हणाल्या.

यावेळी विक्रांत चव्हाण यांनी,अकरावी नापास माणसाची खोटी प्रमाणपत्रे बघून त्याला सहाय्यक आयुक्तपदी बसविले; तेव्हापासून ठामपात अनागोंदी सुरु झाली आहे. सहाय्यक आयुक्तपदी महेश आहेर नियुक्ती झाल्यापासूनच ठाण्यात अनधिकृत बांधकामे वाढीस लागली आहेत. आम्ही,डॉ.आव्हाड आणि संजय केळकर यांनी अनधिकृत बांधकामांविरोधात आवाज उठवत आहेत. त्यामुळेच महेश आहेर आम्हांस धमक्या देत आहे. अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आपण आवाज उठविल्यामुळेच महेश आहेर याने आपणाला सुभाषसिंह ठाकूर याच्याकडून धमकी दिली होती. या संदर्भात खंडणीविरोधी पथकाकडेही तक्रार दिली होती. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. मात्र, आज आमदाराच्या मुलीला जर धमक्या दिल्या जात असतील तर ते सहन होणार नाही. आता आमच्या घरातील महिला-मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्यामुळे आता महेश आहेर याच्यावर मोक्का दाखल केला पाहिजे, अशी मागणी केली.

- Advertisement -

या आंदोलनात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, माजी विरोधी प्रमिलाताई केणी,माजी नगरसेविका अपर्णाताई साळवी, मनिषा साळवी,काँग्रेसच्या रेखा मिरजकर,शकला शेख,मीनाक्षी थोरात,राष्ट्रवादीच्या वर्षा मोरे,अंकिता शिंदे, राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षा रचना वैद्य,काँग्रेसच्या भारती जाधव,सुप्रिया पाटील,रिना गजरा,पल्लवी घाग,राखी प्रविण खैरालाया, मीना कांबळे, स्वाती मोरे शिरिन शेख,माधुरी रांगळे,सगिता कोटल,शिनु नायर आदी महिला कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.


हेही वाचा : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरीला, बुलढाण्यात पोलिसांत तक्रार दाखल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -