घरमहाराष्ट्रनाशिकबाजार समिती निवडणुक : चुंभळे-पिंगळे आमने सामने; दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

बाजार समिती निवडणुक : चुंभळे-पिंगळे आमने सामने; दोन्ही गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

Subscribe

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शुक्रवारी (दि.३१) सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. बाजार समिती निवडणुकीसाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास पिंगळे व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गर्दी झाली होती.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 जागांसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी (दि.३१) चौथा दिवस होता. शिवाजी चुंभळे यांनी सर्वसाधारण गटातून अर्ज दाखल केला तर, देविदास पिंगळे यांनी सर्वसाधारण गटातून २ अर्ज दाखल केले. याचबरोबर विश्वास नागरे यांनी व्हीजेएनटी गटातून २ अर्ज, त्र्यंबक पेखळे, रामभाऊ मुळाणे यांनी सर्वसाधारण गटातून तर, दिलीप थेटेे यांनी सर्वसाधारण तसेच इतर मागास प्रवर्ग गटातून अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी 3 एप्रिल अंतिम दिवस असल्याने शुक्रवारी (दि. 31) 70 अर्ज दाखल झाले तर, 80 अर्जांची विक्री झाली. अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ 1 दिवस शिक आहे. पिंगळे गट व चुंभळे गटातील काही उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज दाखल केले आहेत.

- Advertisement -

अर्ज दाखल केल्यानंतर देवीदास पिंगळे यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी पिंगळे यांनी जिल्हा बँकेचे उदाहरण देत कुणाच्याही हाती सत्ता देऊन बाजार समितीची जिल्हा बँक होऊ देऊ नका, असे आवाहन मतदारांना केले.
शिवाजी चुंभळे आणि दिनकर पाटील यांनी सत्ताधार्‍यांवर शरसंधान साधले. माजी सभापती शिवाजी चुंभळे म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार हेमंत गोडसे, दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपचे एकत्रित पॅनल तयार करत आहोत. आम्ही तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात आणुन दाखविली. तेव्हा सुज्ञ मतदारांनी बाजारसमितीची गरज ओळखावी.

यावेळी देविदास पिंगळे यांच्यासमवेत अर्ज दाखल करताना गोकूळ पिंगळे, संपत सकाळे, दिलीप थेटे, भगिरू बोहाडे, तुकाराम पेखळे, विश्वास नांगरे, राजाराम धनवटे, संजय तुंगार, निर्मला कड, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, जगदीश आपसुंदे, रुपांजली माळेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासमवेत अर्ज दाखल करताना दिनकर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख (शिंदे गट) अनिल ढिकले, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, तानाजी करंजकर, नवनाथ कोठुळे, सुरेश गंगापुत्रा, हिरामण जाधव, दिलीप पाटील, समाधान बोडके, रवी भोये आदी उपस्थित होते.

- Advertisement -
भाजप-शिंदे गट विरुध्द पिंगळे गट थेट लढत रंगणार

माजी सभापती शिवाजी चुंभळे विरुद्ध देविदास पिंगळे असे दोन गट नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी परस्परांविरुद्ध लढत देणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. माजीमंत्री गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली खासदार हेमंत गोडसे, माजी नगरसेवक दिनकर पाटील, शिवाजी चुंभळे असा एक गट तयार झाला असून, देविदास पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा गट लढत देणार आहे. 3 एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख असून, 5 एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारीची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे. अर्ज दाखल केल्यानंतरच दोन्ही गटांत खर्‍या अर्थाने खल सुरू होणार असला तरी एकीकडे बाजारसमिती निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने अद्याप आपले पत्ते उघड केलेले नाहीत. तेव्हा ठाकरे गट कुणाला पाठिंबा देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

  • समाजाच्या नजरेतून उतरले तर काय उपयोग?

प्रत्येक उमेदवार स्वत:ला चांगलेच म्हणतो. मात्र, समाजाने स्वतःहून त्याला चांगले म्हणायला हवे हे महत्वाचे असते. समाजाच्या नजरेतून उतरले तर काय उपयोग? गेल्या ३० वर्षांपासून एकाच व्यक्तीची बाजारसमितीवर सत्ता आहे. कुणाला वाटत असेल माझ्यासारखी व्यक्ती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर तो त्याचा भ्रम आहे. बाजार समितीच्या स्थावर मालमत्तेविषयी चौकशी गरजेची आहे. आम्ही अडीच वर्षे सत्तेत असतो. आमच्या कामकाजाचा लेखाजोखा, आम्ही केलेला विकास मतदारांना माहित आहे. आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर विरोधकांनी सांगावे. आम्हाला जे पद मिळाले त्याची पत आम्ही राखली. तेव्हा सुज्ञ मतदारांनी आम्हाला मत देऊन विकासाचा मार्ग निवडावा. : शिवाजी चुंभळे, माजी सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

  • बाजारसमितीची जिल्हा बँक होऊ देऊ नका

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची जिल्हा बँक होऊ देऊ नका. शेतकर्‍यांच्या संस्था बंद पडत गेल्या तर त्यांना न्याय द्यायला कुणीही उरणार नाही. जिल्हा बँकेवर गेल्या 8 महिन्यांपासून प्रशासक असल्याने काही शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपये व्यापारी घेऊन गेले. शेतकर्‍यांना रुपयाही मिळाला नाही. म्हणूनच शेतकर्‍यांना आधाराची गरज आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकर्‍यांच्या मालकीची संस्था आहे. ती पिंगळे, सकाळे किंवा इतर कुणाच्या मालकीची संस्था नाही. ही संस्था जपण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. संस्थेचे भविष्य हे तुमच्याच हाती आहे, असे आवाहन पिंगळे यांनी केले. : देविदास पिंगळे, माजी सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -