घरफिचर्सजाणून घ्या बाळाचा आहार

जाणून घ्या बाळाचा आहार

Subscribe

अनेक नवमातांना बाळाच्या आहाराच्या गरजांविषयी फार माहिती नसते. आधुनिकीकरण, छोटे कुटुंब, घरी मदत उपलब्ध नसणे आणि इंटरनेटमधून मिळणारी अपूर्ण माहिती यामुळे त्यांच्या तणावाच्या पातळीत भरच पडते. अशा अनेक माता मग फॉर्म्युला दुधाचा आधार घेतात आणि बाटलीने त्यांच्या बाळांना पाजतात. हे अजिबात योग्य नाही, कारण आईचे दूध हेच बाळासाठी सर्वोत्तम असते आणि बाटलीने दूध पाजल्याने दीर्घकालीन परिणाम होतात. त्याचप्रमाणे बळांना अन्नपदार्थ कधी आणि कसे सुरू करावेत हेही त्यांना माहीत नसते.

स्तनपान ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर तासाभरात मातांनी स्तनपान सुरू करणे हितकारक असते. बाळाच्या जन्मानंतर ३ ते ५ दिवसांपर्यंत येणार्‍या दुधाला कोलोस्ट्रम म्हणतात. कोलोस्ट्रम ही बाळाने घ्यावयाची पहिली लस असते असे म्हणतात आणि बाळाने ते पिणे आवश्यक असते, कारण त्यात अनेक प्रतिकारक गुणधर्म असतात आणि हे दूध बाळाचे अनेक गंभीर संसर्गांपासून संरक्षण करते.

- Advertisement -

बाळासाठी स्तनपान हे पूर्णान्न असते आणि पहिले सहा महिने बाळाला पाण्याचीही आवश्यकता भासत नाही. त्यामुळेच युनिसेफ, डब्ल्यूएचओ आणि आरोग्यविषयक सर्व महत्त्वाच्या संस्था बाळाला पहिले सहा महिने केवळ स्तनपान देण्याची शिफारस करतात. संशोधनानुसार, ज्या बाळांनी पहिले सहा महिने केवळ स्तनपान केले आहे त्यांना न्युमोनिया, अ‍ॅलर्जी, पोटाला आतड्याला आणि श्वसनमार्गाला संसर्ग होण्याची शक्यता कमी असते आणि ते अधिक बुद्धिमान असतात. स्तनपान मातांसाठीही चांगले असते कारण गरोदरपणात साचलेली अतिरिक्त चरबी दुधावाटे बाहेर पाडते आणि स्तनांचा कर्करोग होण्याची शक्यताही कमी असते.

असे असले तरी बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर बाळाला केवळ स्तनपान पुरत नाही आणि त्याला दैनंदिन आहाराची गरज भागविण्यासाठी इतर पदार्थांचीही आवश्यकता भासते. ६ महिन्यांनंतर स्तनपानासह बाळाला पूरक अन्न जसे, वरण-भात, खिचडी, भाज्या घालून केलेली खिचडी, भरड किंवा आंबील आणि फेळे कुस्करून द्यावीत. हे पूरक पदार्थ घरी तयार केलेले, ताजे, पूर्ण शिजलेले असावेत आणि प्युरीच्या प्रकारात द्यावेत.

- Advertisement -

सुरुवातीला पातळ पदार्थ द्यावेत, त्यानंतर त्याची घनता वाढवत नेऊन सेमीसॉलिड (अर्धघन) आणि घन पदार्थ (सॉलिड) खाऊ घालावेत. सुरुवातील जेवण दिवसातून दोन वेळा द्यावे. त्यानंतर जसजसे वय वाढत जाईल, तसतसे दिवसातून ३ ते ४ वेळा जेवण द्यावे. २ वर्षे पूर्ण होईपर्यंत स्तनपान सुरू ठेवावे. अंड्याचा पांढरा भाग आणि गायीचे दूध हे बहुधा ९ ते १२ महिन्यांदरम्यान सुरू करावे. ते लवकर केले असता बाळाला अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. खूप द्रव पदार्थ म्हणजे डाळीचे पाणी, भाताची पेज, फळांचे रस देणे टाळावे. कारण त्यामुळे बाळाला पुरेसे तंतू मिळत नाहीत. चणे/सुका मेवा हेसुद्धा पावडरच्या रूपात अथवा शिजवून द्यावेत. नवजात बालकाच्या आहारात साखर, मीठ आणि मसाले अत्यंत कमी प्रमाणात घालावेत.

भारतात बाळांना बिस्कीट आणि दूध भरविण्याची परंपरा आहे, जी बाळाच्या आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही. पोषणाच्या दृष्टीने तो अत्यंत निरुपयोगी असतो कारण त्यात क्षार, मायक्रो न्युट्रिअंट्स आणि तंतु समाविष्ट नसतात. त्यामुळे बाळामध्ये लोहाची कमतरता आणि बद्धकोष्ठता होते. भारतात त्याला ‘मिल्क-बिस्कीट’ सिण्ड्रोम म्हणतात. तो आता सिद्ध झाला आहे आणि जे बाळ हा आहार घेते त्याला रक्ताक्षय होण्याचीही शक्यता असते. पहिली दोन तीन वर्षे मुलांना बिस्किटे देणे टाळावे.

वयानुसार द्यावयाचा आहार

पहिले सहा महिने केवळ स्तनपान

६ ते ७ महिने – लिक्विड आणि सेमी सॉलिड डाळी, भरड, भाज्यांचे सूप (गाळून)

८ ते ९ महिने – भाताची खीर, उकडलेला बटाटा, बीटरूट आणि गाजराचे सूप, हंगामी फळे, रोजचे आंबील, इडली, उपमा

१०-१२ महिने – अंड्याचा बलक आणि भात, भाज्यांचे सूप, ज्वारीचे आंबील, ओट्स, नाचणी

१२-२४ महिने – विविध पीठांचा पराठा/घावन, थालीपीठ, कढी इत्यादी

-डॉ. तुषार पारिख, डीएनबी, डीएम (निओनॅटोलॉजी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -