घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टबहुजन विकास आघाडीच्या भितीने गावितांना लॉटरी

बहुजन विकास आघाडीच्या भितीने गावितांना लॉटरी

Subscribe

काँग्रेस ते शिवसेना व्हाया भाजप प्रवेशाने पालघरमध्ये भूकंप

 २०१४च्या मोदी लाटेत पालघर जिल्ह्यात काँग्रेसचा बराच जनाधार घटला. त्यानंतर २०१८च्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाट्यमय घटना घडल्या, ज्यामुळे भाजपने गावितांना संधी दिली आणि ते खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांचे राजकीय अस्तित्व टिकून राहिले, मात्र २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती झाली, सेनेने आधीच ठरवल्याप्रमाणे या ठिकाणी श्रीनिवास वणगा यांची उमेदवारीही पुढे केली, परंतु त्याचवेळी पालघरमधील शक्तीशाली पक्ष बहुजन विकास आघाडीने दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा मिळवून सर्व ताकदीनिशी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अखेर तगडा प्रतिस्पर्धी म्हणून भाजपने पुन्हा राजेंद्र गावित यांचे नाव सूचवले. त्यानुसार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी गावित यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी अधिकृतपणे घोषित करण्यात आली.

काँग्रेस पक्षाचा पालघरचा चेहरा म्हणून कालपर्यंत राजेंद्र गावित ओळखले जात होते. दोन्ही काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस पक्षाने त्यांना आदिवासी विकास मंत्री बनवले. पालघर जिल्ह्याची निर्मिती होईपर्यंत या ठिकाणी वसई-विरार शहरी भागात बहुजन विकास आघाडीचा प्रभाव आणि ग्रामीण भागात शिवसेना, काँग्रेस, भाजपचा प्रभाव राहिला. जिल्ह्याच्या निर्मितीनंतर लागलीच लोकसभा निवडणूक लागली आणि राजकीय समीकरणे बदलली. मोदी लाटेमुळे पालघर जिल्ह्यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आणि शहर तसेच ग्रामीण भागातही भाजपने जम बसवला. यात काँग्रेसचे अस्तित्व बर्‍यापैकी कमी झाले. त्याच वेळी राजेंद्र गावित यांना राजकीय भवितव्याची चिंता भेडसावू लागली. विधानसभा निवडणुकीत पालघर विधानसभेतून राजेंद्र गावित यांचा शिवसेनेचे उमेदवार कृष्णा घोडा यांनी पराभव केला. २४ वर्षीय तरुणाकडून झालेला पराभव राजेंद्र गावित यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. तोपर्यंत काँग्रेसला जिल्ह्यात उतरती कळा लागली होती, मोदी पर्व सुरू झाल्याने काँग्रेसची पुन्हा सत्ता येणे अवघड असल्याचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी राजेंद्र गावित संधी शोधू लागले.

- Advertisement -

२०१८पर्यंत भाजप-सेना यांच्यात वादावादी सुरू झाली होती. अचानक पालघरचे भाजपचे खासदार अ‍ॅड. चिंतामण वनगा यांचे आकस्मिक निधन झाले आणि त्या ठिकाणी पोट निवडणुकीत शिवसेनेने वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वणगा यांना संपर्क करून त्यांना शिवसेनेची लोकसभेची उमेदवारी दिली. सहानुभूतीपोटी श्रीनिवास वणगा जिंंकतील, असे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी भाजपची गोची झाली. भाजपकडे पर्यायी उमेदवार नव्हता, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट काँग्रेसचे नेते राजेंद्र गावित यांनी संपर्क करून पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन सर्व ताकदीनिशी गावित यांना निवडून आणले आणि गावितांचे राजकीय पुनर्वसन झाले. काँग्रेसकडून सातत्याने आपला अपमान होत होता, पक्षासाठी योगदान देऊनही ही वागणूक दिल्याने आपण भाजपात आल्याचे गावित तेव्हा म्हणाले होते.

आता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप यांच्यात युती झाली, त्यावेळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीनिवास वणगा यांना दिलेल्या आश्वासनानुसार सेनेने लोकसभेसाठी श्रीनिवास वणगांचे नाव पुढे केले, मात्र त्याचवेळी बहुजन विकास आघाडीने दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा मिळवून युतीसमोर मोेठे आव्हान उभे केले, अशा वेळी श्रीनिवास वणगा प्रभावी ठरणार नाही, म्हणून पुन्हा एकदा गावित यांचे नशीब फळफळले असून त्यांच्या पदरात पुन्हा खासदारकीची उमेदवारी पडली. त्यासाठी त्यांना खास शिवसेनेकडे सुपुर्द करण्यात आले. मंगळवारी गावित यांनी मातोश्रीत जावून उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून घेतले, विशेष म्हणजे त्यावेळी भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी स्वहस्ते शिवबंधन उद्धव ठाकरे यांच्या हातात दिले.

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केली. त्यानंतर मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र असे असले तरीही माझ्यासाठी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समान आहेत. पालघरमध्ये चांगले काम करायचे आहे. भाजपात मी होतो, आता मी शिवसेनेत आलो आहे. मला दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समान आहेत.
– राजेंद्र गावित, शिवसेनेचे पालघर लोकसभेचे उमेदवार

कोण आहेत गावित?
काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित हे मुळचे नंदूरबारचे आहेत. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री होते. यापूर्वीही ते पालघर मतदारसंघातून एकदा निवडणूक जिंकले आहेत. परंतु, २०१४ मध्ये लोकसभा आणि २०१६ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात होते, मात्र भाजपप्रवेशापासून त्यांचे राजकीय अस्तित्व टिकून राहिले.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -