घरफिचर्सफुटला बिग बजेट भ्रमाचा भोपळा

फुटला बिग बजेट भ्रमाचा भोपळा

Subscribe

केवळ स्टार्सच्या नावावर बॉक्स ऑफिसवर चित्रपट खपवण्याचे दिवस संपले आहेत. चारपाच महिन्यांपूर्वी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा स्त्री प्रदर्शित झाला. आगळं वेगळं कथानक, त्याला सस्पेन्स, थ्रीलची जोड दिल्यामुळे दहा पंधरा कोटींमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने मोठी स्टारकास्ट नसतानाही १०० कोटींचा गल्ला पार केला. त्यानंतर सुई धागाच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. श्रमिक नायक नायिका असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गातल्या संघर्षाचं साधं सरळ कथानक असतानाही सुई धागा बर्‍यापैकी चालला. बधाई हो ची व्यावसायिक दखल तर दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनने घेतली. हिंदी पडद्याला सुचलेलं हे उशिराचं शहाणपण असताना मराठी पडद्यावर मात्र विषयांच्या वैविध्यानं मोठं व्यावसायिक यश मिळवायला याआधीच सुरुवात केली आहे.

मराठीसह हिंदी चित्रपटांची व्यावसायिक गणितंही येत्या वर्षात बदलणार आहेत. त्याची चाहूल सरत्या वर्षात लागली आहे. उत्तम संकल्पना, चांगल्या पटकथेसोबतच वैविध्यपूर्ण विषयाला प्रेक्षक पसंती देतात हे स्पष्ट झालं आहे. बिग बजेट आणि मोठ्या स्टारकास्टला नाकारताना प्रेक्षक आता कुठल्याही स्टारडमच्या प्रेमात अडकून पडत नाहीत. शाहरुख खानने याबाबत सूचक वक्तव्य नुकतंच केलं. आमिर खानचा अमिताभ, आमिरसारखे मोठे कलाकार असूनही बहुचर्चित, बहुबजेट ठग्स ऑफ हिंदुस्तान बॉक्स ऑफीसवर सपशेल पडला. त्यामुळे सलमानसह आमिरलाही टेन्शन आलं. त्यानं ठग्सच्या अपयशाची जबाबदारी घेत प्रेक्षकांची माफी मागितली. तर दुसरीकडे त्यानंतरच्या दुसर्‍या तिसर्‍या आठवड्यातच रजनीच्या एंधिरनचा भाग दुसरा २.० प्रदर्शित झाला. रजनीची लोकप्रियता, दक्षिणेकडील प्रेक्षकांची आवडनिवड, अभिरुची वेगळी आहे. रजनीच्या नावावरही तिथे सिनेमा कोट्यवधींच्या घरात दाखल होऊ शकतो. हिंदी पडद्यावरील खानमंडळींनी हा धोका स्वीकारल्यास प्रेक्षक ठकवले जाण्याची भीती आहे. परवाच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या झिरोनं हेच स्पष्ट केलंय. शाहरुख खानला आपलं किंग खानपण कायम ठेवण्यासाठी खूपच आटापिटा करावा लागतोय.

केवळ स्टार्सच्या नावावर बॉक्स ऑफिसवर चित्रपट खपवण्याचे दिवस संपले आहेत. चारपाच महिन्यांपूर्वी राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा स्त्री प्रदर्शित झाला. आगळं वेगळं कथानक, त्याला सस्पेन्स, थ्रीलची जोड दिल्यामुळे दहा पंधरा कोटींमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने मोठी स्टारकास्ट नसतानाही १०० कोटींचा गल्ला पार केला. त्यानंतर सुई धागाच्या बाबतीतही हेच म्हणावं लागेल. श्रमिक नायक नायिका असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गातल्या संघर्षाचं साधं सरळ कथानक असतानाही सुई धागा बर्‍यापैकी चालला. बधाई होची दखल तर दस्तुरखुद्द अमिताभ बच्चनने घेतली. त्यांनी नीना गुप्ता यांना बधाई होच्या यशाबद्दल आणि उत्तम अभिनयाबद्दल नीनाचं पत्र लिहून कौतूक केलं.

- Advertisement -

पन्नाशीच्या घरात गेलेल्या जोडप्याला चिमुकल्या पाहुण्याची चाहूल लागल्यावर निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीचा ब्लॅक कॉमेडीच्या शेडमध्ये केलेलं चित्रण वेगळ्या विषयामुळे प्रेक्षकांना भावलं आणि बधाई हो नेही बॉक्स ऑफिसवर शंभर कोटी मिळवले. श्रद्धा कपूर, शाहीद कपूरच्या बत्ती गुल मीटर चालूचा विषयही वीज कंपन्यांच्या अडेलट्टूपणाच्या कथानकामुळे होणार्‍या सामान्यांच्या पिळवणुकीचा होता. त्यामुळे समान्य प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याच्या विषयामुळे हा चित्रपटही तुलनेत बर्‍यापैकी चालला. आगळ्या वेगळ्या कथानकाचे विषय असतील तर त्याला प्रेक्षक आनंदाने स्वीकारतात. हे बॉलिवूडवाल्या खानमंडळींना आताशा समजू लागलं आहे. त्यामुळेच यापुढे बिग बजेटच्या भानगडीत पडायचं नाही, असा विचार आमिर खानने केला आहे. त्यामुळेच त्याने महाभारतावर बनवण्यात येणार्‍या चित्रपट सिरीजचा विषय सोडून दिला.

शाहरुख आमिरच्या तुलनेत सलमानला काहीसे अच्छे दिने होते. त्याचा टायगर जिंदा है आणि रेस सारख्या मारपीटपटांनी निर्मात्यांचे होणारे नुकसान काहीसे वाचवले. पण म्हणावे तेवढे यश या दोन्ही सिनेमांना मिळालेले नाही. दमदार, ऐतिहासिक कथानक पडद्यावर पेलवणं सोपं नाही. हा अनुभव संजय लिला भन्सालीने देवदास ते अलीकडच्या पद्मावतपर्यंतच्या प्रवासात अनेकदा घेतला आहे. मात्र, ही रिस्क ज्याची त्यानेच उचलावी, मोठी नावं पडद्यावर उतरवून ही जोखीम पत्करणं हे सोपं काम नाही.

- Advertisement -

राजकुमार हिरानीच्या संजूनं या वर्षाच्या बॉलिवूडच्या यशाची दमदार सुरुवात केली. बॉक्स ऑफिसवर संजय दत्तने एकहाती यश कधीही मिळवलेलं नाही. राजकुमार हिरानी किंवा महेश मांजरेकर अशा दिग्दर्शकांचा त्यात मोठा वाटा राहिला आहे. मात्र, पडद्यापलीकडचं त्याचं जगणं कायमच वादळी राहिल्यानं त्यातलं व्यावसायिक मूल्य ओळखून राजू हिरानीनं संजू बनवला. संजूच्या जीवनावर बनवलेला हा वास्तववादी सिनेमा नाही, असं काहीशा अडगळीत पडलेल्या रामगोपाल वर्माने स्पष्ट केलं आणि मी आता संजूच्या जीवनावर खराखुरा वास्तववादी सिनेमा बनवणार असल्याची घोषणा करून टाकली.

यातला माणसांच्या, समाजाच्या वास्तववादी जगण्याला व्यावसायिक कथानकाची जोड देऊन चित्रपट तयार करण्याचा महत्वाचा नवा प्रकार अलीकडे पुढे आला आहे. त्याचं श्रेय रामगोपाल वर्माच्या तालमीत तयार झालेल्या अनुराग कश्यप आणि तशाच इतर तरुण दिग्दर्शकांचं आहे. त्यामुळे समांतर चित्रपट वेगळा असं काही राहिलेलं नाही. दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला पोलीसपट असलेला रोहित शेट्टीचा सिंबा बॉक्स ऑफीसवर यश मिळवतोय, हे या नव्या प्रकाराने अधोरेखित केलं आहे. नव्या विचारांच्या तरुण प्रेक्षकांना अर्धसत्य, शूल, प्रतिबंध, खाकी अशा शोकांतिकेच्या वास्तववादी पोलीस पटांमध्ये रस उरलेला नाही.

हे असं असतानाच या नव्या दमाच्या दिग्दर्शकांनी यश चोप्रांचे स्वित्झर्लंडमधले स्वप्नील प्रेमपट, करण जोहरच्या एनआरआय श्रीमंती थाटातल्या कथापटांना वास्तववादाच्या कठिण जमिनीवर आणलं. याच वर्षात नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या चरित्र, व्यक्तीरेखा साकारणार्‍या अभिनेत्याचं नंदिता दासच्या मंटोनिमित्त कौतूक होऊ लागलं. है कौतूक बॉलिवूडचा पुरेसा पडदा उपलब्ध न होताही वेगळ्या सिनेमाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रेक्षकांसाठी आश्वासक होतं. हा होणारा बदल करण जोहरने वेळीच लक्षात घेतला. म्हणूनच त्याने नागराजच्या सैराटचा हिंदीत धडक बनवला. पण जातवास्तवातल्या मातीशी नाळ जोडली नसल्याने धडक सैराटच्या तुलनेत कमालीचा सपक ठरला. अरे ये कौनसी फिल्मे आ रही है…और हम क्या बना रहे है… मराठीतला सैराट पाहिल्यावर रिमेकींगचे अधिकार घेताना करनने स्पष्ट कबुली दिली होती.

हिंदी पडद्याला दखल घ्यायला लावणारी अशीच परिस्थिती प्रविण तरडे यांच्या मुळशी पॅटर्नमुळे पुन्हा निर्माण झाली आहे. सलमान खानने मुळशी पॅटर्नच्या हिंदी रिमेकचे अधिकार घेतल्याची बातमी आलीय. अरबाजने स्वतः मुळशी पॅटर्न पाहून त्याच्या व्यावसायिक आणि सामाजिक मूल्यांच्या कथानकाचं कौतूक केलं. या वर्षात मराठी पडद्याने हिंदी पडद्याला हा धडा पुन्हा शिकवला आहे. त्याच वेळी मराठी पडद्यानं आता आई बाबा,सासू सुना, पुण्यातल्या बरिस्ता कॅफेतल्या तिच्या त्याच्या गोडगप्पांतून बाहेर यायला हवं, असं प्रविण तरडे यांनी सुनावलं. मराठीचे प्रेक्षक चोखंदळ आहेत. नव्या विषयाला ते स्वीकारतातच. मात्र, मराठी पडद्याने त्यांना गुटगुटीत कथानकांची चकचकीत चित्रपटांची सवय लावल्याने त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. मुळशी पॅटर्नच्या मागे मोठं बॅनर, आर्थिकदृष्टीने बलाढ्य अशी निर्मितीसंस्था नसतानाही आणि सेन्सॉरच्या वादानंतरही मुळशी…नं मिळवलेलं यश त्यामुळेच महत्त्वाचं आहे. प्रविण तरडे यांचं असं सुनावणं हे मराठी पडद्यासह हिंदीतही गुटगुटीत सिनेमे बनवणार्‍यांना सारखंच लागू होतं.

दमदार कथानक, वैविध्यपूर्ण विषय व्यावसायिक चौकटीत बसवण्याची तयारी नव्या दिग्दर्शकांनी केली आहे. मराठीसह हिंदी पडद्यावरील होणारा हा बदल स्वागतार्ह आहे. त्यामुळे कलात्मक किंवा समांतर आणि निव्वळ व्यावसायिक असा फरक चित्रपटांत राहिलेला नाही. मोठी स्टारकास्ट घेऊन बिग बजेटची गणितं मांडणार्‍या पॉपकॉर्न प्रेक्षकांना आवडणारा सिनेमा आम्हाला नको, असं या प्रेक्षकांनी हिंदीसह मराठी पडद्यालाही ठणकावून सांगितलं आहे.

डॉ. काशीनाथ घाणेकर नावाचा हरहुन्नरी कलाकार मराठी रंगभूमी आणि पडद्यावर होता. ज्यावर एक यशस्वी मराठी चित्रपट तयार होऊ शकतो, हा विचारच बॉलिवूडला नवा होता. मात्र, मराठीनं तो यशस्वी करून दाखवला. त्यानंतर नागराज असलेला चिमुकल्या मुलाचं विश्व साकारणारा संवेदनशील नाळ रिलिज झाला. त्यालाही प्रेक्षकांनी आनंदाने स्वीकारलं. पुढे मुळशी पॅटर्नचा विषय या दोन्ही सिनेमांपेक्षा खूपच वेगळा होता. तर मुंबई पुणे मुंबई हा सतीश राजवाडे दिग्दर्शित चित्रपटाचा विषयही या तीनही सिनेमांपेक्षा वेगळा होता. मात्र, हे सर्वच सिनेमे मराठी प्रेक्षकांनी पसंत केले.

त्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली. मराठी पडद्याला आलेली ही जाण हिंदी पडद्यानेही वेळीच आत्मसात केली तर बॉलिवूडकडून मोठ्या नावांनी होणारी प्रेक्षकांची ठकवणूक थांबेल आणि शाहरुखने व्यक्त केलेली चिंताही मिटेल.

वैविध्यपूर्ण सशक्त कथानक, उत्तम अभिनय, दिग्दर्शनाच्या बळावर हे शक्य आहे. पण हिंदी आणि मराठी पडद्यानेही आपल्या पूर्वग्रहदूषित प्रेमातून बाहेर पडायला हवं. हेच खरं…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -