घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशेतकर्‍याने उभारली कांद्याची अनोखी गुढी

शेतकर्‍याने उभारली कांद्याची अनोखी गुढी

Subscribe

संगमनेर : तालुक्यातील आंबीखालसा येथील राहुल भाऊसाहेब कान्होरे या तरूण शेतकर्‍याने कांद्याला हमी भाव मिळावा म्हणून थेट आपल्या कांद्याच्या शेतात गुढीपाडव्याच्या दिवशी कांद्याची अनोखी गुढी उभारली. याप्रसंगी शेतकर्‍याच्या कन्येने मागण्यांचे फलक हातात धरत सरकारचे लक्ष वेधले.

आंबीखालसा येथे राहुल कान्होरे हे शेतकरी यांचा निवास आहे. दरवर्षी ते कांद्याचे विक्रमी उत्पादन घेत असतात. त्यामुळे यंदाच्या वर्षी त्यांनी आपल्या १० एकर क्षेत्रात गावठी कांद्याची लागवड केली असून.त्यासाठी १ एकरला कांदा काढणीसाठी जवळपास ७० ते ८० हजार रूपये खर्च आला आहे. मात्र कांद्याला कवडीमोल भाव असल्याने अनेक शेतकर्‍यांनी कांद्यावर रोटाव्हेटर फिरवले. तर काहींनी कांद्यात मेंढ्याही सोडल्या. सध्या कांद्याला 10 ते 12 रूपये किलोंचा भाव मिळत आहे.त्यामुळे या भावाने कांदा विकला तर झालेला खर्चही वसूल होणार नाही. आधीच एकामागून एक संकटांनी शेतकरी अक्षरश: मेटाकुटीस आले आहे.

- Advertisement -

सरकारने कांद्याला हमीभाव द्यावा म्हणून कान्होरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या शेतात कांद्याची गुढी उभारण्याचा निर्णय घेतला. सकाळी कान्होरे यांनी आपल्या कांद्याच्या शेतात कांद्याची अनोखी गुढी उभारली. त्यांची पाचवीत शिकणारी मुलगी शरयू हिनेही कांद्याला हमी भाव द्या असा फलक हातात धरून सरकारचे लक्ष वेधले असून या अनोख्या गुढीची सर्वत्र चर्चा होत आहे.

आमच्या भागात कांद्यासह इतर पिके मोठ्या प्रमाणात आहे. परंतु आज कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून शेतकर्‍यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. आज शेतकर्‍यांना शेती करणे सुद्धा खूप अवघड झाले आहे. त्यात शेतकर्‍यांना विविध संकटांचांही सामना करावा लागत आहे. तरीही शेतकरी न डगमगता शेती करत आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव देणे गरजेचे आहे. : सुरेश कान्होरे, चेअरमन, आंबी-माळेगाव सोसायटी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -