घरमहाराष्ट्रशिवसेना - भाजप मेळावा वादाच्या भोवऱ्यात

शिवसेना – भाजप मेळावा वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

मागील रविवारी शिवसेना- भाजप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा मेळावा अनेक कारणांनी वादग्रस्त ठरला. या मेळाव्यात डीजे आणि फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण झाल्याची तक्रार हिराली फाउंडेशनने केली आहे. तसेच, उल्हासनगर मनपा मधून फाईल चोरणाऱ्या प्रदीप रामचंदानी याने स्टेजवर देशभक्तीपर भाषण केल्याने त्याची सर्वत्र खिल्ली उडवली जात आहे .

उल्हासनगर – ३ मध्ये रिजेन्सी गार्डन येथे, रविवार ३१ मार्च रोजी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शिवसेना – भाजप युतीतर्फ़े मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ८ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. यावेळी, शिवसेनेचे एकनाथ शिंदे, डॉ श्रीकांत शिंदे आणि भाजपचे रवींद्र चव्हाण यांचे स्टेजवर आगमन होताच मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच, डीजेचा मोठा आवाज यामुळे ध्वनी प्रदूषण झाले असल्याचा आरोप हिराली फाउंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी केला. ध्वनी प्रदूषण कायद्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री रामदास कदम , ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार देखील केली होती. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी या तक्रारी बाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने तात्काळ तक्रारीची दखल घेत आपली तक्रार आवश्यक त्या कारवाईसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याला कळविण्यात आली असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली .

खिल्ली उडवून सोशल मीडियावर टीका 

या संदर्भात मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘अशा प्रकारच्या तक्रारीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करणे आवश्यक आहे तरी देखील तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.’ याच कार्यक्रमात भाजपचा नगरसेवक प्रदीप रामचंदानी याने पंतप्रधान मोदी यांची स्तुती केली आणि देशभक्तीची डायलॉगबाजी केली. मात्र याच नगरसेवकाने काही महिन्यांपूर्वी मनपाच्या शहर अभियंता कार्यालयातून एक महत्त्वाची फाईल चोरी केली होती. याबाबत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगावास देखील भोगावा लागला होता . रामचंदानी यांची यावेळी उपस्थित लोकांनी खिल्ली देखील उडवून सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात टीका होत आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -