घरमुंबईज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन

ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन

Subscribe

ज्ञान हेच भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन राहणार असून, लोकांचे राहणीमान सुधारण्यात ज्ञानाची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले. इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च अभिमत विद्यापीठाच्या मंगळवारी झालेल्या 16व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. उपराष्ट्रपतींच्या हस्ते आठ जणांना पीएचडी, सहा जणांना एम फिल आणि 29 विद्यार्थ्यांना एम.एससी पदवी प्रदान करण्यात आली.

वसाहतवादी मनोवृत्तीतून शिक्षणव्यवस्थेने बाहेर पडले पाहिजे. व्यवस्थेने इतिहास वास्तवदर्शी पद्धतीने शिकवला पाहिजे. शिक्षण केवळ रोजगारासाठी नाही. शिक्षण व्यवस्थेने व्यक्तीला ज्ञानाने सक्षम केले पाहिजे. सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि सर्वसमावेशक विकास व्हावा याची काळजी घेतली पाहिजे. जागतिक ज्ञानाचे केंद्र म्हणून भारताचे पुनरुत्थान होण्याची वेळ आता आली आहे. हे घडण्यासाठी अध्यापन केंद्रांनी विशेषत: विद्यापीठांनी बौद्धिक आदानप्रदानाची सर्वोत्तम केंद्रे म्हणून स्वत:ला नव्याने घडवले पाहिजे, असेही उपराष्ट्रपती म्हणाले.

- Advertisement -

2030 मध्ये भारत 10 ट्रिलिअन अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था होण्यासाठी वर्षाला किमान सात टक्केे विकासदर राखणे आवश्यक आहे. आपण हे साध्य करु शकलो तर जागतिक बँकेच्या कनिष्ठ उत्पन्न गटातून उच्च-मध्यमवर्गीय उत्पन्न गटात दाखल होऊ शकतो. यासाठी अपुर्‍या सार्वजनिक सेवा, प्रदूषण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातल्या समस्या, जमीन, मजूर व वित्तीय बाजारपेठांमधील त्रुटी यांसारख्या अनेक अडथळ्यांवर मात करणे आवश्यक आहे. विकासमार्गावर चालण्यासाठी संशोधन, नावीन्यपूर्ण शोध, प्रामाणिक अंमलबजावणी आणि सातत्यपूर्ण देखरेख आवश्यक आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले.

शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण संस्थांनी बदलत्या मागण्यांचा विचार केला पाहिजे. आपल्या तरुण लोकसंख्येचा लाभ घेण्यासाठी कौशल्य विकासाची गती महत्त्वाची आहे. स्वयंरोजगाराला आपण चालना दिली पाहिजे. स्वयंसहाय्यता गट अधिक सक्षम केले पाहिजेत, ग्रामोद्योगांना चालना दिली पाहिजे आणि गावांचा विकास केला पाहिजे. शहर आणि गावातील दरी आपण मिटवली पाहिजे. ग्रामीण भागात शहरी सुविधा पुरवण्याचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न आपण प्रत्यक्षात उतरवले पाहिजे. शहरी क्षेत्राप्रमाणे ग्रामीण भागातील जीवनमान सुकर होण्यासाठी पेयजल, पथदिवे, शिक्षण, आरोग्यनिगा आणि दूरसंवाद सेवा पुरवण्याविषयीच्या सामाजिक समावेशनाची उद्दिष्टे त्यांनी मांडली.

- Advertisement -

आयजीआयडीआरच्या विद्यार्थ्यांमध्ये पदवीप्राप्त स्त्रियांचे प्रमाण अधिक असल्याचे कौतुक उपराष्ट्रपतींनी केले. मुलींच्या शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. यावेळी वर्ष 2016-18 साठी एम.एससी अर्थशास्त्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी कुलगुरुंचे सुवर्णपदक मधुपर्णा गांगुली यांना प्रदान करण्यात आले. समारंभाला आयजीआयडीआरचे संचालक प्रा. महेंद्र देव, डीन प्रा. जयंती सरकार, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. सी.वीरमणी आणि रजिस्ट्रार जय मोहन पंडित उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -