घरमुंबईभिवंडीत पोलिसांची दबंगगिरी, दक्ष नागरिकालाच पोलिसांकडून बेदम मारहाण

भिवंडीत पोलिसांची दबंगगिरी, दक्ष नागरिकालाच पोलिसांकडून बेदम मारहाण

Subscribe

दक्ष नागरिकाला पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केली असल्याची घटना भिवंडीत घडली आहे. मात्र पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.

समाजातील विघातक घटनांना आळा बसवा म्हणून पोलीस प्रशासनाकडून ‘दक्ष नागरिक बना आणि पोलिसांना सहकार्य करा’ असा संदेशाचा फलक प्रत्येक पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागावर लावून नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. मात्र भिवंडी शहर पोलिसांनी खबर देणाऱ्याच दक्ष नागरिकांना बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून पोलिसांच्या जनजागृतीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ एका जागृत नागरिकाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून ती व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्याने हा अन्यायकारक प्रकार समोर आला आहे.

काय आहे प्रकरण

ही घटना भिवंडी शहरातील घुंगटनगर परिसरात घडली आहे. विशाल गुप्ता (२४) असे पोलिसांकडून बेदम मारहाण झालेल्या दक्ष नागरिकाचे नाव आहे. मारहाणीत त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले आहे. घुंगटनगर परिसरात काही तृतीय पंथी व परिसरातील युवकांचा किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रुपांतर हाणामारीत होवू नये. यासाठी विशाल गुप्ता या द्क्ष नागरिकाने या घटनेची माहिती शहर पोलिस ठाण्यात भ्रमणध्वनीद्वारे दिली. मात्र घटनास्थळी पोलिस येताच पोलिसांनी दक्ष नागरिकालाच लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली. पोलीस त्यावरच न थांबता त्यांनी दक्ष नागरिकासोबत असलेल्या आणखीन दोन ते तीन युवकांना मारहाण केली. या मारहाणीत दक्ष नागरिकाच्या डाव्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले असून मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

- Advertisement -

दक्ष नागरिकाचे आरोप फेटळले

याबाबत भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता त्यांनी दक्ष नागरिकाला पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे सांगत दक्ष नागरिकाचे आरोप फेटाळून लावले आहेत. उलट त्या युवकानेच पोलिसांशी वाद घातल्याप्रकरणी त्याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास पोलीस करीत आहे.मात्र त्यांनी या घटनेबाबत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. दरम्यान दोषींवर कारवाई करण्याची मागणी श्रमजीवी संघटनाचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -