घरफिचर्सआगीने वेढलेली मुंबई

आगीने वेढलेली मुंबई

Subscribe

कुठलेही वर्तमान पत्र उघडा, त्यात आगीची बातमी नाही असे होत नाही. टेलिव्हिजन लावा...आगीच्या घटना ऐकायला मिळतातच. कधी शॉर्टसर्कीटमुळे तर कधी गॅस सिलिंडरमुळे तर कधी अन्य कुठल्या तरी कारणांमुळे आगी पेट घेत असतात. यात अनेकांना जीव गमावावे लागतात. पण यासर्व आगींच्या दुर्घटनांना जबाबदार कोण हाच प्रश्न सर्वांना पडत असतो. मुंबई आणि परिसरातील शहरात ज्या काही आगी अलिगडच्या काळात लागल्या आहेत, त्यासर्व मानवनिर्मितच आहे. आपल्या निष्काळजीपणामुळेच त्या लागत असतात. आग लागल्यानंतर मग अग्निशमन दलाच्या नावाने खडे फोडायचे. आग विझवायला गाड्या उशिराने पोहोचल्या म्हणून राग व्यक्त करायचा. चूक आपली आणि मग आपला निष्काळजीपणा अग्निशमन दलाच्या माथी मारून मोकळे होतो. पण जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य विसरून जातो. आगीच्या घटनेच्या तळाशी जाताना यासर्वांचा सारासार विचार होताना दिसत नाही. आग लागली की आम्ही बोंबाबोंब करतो. त्यात माणसे मृत्यूमुखी पडली की अश्रु ढाळतो. आणि दुसर्‍या दिवशी काही घडलेच नाही या अविर्भावात पुन्हा कामाला लागतो. पण ज्यामुळे आग लागली त्या कारणांचा शोध घेवून भविष्यात अशी चूक होणार नाही, झालेली चूक सुधारु,अशी खूणगाठ कुणीच बांधत नाही. आगीसारख्या दुर्घटनांबाबत आम्ही गंभीर नाही आहोत. यातून वारंवार त्याच चुका करतो आणि आपल्याच बेपर्वाइमुळे आगीच्या घटना घडतात.

मागील दोन आठवड्यापूर्वी घडलेली अंधेरीतील कामगार विमा रुग्णालयाची आग वा कांदिवलीतील समता नगर गोडावून लागलेली किंवा चेंबुरमधील 15 मजली सरगम इमारतीला लागलेल्या आगीची घटना. या दहा ते बारा दिवसांमधील या तीन घटनांमध्येच 20 जणांना जीव गमावावे लागले तर दीडशेहून अधिक जखमी झाले. कामगार रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण दगावले. तर कांदिवलीत कामगारांचा मृत्यू झाला. तर चेंबुरच्या आगीत 5 ज्येष्ठ नागरिक मृत्यूमुखी पडले. वयोवृध्द असल्याने त्यांना स्वतःचा चपळाईने बचाव करता आला नाही. घरातच अडकून त्यांचा गुदमरून होरपळून मृत्यू झाला.

यासर्व तीन घटनांमध्येच जीव वाचवताना अग्निशमन दलाचे चार ते पाच जवानही जखमी झाले. या घटना अत्यंत दुर्देवी आहेत. काही यंत्रणांच्या बेपर्वाईमुळे ही जिवितहानी झाली. त्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. मग मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत घोषित केली. पण आग कशामुळे लागली, याची कारणे मिडियानेही पेटती ठेवली. पण पुढे काय? ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली, गॅस सिलिंडरच्या वायू गळतीमुळे झाली कि अन्य कारणांमुळे झाली. परंतु यातील कोणतेही कारण पुढे आले तरी ती मानवीय चूकच आहे. हे मान्य करायलाच हवे.

- Advertisement -

आपण आगीच्या घटना होऊ नये म्हणून किती दक्ष आहोत. याची ही उदाहरणे आहेत. प्रत्येक वेळी आग लागल्यावर धावा…पळा म्हणत आगीच्या बंबांची आणि जवानांची वाट पहात बसायचे. पण आपली नैतिक जबाबदारी कधी ओळखणार आहोत. महापालिकेच्या आरोग्य विभाग,परवाना विभाग तसेच इमारत कारखाने विभागाच्या मदतीने अग्निशमन दलाने आग प्रतिबंधक उपाययोजना केली आहे किंवा नाही यासठी 32 हजार ठिकाणांची पाहणी केली. त्यातील 17 हजार ठिकाणांना नोटीस दिली. याचाच अर्थ निम्म्या दुकाने, मॉल्स, कारखाने, शॉपिंग सेंटर तसेच निवासी वापराच्या इमारतीच्या ठिकाणी आग प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात नाही. मग याला जबाबदार आपला निष्काळजीपणा? नोटीस दिल्यानंतरही आगीच्या घटना कमी होत नाहीत.

आज मुंबईत कुठेही आग लागली कि शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असावी, अशी कारणे सांगितली जातात. यात तथ्य किती असते हे तेव्हा तपासले जात नाही. पण शॉर्ट सर्किटमुळे आगी लागण्याचे प्रमाण वाढले सत्य हे नाकारता येत नाही. तीन वर्षांपूर्वी शॉर्ट सर्कीटमुळे आग लागण्याचे प्रमाण 40ते 50 टक्के होते. त्यात वाढ होऊन 80 टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. अग्निशमन दलाची आकडेवारीच सध्या हे सर्व सांगून जात आहे. सन 2008 पासून ते 2018च्यापर्यंतच्या कालावधीत मुंबईत ज्या सुमारे 51 हजार आगींच्या घटना घडल्या. त्यातील 34 हजार आगींच्या घटना या शॉटसर्कींटमुळे लागलेल्या आगी आहेत. त्या खालोखाल गॅसमुळे, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवणे अशाप्रकारच्या कारणांमुळे आगीच्या घटना घडत असतात. याचाच अर्थ आज मुंबईत लागलेल्या आगी या आपल्याच घरातील सदोष वीज जोडणीच्या अभावामुळे लागत आहेत. त्यामुळे आपण जर आपल्या घरातील, किंवा कार्यालयांच्या जागांमधील वीज जोडणींचे ऑडीट करून आवश्यकतेनुसार बदल्यास शॉर्ट सर्कीटच्या घटना 80 टक्क्ययांनी कमी होऊ शकतात. म्हणजे आपण आगींमुळे होणारे नुकसान आणि जिवितहानीही टाळू शकतो. पण त्याकडे लक्ष देतो कोण?

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी घाटकोपर विक्रोळी, मुलुंड भागातील इमारतीमध्ये जिन्याशेजारी तळमजल्यावर असलेल्या जागेतील वीज मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे रहिवाशांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे कुणी घाबरुन उड्या मारल्याने तर कुणी धुराने गुदमरून आणि होरपळून मृत्यूमुखी पडले होते. या घटनेनंतर जिन्याच्या प्रवेशद्वारापाशी असलेला वीज मीटर बॉक्स काढला जावा,अशी मागणी करण्यात आली. परंतु आजही अनेक जुन्या इमारतींच्या तळमजल्यावर मीटर बॉक्स आहेतच.

वीज पुरवठा करणार्‍या कंपन्यांनी हे बॉक्स अन्य ठिकाणी बसवून देण्याची सूचना केली नाही आणि रहिवाशांनीही खर्चिक बाब असल्याने ते बॉक्स बदलण्यासाठी प्रयत्न केला नाही. आग लागल्यावर बघू असेच हे धोरण आहे. जुन्या इमारतींचे ज्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाते, त्याचधर्तीवर जुन्या इमारतींचे व वीजेचा उच्च दाब असलेल्या कारखान्यांचे इलेक्ट्रीकल सेफ्टी ऑडीट होणे आवश्यक आहे. पण याची अंमलबजावणी कुठे? एमएसीबी, बेस्ट, टाटा आणि रिलायन्स एनर्जी (अदानी एनर्जी) यांनी असे ऑडीट करून वीज पुरवठा खंडित करण्याचा दम भरल्यास सर्व शक्य आहे. परंतु त्यांनीच हात वर करत याबाबत हतबलता दर्शवली आहे. मंत्रालय इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर मुंबईकरच नव्हे तर कायदेप्रणालीबरोबरच लोकप्रतिनिधी आणि सरकारी बाबू खूप काही शिकले. परंतु आग विझल्यानंतर तेही सुरक्षेचा विषय विसरून गेले. मात्र या घटनेनंतर मुंबईतील सरकारी कार्यालयांचे नुतनीकरण करताना, बांधकामात अग्निरोधक सामानाचा वापर करण्याचे परिपत्रक जारी केले होते. त्यानुसार मंत्रालयाच्या नुतनीकरणात याचा वापर करण्यात आला. त्याला मंत्रालयाला लागलेल्या आगीची पार्श्वभूमी होती. परंतु अन्य ठिकाणी होणार्‍या नुतनीकरणाच्या कामात फायर प्रुफ प्लायवूड तसेच इलेक्ट्रीक मटेरियल्स वापरले की नाही याची खातरजमा करणारी टिम कुठे आहे?

आगीच्या कारणांचा शोध घेतला तरी त्यात सुधारणा होणार नाही. कामगार रुग्णालयाच्या इमारतीला लागलेली आग मोठी नव्हती. परंतु इमारत आकर्षक दिसावी म्हणून काच फसाडचा वापर केला होता. काच फसाडची इमारत पूर्णपणे बंदिस्त असल्याने, आणि आगीचा धूर बाहेर जाण्यास वाव नव्हता. धुरामुळे गुदमरून रुग्ण आणि नातेवाईकांचा मृत्यू झाला. मुळात काच फसाड इमारतींसाठी आग प्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजनांतर्गत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते नियम पाळले जात नाहीत. एकूण बांधकामाच्या अडीच टक्के तरी भाग किमान खुला पाहिजे. परंतु काच फसाडच्या बहुतांशी इमारती या कमर्शियल वापराच्या आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती वातानुकुलिन यंत्रणा असल्याने कुठही भाग खुला ठेवू शकत नाही. त्यामुळेच आगीसारखी घटना घडल्यास आग आणि धुराचे लोळ बाहेर जाण्यास मार्ग नसल्याने, अशा इमारतींमध्ये लागलेल्या आगींमध्ये नुकसान आाणि मनुष्यहानी मोठ्याप्रमाणात झालेली पाहायला मिळते. अंधेरी लोटस बिझनेस पार्क असो एलफिन्स्टन येथील काचेची इमारत असो वा अन्य कुठलीही घटना अभ्यासल्यानंतर ही बाब निदर्शनास येते.

नियमानुसार सर्व उंच इमारतींमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणे बंधनकारक आहेत. इमारतीचे बांधकाम करताना अशाप्रकारची यंत्रणाही बसवली जाते. पण पुढे ती कार्यान्वित असेलच याचा नेम नाही. मुंबईतील अनेक झोपडपट्टयांच्या जागी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत इमारती बांधल्या आहेत. या एसआरएच्या इमारतींमध्ये अशाप्रकारच्या यंत्रणा दिसण्यापुरत्या दिसत असल्या तरी प्रत्यक्षात दुर्घटनांच्यावेळी त्याचा काहीही वापर होत नाही. कारण यंत्रणा बसवली म्हणजे आग लागणार नाही. अशाप्रकारचा भ्रम लोकांचा मनात आहे. त्यामुळे तीन ते सहा महिन्यांनी त्याचे मॉक ड्रिल करून ते कार्यान्वित आहेत की नाही हे सुध्दा तपासले जात नाही. त्यामुळे यंत्रणा असल्या तरी प्रत्यक्षात त्या कार्यान्वितच नसतील तर त्याचा काय उपयोग? मुंबईतील सर्वच एसआरएच्या पुनर्वसनाच्या इमारतींमध्ये हीच अवस्था आहे. या इमारती विकासकाने इमारती बांधून दिल्या. आता तेच काय बघतील, ही रहिवाशांची धारणाच मुळात त्यांच्याच जीवावर बेतताना दिसत आहे.

जी स्थिती आज एसआरएच्या इमारतींची आहे तीच स्थिती कोट्यवधी रुपये ओतून फ्लॅट खरेदी केलेल्या टोलेजंग इमारतींची आहे. काही महिन्यांपूर्वी परळमधील क्रिस्टल टॉवरला लागलेल्या आगीतही आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे आढळून आले होते. चेंबूर टिळकनगर सरगम इमारतीतही तेच दिसून आले. याप्रकरणी विकासकाविरोधात गुन्हा दाखल झाला.पण पुढे काय? जीव गेलेले परत येणार आहेत? एकप्रकारे कोट्यवधी रुपये खर्च करून आपले मरण विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आगी लागण्याची कारणे जर भिन्न असली तरी विझवणारी यंत्रणा एकच असते. त्यासाठी पाणी लागते. परंतु इमारतींमधील यंत्रणेतील पाईप चालणारे नाहीत. तर पाणी कसे मारायचे आणि आग कशी विझवायची. आजही मुंबईतील अशा चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये इमारती उभारल्या गेल्या आहेत की, आगीच्या घटना घडल्यानंतर देवदुतासारखे मदतीसाठी धावणार्‍या अग्निशमन दलाच्या जवानांचे वाहतूक कोंडीचे यमदूत रस्ता अडवून बसलेले असतात. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग लागल्यावर चुटकीसरशी धावून यायला हवे, अशी अपेक्षा सर्वांचीच आहे. पण त्यासाठी त्यांना रस्ता मोकळा हवा नको? आगीचा बंबच जर वाहतूक कोंडीत अडकून पडला तर जवान आग विझवायला वेळेवर पोहोचणार कसे?

तीन वर्षांपूर्वी दामू नगर येथील झोपडपट्टीत गॅस सिलिंडरचे स्फोट होऊन अख्खी झोपडपट्टी जळून खाक झाली होती. त्यावेळी ही आग लागली कि लावली, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु झोपडपट्ट्यांमध्ये लागणार्‍या काही आगीच्या घटना या अपवाद असू शकतील. परंतु वारंवार त्याच ठिकाणी आगी लागत असतील तर दुर्देवी आहे. वांद्य्राच्या बेहराम पाड्यात आतापर्यंत दोन वेळा भीषण आगी लागल्या. सुदैवाने यात कुठलीही जिवितहानी झाली नाही.अशाच भीषण आगी समोरच्याच गरीब नगरलाही लागल्या. त्यातही जिवितहानी झाल्या नव्हत्या. एवढेच कशाला तर वांद्रयातील नर्गिस दत्त नगरचे पुनर्वसन हे आगीच्या घटनेनंतर झाले होते. त्याठिकाणी पुन्हा एकदा आग लागली होती. त्यामुळे कुठे तरी संशयाचा धूर दिसतो.

टोलेजंग इमारती, इमारती आणि झोपडपट्टया तसेच चाळी यामध्ये लागणार्‍या आगीच्या घटना तर आहेतच. पण जसे आपण घरात सुरक्षित नाही, तसेच तसे आपण आगीपासून रस्त्यांवरही सुरक्षित नाही. आज रस्त्यांवर जे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल्स आहेत. त्यासर्वांकडून सर्रासपणे गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. आजवर अनेकदा गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन पादचार्‍यारी जखमी तसेच मृत पावलेले आहेत. पण या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील सिलिंडर जप्त करण्याची हिंमत नाही. कुणी तरी तक्रार केली तर अग्निशमन दलाचे आणि पोलीस संयुक्तपणे कारवाई करून सिलिंडर जप्त करतात. परंतु ज्या कायद्यानुसार ही कारवाई केली जाते, त्या कायद्याची काटेकोरपणे वेळोवेळी कारवाई का केली जात नाही, असाही प्रश्न उपस्थित होतो.

270 वाहने आणि 350 उपकरणे तसेच 2800 जणांचा कर्मचारी वर्ग असलेला अग्निशमन दल सक्षम असला तरी आग विझवायला पाणी लागते, तेच वेळेत उपलब्ध होत नाही. मुंबईच्या रस्तोरस्ती दिसत असलेले वॉटर हायड्रंट हे शोभेचेच ठरलेले आहेत. ब्रिटीशांनी नियोजन केलेल्या या वॉटर हायड्रंटचा आज खर्‍या अर्थाने उपयोग होऊ शकतो. पण सध्या तेच कार्यरत नाही. त्यामुळे महापालिकेच्या पाणी भरणा केंद्रावर टँकर भरून आणावा लागतो. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि त्यामुळे लागणारा वेळ यामुळे आगी विझवताना अग्निशमन दलाला मोठी तारेवरची कसरत करावी लागते. ताफ्यात 42 मीटरपासून 72 मीटरपर्यंत लॅडर असली तरी 30मीटर पेक्षा उंच इमारतींच्या आगींवर नियंत्रण मिळवणे कठीण आहे.

मुंबईत उत्तुंग इमारती बांधल्या जातात. परंतु या बांधताना आग प्रतिबंधक उपाययोजनांचीही तेवढ्याच तत्परतेने कार्यवाही केल्यास तसेच स्वत:ची यंत्रणा उभी केल्यास प्राथमिक स्तरावरच आग विझल्या जावू शकतात. यामुळे होणारे संभाव्य नुकसान व जिवित हानीही टाळता येण्यासारखी आहे. परंतु आगीबाबत आपण गंभीर नाही आहोत. आगींच्या घटनांमध्ये वाढ होतच आहे. आगींच्या निखार्‍यांवर मुंबई आज उभी आहे. हे निखारे विझवणे आपल्या हाती आहे. त्यांनी पेट घेण्यापूर्वी ते विझवले पाहिजे. आगीच्या याघटना कुठे तरी थांबवायची गरज आहे. त्यासाठी प्रथम स्वत:पासून सुरुवात व्हायला हवी. नाहीतर आगींच्या घटना घडतच राहतील आणि हे शहर आगींचे शहर असे म्हणून ओळखले जाईल. आंतरराष्ट्रीय किर्तीच्या शहराला आगीत ढकलायचे की आगीपासून वाचवायचे याचा सर्वांनीच विचार करायला हवा.

मागील दहा वर्षातील डिसेंबर 2018पर्यंतची आगींच्या घटनांची आकडेवारी

एकूण आगींच्या घटना : 51 हजार

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगी: सुमारे 34 हजार

उत्तुंग इमारतींना लागलेल्या आगी: सुमारे 1600

निवासी इमारतींना लागलेल्या आगी: सुमारे 9000

कमर्शियल वापराच्या इमारतींना लागलेल्या आगी: सुमारे 4000

झोपडपट्टयांमधील आगीच्या घटना: सुमारे 3000

गॅस सिलिंडरमुळे लागलेल्या आगी : सुमारे1200

इतर कारणांमुळे लागलेल्या आगी: सुमारे 13,000

आतापर्यंत मृत्यू पडलेल्यांची संख्या : सुमारे700

शॉर्ट सर्किटच्या घटना का लागतात?

घरातील किंवा इमारतीची वीज जोडणी जुनी झाल्यास, वीजेच्या क्षमतेपेक्षा अधिक वापर झाल्यास वीज तारांवरील दाब वाढून वायर तापली जाते. त्यामुळे त्यावरील आवरण वितळून त्याचे रुपांतर शॉटसर्किटमध्ये होते. आज प्रत्येक घरातील, कार्यालयाचे नुतनीकरण करताना वीज जोडणी ही भिंतीच्या आतील बाजुने केली जाते. यातील काही वीजेच्या तारा या फॉलसिलिंगच्या आतून जातात. परंतु फॉलसिलिंगमध्ये उंदरांचा वावर असल्याने त्यांच्याकडून वीजेच्या तारा कुरतडल्या जातात. त्यामुळेही शॉर्टसर्किट होते.

आग लागल्यावर काय करावे?

– आगीच्या घटनेनंतर त्वरीत 101 क्रमांकावर दूरध्वनी करून अग्निशमन दलाच्या वर्दी द्यावी.

– प्रथम घरातील वीजेचा मुख्य बटन बंद करावा. परंतु हे बटन बंद करताना पायात स्लिपर घालून अथवा काठीने बंद करावे. त्यानंतरच आग विझवण्याचा प्रयत्न करावा.

– आगीपासून घाबरुन न जाता जिथे शॉट सर्किट झाले त्याला मुख्य वीज संचमांडणीपासून अलग ठेवणे.

– आगीमुळे धूर झाल्यास ओला कपडा, रुमाल तोंडावर ठेवणे.
– घरात अथवा जिन्यामध्ये पसरणार्‍या धुरापासून सुरक्षित राहण्यासाठी उभे न चालता गुडघ्यावर किंवा सरपटत चालावे.

– बंदिस्त घरात अडकला असाल आणि घरामध्ये दरवाज्या फटीतून धूर येत असेल तर कपडा ओला करून त्या दरवाज्याच्या फटीच्या जागेत गुंडाळून लावावा. धूर हलका असल्याने तो हवेत निघून जातो तसेच ओल्या कपड्याबरोबर शोषून घेतला जातो.

– लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करावा, आगीमुळे लिफ्ट बंद होवू शकते आणि त्यात धूर जावून गुदमरण्याची शक्यता असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -