घरमहाराष्ट्रभारनियमनाने मुरुडकर संतप्त

भारनियमनाने मुरुडकर संतप्त

Subscribe

पुढील मंगळवारीही वीज बंद

शहरात वीज पुरवठ्याची बोंब असताना मंगळवारी तब्बल साडेनऊ तासांचे भारनियमन करण्यात आल्याने जनता चांगलीच संतप्त झाली. त्यांनी महावितरणच्या नावाने खडे फोडले. 24 तास सलगपणे वीज मिळत नसताना तसेच दुसरीकडे परीक्षेचा हंगाम असताना सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, पुढील मंगळवारीही वीज बंद राहणार आहे, अशी माहिती उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी दिली. साडेनऊ तास वीज गायब झाल्याने कोल्ड्रिंक सेंटर, झेरॉक्स व्यवसाय व शासकीय कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. नुकतेच वीज उपकेंद्र सुरू झाले असतानासुद्धा साडेनऊ तास वीज जाण्याचे कारण काय, असा सवाल व्यापार्‍यांसह नागरिकांनी केला. मात्र याबाबत शेवटपर्यंत महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

शहरासह तालुक्याचे तापमान 34 डिग्री सेल्सिअस झाल्याने नागरिकांना घामाच्या धारा लागल्या आहेत. त्यातच महावितरणची अवकृपा झाल्याने नागरिकांच्या संतापात अधिक भर पडली आहे. दुसरीकडे भर दिवसा शहरात पथदिवे सुरू असतात. गलथान कारभारामुळे विजेचा अपव्यय होत आहे. महावितरणकडून विजेचा अपव्यय होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू असताना वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या संदर्भात उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांना विचारणा केली असता, मुरुड वीज उपकेंद्रास पाभरे येथून वीज पुरवठा होतो, परंतु त्या ठिकाणी मोठे टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे येथूनच वीज बंद करण्यात आली होती, तसेच अन्य पाच तालुक्यांचीही वीज बंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

दरम्यान, पुढील मंगळवारीसुद्धा वीज बंद राहणार आहे. स्थानिक पातळीवर वीज खंडित करण्यात आली नव्हती. नगर परिषदेचे पथ दिवे दिवसा सुरू असतात. याबाबत विचारणा केली असता, ही जबाबदारी नगर परिषदेची आहे. याबाबत त्यांना पत्र देण्यात आले असल्याची माहिती येरेकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -