घरफिचर्ससारांशMother's Day SPECIAL : आई कुठे काय करते...!

Mother’s Day SPECIAL : आई कुठे काय करते…!

Subscribe

आईच पहाटे समयी धरणी मातेला सडा घालून तृप्त करणारी गृहदेवता असते. आईच धरणीमातेला रांगोळी घालून सौंदर्याचा एक पवित्र ठेवा बहाल करून पहाटेच्या कोवळ्या काळोखात लुप्त होणारी चांदणी असते. आईच प्रत्येक लेकराच्या मनातलं ओठांवर येण्याआधी मायाळू नजरेन हेरलेलं मुखात घालणारी वात्सल्य मूर्ती असते. हो, खरंच तिच्यामुळेच आपल्या सिमेंटच्या, पत्र्याच्या, मातीच्या गोकुळात प्राण असतो. तुमच्या मते भलेही सकाळचा सूर्य आकाशात उजाडत असेल, परंतु आपल्यासाठी तीच आनंदाने प्रत्येक सकाळ उजाडणारी, तळपणारी सूर्यदायिनी असते.

–आकाश महालपुरे

माझं बाळ माझं बाळ म्हणत हाडाची काडं करते,
लेकराबाळांच्या सुखासाठी रात्रंदिन मरमर मरते,
उठल्यापासून झोपेपर्यंत सर्व कामे आई करते
आणि जन्म दिला म्हणून आपले संगोपनदेखील करते.

- Advertisement -

बसं एवढचं ना..! अगदी बरोबर. मग जाऊन का नाही विचारत एखाद्या आईविना अनाथ मुलाला…?
की जीवनात आई कुठे काय करते…? पण मित्रांनो, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आईच आपल्या घराचा, जीवनाचा, परिवाराचा खरा आधारवड असते.

आईच आपल्या सुखाचं पहिलं आणि शेवटचं पानं असते. आईच आपल्या आयुष्यातील सकाळच्या व संध्याकाळच्या अडीच इंच भुकेल्या पोटाचा अग्नी शांत करणारी चूल असते. आईच घरातल्या प्रत्येकासाठी निर्विवादपणे केलेली प्रार्थना स्वकीयांसाठी समर्पित करणारी निस्वार्थी गृहिणी असते. आईच नवरा आणि सासू यांंच्यातील जोडणार्‍या सेतूवर अगदी तारेवरील कसरत करण्याईतपत कठोर प्रवास असूनही त्यातही अगदी सहजतेने समतोल राखत आपला संसार सर्वांच्या आपुलकीने फुलवणारी राणी असते.

- Advertisement -

आईच कुरूपता धारण करून प्रत्येक क्षणाला विचार बुद्धीने सौंदर्य प्राप्ती करणारी युनिव्हर्स असते. आईच पहाटे समयी धरणी मातेला सडा घालून तृप्त करणारी गृहदेवता असते. आईच धरणीमातेला रांगोळी घालून सौंदर्याचा एक पवित्र ठेवा बहाल करून पहाटेच्या कोवळ्या काळोखात लुप्त होणारी चांदणी असते. आईच प्रत्येक लेकराच्या मनातलं ओठांवर येण्याआधी मायाळू नजरेन हेरलेलं मुखात घालणारी वात्सल्य मूर्ती असते. हो, खरंच तिच्यामुळेच आपल्या सिमेंटच्या, पत्र्याच्या, मातीच्या गोकुळात प्राण असतो. तुमच्या मते भलेही सकाळचा सूर्य आकाशात उजाडत असेल, परंतु आपल्यासाठी तीच आनंदाने प्रत्येक सकाळ उजाडणारी, तळपणारी सूर्यदायिनी असते.

जसं खाण्याच्या प्रत्येक पदार्थाला मिठाची सोबत दिल्यावर तो पदार्थ खाताना परिपूर्ण चव देतो ना…मग तशीच चव आपली आई आपल्या जीवनाला देत असते. खरंतर आईशिवाय, आईच्या प्रेमाशिवाय सगळी सृष्टी अपूर्ण आहे, शून्य आहे. कदाचित तुम्हाला माहीत आहे की नाही, मला माहीत नाही, पण जसं शनिदेवाची आई संध्याचं प्रतिरूप छाया होती, कृष्णाची माता देवकी होती, पालनपोषण करणारी यशोदादेखील आईच होती, तशी आपली आई ही आपल्यालाच जीव लावणारी आपली आई असते. तुम्हाला सांगू, अगदी पैसे देऊन तुम्ही बाजारात कुठेही जरी गेलात ना तरी तुम्हाला आईसारखं निस्सीम प्रेम, ममता आणि वात्सल्य हुडकूनही मिळणार नाही.

खरंतर आईची सेवाशुश्रूषा करणारा धन्यच असतो, पण या जमान्यात तरी सगळेच श्रावणबाळ होऊ शकत नाहीत. म्हणूनच म्हणतो, आईची अंगाई, आईची आपल्याविषयी असलेली काळजी हे आपल्यासाठी खूप मोठे लाखमोलाचे साम्राज्य असते. खरंतर आईचे महत्त्व हे प्रत्येकाला लग्नानंतर कळते. (मुलाला बायकोच्या स्वरूपात आणि मुलीला सासूच्या स्वरूपात) तिला नकळत आपण किती त्रास द्यायचो, कामाचा ताण द्यायचो, पण मित्रांनो, आई आपल्यासाठी जेवढं करते ना तेवढं आपण तिच्यासाठी किंवा तिच्याएवढं कधीच करू शकणार नाही. ती नेहमीच कामाला आपल्या हातात घेऊन आपल्यावरच संस्कारांची बिजे रोवत असते. ती एक गृहिणी असूनदेखील आयुष्यातल्या कुठल्याही कामाला कधीच सुट्टी घेत नसते. ती कधीच थकत नसते.

ती कधीच कुठल्याही कामाचा मोबदला मागत नसते किंवा ती कधीच एखाद्या किनार्‍यावर सूर्यास्ताची संध्याकाळ साजरी करीत नसते. ती कधीच सेल्फीचं फ्याडही मानत नसते. याउलट ती सणासुदीच्या काळात एकत्र जमून आपल्या नात्यात जर एकोपा निर्माण होत असेल तर कोणताही भेदभाव न करता समान भावनेने या सर्वात सामील होते आणि मग आपल्या कुटुंबाला आनंदाने पोट भरून जेवताना बघून तिचे पोट गच्च भरून जाते. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं जुन्या विचारांचं आहे, जुन्या परंपरेचं आहे. कलियुगात तर आता सगळं डिजिटल झालं आहे, सगळं फिंगरटिपवर मिळत आहे, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, यात आईचे प्रेम, आईची माया नाही. शेवटी आई ही आईच असते. ती आपल्यासाठी जीवनात खूप काही करते. तिच्यामुळेच आपण हे जग पाहू शकतो.

खरंच मला तर अजूनही विशेष वाटते की आपुलकीची ऊब देणारी आणि दिवसरात्र आपल्यासाठी चूल पेटवणारी आई खूप काही करते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -