घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकमध्ये मांजामुळे ड्रायव्हर जखमी; विक्रेत्यांवर कारवाई

नाशिकमध्ये मांजामुळे ड्रायव्हर जखमी; विक्रेत्यांवर कारवाई

Subscribe

जीवघेण्या चायनिज मांज्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांची ही कारवाई पाहता मांजा विकणारे विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत.

संक्रांतीच्या तोंडावर नाशिक शहरातील पतंगबाजीचा जोर वाढू लागला आहे. मात्र पतंगबाजीसाठी सर्रास घातक नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने, वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन दिवसांत घातक मांजा बाळगणार्‍या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंचवटी पोलिसांनी मालेगाव स्टँड भागातील ठक्कर्स ट्रॅव्हल्ससमोरील मोकळ्या जागेत ठेवलेला १५ हजार ६०० रुपये किंमतीचा नायलॉन मांजा आणि २६ फिरक्या जप्त केल्या आहेत.

मालेगाव स्टँड भागातील साखरे चाळीतील रहिवाशी सुमित महाले या युवकाने हा माल बाळगला असल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसर्‍या घटनेत मधुबन कॉलनीतील योगेश किराणा दुकानावर छापा टाकत पोलिसांनी नायलॉन मांजा आढळून आल्याने अतुल आहेर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच, कुमावत नगरातील मनोज निवृत्ती कुमावत यांनी इमारतीच्या जिन्याखाली नायलॉन मांजा दडवून ठेवल्याचे पंचवटी पोलिसांना आढळून आले. शुक्रवारी पंचवटी पोलिसांनी ही कारवाई केली.

- Advertisement -

अशोक स्तंभ परिसरातील घारपुरे घाट भागातील सागर धनगर या तरुणाने नायलॉन मांजाचे ३८ फिरक्या वनसे चाळीत ठेवल्याचे आढळून आले. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत १९ हजार रुपयांचा मांजा आणि फिरक्या जप्त केल्या. अंबड पोलिसांनी चुंचाळे शिवारातील पवार वडापावनजीक राहणार्‍या गोरख शिंदे या युवकाच्या घरातून ४ हजार २०० रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला. पोलिसांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास कारवाई केली. दुसर्‍या कारवाईत गजानन चौकातील राहुल जाधव या तरुणाविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राहुल याने विक्रीसाठी घातक मांजा घरात दडवून ठेवल्याचे आढळून आले.

जीवघेण्या चायनिज मांज्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांची ही कारवाई पाहता मांजा विकणारे विक्रेते चांगलेच धास्तावले आहेत. ज्याठिकाणी मांजा आढळून येतो त्याठिाणी पोलीस कारवाई करत मांजा जप्त करत आहेत. मांजामुळे गेल्या काही दिवसांत अनेक वाहन चालकदेखील जखमी झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या जीवाला घोर लागलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -